-->
चलती परदेशी खेळाडूंची

चलती परदेशी खेळाडूंची

संपादकीय पान बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
चलती परदेशी खेळाडूंची
आयपीएल भारताची आणि चलती परदेशी क्रिकेटपटूंची असे चित्र आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात दिसले. यंदाच्या लिलावात इंग्लंडचे क्रिकेटपटू मालामाल झाले आहेत. अष्टपैलू बेन स्टोक्स सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सनी त्याच्यासाठी 14.50 कोटी रुपये मोजले. इंग्लंडचाच डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सलाही लॉटरी लागली. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने 12 कोटींची बोली लावली. स्टोक्सला विकत घेण्यासाठी पाच फ्रँचायझींनी इंटरेस्ट दाखवला. त्यामुळे त्याच्या बोलीचा आकडा वाढला. 25 वर्षीय स्टोक्सच्या नावावर 77 वनडे सामने आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेला स्टोक्स दुसरा क्रिकेटपटू आहे. गेल्या मोसमात अष्टपैलू युवराजसाठी बंगळूरुने तब्बल 16 कोटी मोजले होते. आयपीएलमध्ये आजपर्यंत सर्वाधिक मानधन घेणारा तो क्रिकेटपटू ठरला आहे. 55 टी-20 सामन्यांत 63 विकेट घेणार्‍या मिल्सची मूळ किंमत अवघी 50 लाख रुपये होती. त्याला मूळ किंमतीच्या 24 पट बोली लागली. त्यात पुणे फ्रँचायझीची बोली निर्णायक ठरली. सर्वाधिक बोली लागलेल्या अव्वल पाचमध्ये भारताचा एकही क्रिकेटपटू नाही. तिसर्‍या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यासाठी 5 कोटी रुपये मोजले. दोन वेळचा गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला 5 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला 4.5 कोटी रुपये कोलकाता पुन्हा आपलेसे केले. यावेळी परदेशातील अनेक क्रिकेटपटूंना मोठा भाव मिळाला आहे. मात्र भारताचा अनुभवी मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मासह डावखुरा मध्यमगती गोलंदाज इरफान पठाणला करारबद्ध करण्यास कुठल्याही फ्रँचायझीने उत्सुकता दाखवली नाही, याचे आश्‍चर्य वाटते. कसोटी संघातील आघाडीचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराही याला देखील कुणी खरेदीदार मिळाला नाही. सर्वाधिक 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये इशांतचा समावेश होता. मात्र दुखापतीमुळे संघात आत-बाहेर असणे, तसेच अधिकाधिक टी-20 सामने न खेळल्याने त्याला करारबद्ध करण्यासाठी कुणी पुढे आले नाही. इरफानही अपयशी ठरला. पुजाराची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. मात्र फ्रँचायझींचा अनुत्साह पाहता त्याला कसोटीपटूचा शिक्का पुसण्यात अपयश आल्याचे दिसले. भारताचा मध्यमगती गोलंदाज वरुण आरोन, लेगस्पिनर करण शर्मा आणि डावखुरा फिरकीपटू पवन नेगीलाही चांगली किंमत मिळाली. वरुणसाठी पंजाबने 2.8 कोटी मोजले. मुंबईने करनला 3.2 कोटी रुपयांची बोली लावली. पवन नेगीला बंगळूरुने करोडपती केले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये इतकी होती. आयपीएल-10साठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात 66 क्रिकेटपटूंवर आठ फ्रँचायझींनी मिळून तब्बल 91.15 कोटी रुपये खर्च केले. बोली लागलेल्यांमध्ये 39 भारतीय तसेच 27 परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. क्रिकेटपटूंची संख्या आणि बोलीची रक्कम पाहता प्रत्येक क्रिकेटपटूसाठी सरासरी 1.38 कोटी रुपयांची बोली लागली. भारताच्या क्रिकेटपटूंवर 24.75 कोटी खर्च झाले. यजमानांच्या तुलनेत परदेशी क्रिकेटपटूंवरील (66.4 कोटी) आकडा खूपच मोठा आहे. गुजरात लायन्सने सर्वाधिक 11 क्रिकेटपटू खरेदी केले. त्यानंतर बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशिद खानला 4 कोटींची बोली लागली. त्याचा सहकारी मोहम्मद नाबीला 30 लाखांवर समाधान मानावे लागले. रशिद आणि नाबीला सनरायझर्स हैदराबादने करारबद्ध केले. संयुक्त अरब अमिरातीच्या चिराग सुरीला 10 लाख मिळाले. त्याला गुजरात लायन्सने खरेदी केले. यंदाच्या लिलावात अफगाणिस्तानचे पाच तसेच संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) एक अशा पाच आयसीसी संलग्न देशांच्या क्रिकेटपटूंचा समावेश होता. खेळाडूंची ही कोटीच्या कोटी उड्डाणे पाहता क्रिकेटचे ग्लॅमर यातून आता अधिकच वाढणार आहे, हे नक्की.

0 Response to "चलती परदेशी खेळाडूंची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel