-->
लक्ष्य शिवतीर्थ!

लक्ष्य शिवतीर्थ!

संपादकीय पान मंगळवार दि. 21 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
लक्ष्य शिवतीर्थ!
-------------------------------------
आज रायगड, रत्नागिरीसह कोकणातील तसेच राज्यातील दुसर्‍या टप्प्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असा तिचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राचे द्रष्टे नेते व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागातील जनतेची कामे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावी व सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषदा स्थापन केल्या. ग्रामीण भागातील जनतेची बहुतांशी कामे जिल्हा परिषदेमार्फतच होतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत येतेत सत्तेत कोण बसतो त्याला विशेष महत्व प्राप्त होते. सध्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी व शेकापचे आघाडी सरकार आहे. या दोन पक्षांनी जिल्ह्याचा विकास करीत असताना सेक्युलर पक्षांची मते फुटू नयेत व जातीयवाद्यांचा पराभव करता यावा या हेतूने कॉग्रेसलाही बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही ठिकाणी कॉग्रेसच्या स्थानिक पुढार्‍यांनी शिवसेनेशी संधान बांधले व आपले अस्तित्व टिकविण्याची केविलवाणी धडपड केली. मात्र केंद्रातील व राज्यातील कॉग्रेसच्या नेतृत्वाला अशा प्रकारची जातीयवाद्यांशी जोडलेली नाळ पसंत पडणे काही शक्य नव्हते. त्यांनी अखेरीस अशा प्रकारचे कॉग्रेसचे हे उमेदवार बंडखोर आहेत व कॉग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम करु नये असे स्पष्ट केले. परिणामी कॉग्रेसचा सच्चा कार्यकर्ता अशा नेत्यांपासून लांब राहणे पसंत करीत आहे. शिवसेना व भाजपा हे वेगवेगळे लढत आहेत. मात्र जिल्ह्यात भाजपाची ताकद नगण्यच आहे. सध्याच्या सत्ताधार्‍यांनी राष्ट्रवादी-शेकापने जनतेची विकासाची अनेक कामे केल्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे. त्यातच अशा प्रकारची मतांची विभागणी झाल्याने राष्ट्रवादी व शेकापची सरशी होणार हे नक्की आहे. त्यामुळे पुन्हा शिवतीर्थावर मजल मारण्याचे शेकाप-राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण होणार यात काहीच शंका नाही. रायगड जिल्हा हा सुरुवातीपासून शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी जनतेची कामे करुन लोकांना शेकापक्षाकडे बांधून ठेवले. विकासाची कामे करुन लोकांना आपल्या पक्षात बांधून ठेवणे ही त्यांची ख्यासीयत होती. आज अनेक पक्षात जे नेते म्हणून वावरत आहेत त्यातील बहुतेकांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात ही शेकापक्षातून केलेली आहे. मात्र ज्यांनी शेकाप सोडला त्यांचा राजकीय प्रवास काही सुकर झालेला नाही, हे वास्तव अनेक नेत्यांना लागू पडते. असो. शेकाप व राष्ट्रवादी यांची आघाडी गेल्या दोन वर्षात चांगली पक्की झाली आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघातील पुरोगामी आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या विजयाने ते दाखवून दिले आहे. त्यापाठोपाठ येत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकात त्याची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. जिल्ह्यात भाजपा अगदीच नगण्य आहे. खरे तर शिवसेना व भाजपाने आपली संयुक्त ताकद पणाला लावली असती तर शेकाप-राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान उभेे राहिले असते. मात्र भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पडत असल्याने शिवसेनेच्या सध्या असलेल्याही जागा गमावल्या जाण्याची शक्यता आहे. बाहेरुन पक्षात आयत्यावेळी खोगीरभरती करुन पक्ष वाढत नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना समजेल. केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची गेल्या वेळची खासदारकी काही हजार मतांनी बचावली होती. गितेसाहेब एकदा का खासदार होऊन दिल्लीला गेले की, ते पुन्हा पाच वर्षांनी येतात असा लोकांचा अनुभव आहे. आपला खासदारकीचा निधीही ते पूर्णपणे वापरत नाहीत. आता मात्र ते रायगड जिल्हा परिषद काबीज करायला निघाले आहेत. त्यामुळे जनतेला गितेसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाविषयी पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या सभांमध्ये कितीही वल्गना केल्या तरी त्याला जनता भूलणार नाही. जिल्हा परिषदेसाठी यावेळी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे वरसे येथून उभ्या आहेत. त्याचा राजकीय प्रवास आता जिल्हा परिषदेच्या माध्य्मातून सुरु होईल. त्यांचा विजय निश्‍चित असला तरी त्यांच्या विरोधात शिवसेना-भाजपा  एक होऊन पुढे आले आहेत. संपूर्ण राज्यात सेना-भाजपाचे विळ्या भोपळ्याचे नाते असताना इकडे मात्र ते एकत्र आले आहेत. शेकापचे आस्वाद पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष मधुकर पाटील यांनी आपल्या उमेदवारी माघार घेतल्याने आस्वाद पाटील यांचा विजय नक्की झाला आहे. थळ व कुर्डुस येथून उभ्या असलेल्या चित्राताई पाटील पेण पाबळ येथून उभ्या असलेल्य निलिमा पाटील सुश्रुता पाटील यांच्या जागा शेकापसाठी हुकमी एक्का ठरल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी शिवसेना 50 जागा लढवित आहे तर भाजपाने 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर शेकाप 30 व राष्ट्रवादी 29 जागा लढवित आहे. सेना-भाजपाचे 40 उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अर्थातच या मतविभागणी फायदा राष्ट्रवादी व शेकापच्या उमेदवारांना होईल, यात काहीच शंका नाही. कॉग्रेसने 20 जागंवर राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार उभे केले असल्याने येथील मतविभागणी कशी होते व त्याचा नेमका फायदा कोण घेतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. देशपातळीवरील विचार करता नरेंद्र मोदींची लाट केव्हांच संपली आहे, मात्र भाजपावाले अजून त्या लाटेचाच आपल्याला फायदा होईल अशा भ्रमात आहेत. यावेळी सुमारे 15 लाख मतदार आपले मत नोंदविणार आहेत. या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या 183 उमेदवारातून 59 उमेदवार निवडायचे आहेत तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 374 उमेदवारांचा पर्याय आहे. यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकापसाठी विजय निश्‍चित असून फक्त शिवतीर्थावर किती सदस्य घेऊन जायचे याचा निर्णय देण्यासाठी हे मतदान होईल, यात काहीच शंका नाही.
---------------------------------------------------------------

0 Response to "लक्ष्य शिवतीर्थ!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel