-->
शून्यातून घेतलेली झेप...

शून्यातून घेतलेली झेप...

दि. 20 नोव्हेंबरच्या मोहोरसाठी चिंतन शून्यातून घेतलेली झेप... कॉँग्रसचे माजी अध्यक्ष व खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रातील पल्ला पार केला आहे. तामीळनाडू, केरळ, कर्नाटकातून ही यात्रा जनतेच्या उत्फुर्त उत्साहाने महाराष्ट्रात पोहोचली. आता ती उत्तर भारताच्या दिशेने कूच करुन तिचा समारोप काश्मिरमध्ये होईल. या पदयात्रेबाबत राहूल गांधी यांचे कौतुक केले पाहिजे, ते यासाठी की दररोज किमान २५ किलोमीटर चालत सभा घेत, लोकांशी संवाद साधत ही पदयात्रा करणे ही काही सोपी बाब नाही. अशा प्रकारची दांडी यात्रा महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात केली होती. त्यानंतर अनेक यात्रा निघाल्या परंतु माजी पंतप्रधान चंद्रशेखरांची वगळता कोणतीही यात्रा ही पदयात्रा नव्हती. अनेकांनी सजविलेल्या रथात बसून यात्रा केल्या आहेत. राहूल गांधींच्या पदयात्रेवर सुरुवातीला बरीच टिका झाली, सोशल मिडियावर त्यांना नेहमीप्रमाणे टार्गेट करण्यात आले. ते राहात असलेल्या एसी कंटेनर विषयी बातम्या आल्या. परंतु नेहमीप्रमाणे राहूल गांधी हे एका निश्चयाने आपली पदयात्रा लोकांच्या सोबतीने करीत आहेत. त्यामुळे आता सोशल मिडियावर या यात्रेवर टीकेपेक्षा कौतुकच जास्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात राहूल गांधींविषयी चित्र पालटले आहे, असे म्हणता येईल. कारण राहूल यांच्या टिकाकारांना ही पदयात्रा म्हणजे, काही अंतर चालून नंतर एसी गाडीत बसून केलेली पदयात्रा असेल असे वाटले होते. परंतु तसे काही झालेले नाही. आजवर ही पदयात्रा राहूल यांनी पूर्णपणे चालत केलेली आहे व ते अजिबात थकलेले दिसत नाहीत. त्यांची दाढी वाढलेली आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला कायम आहे. राहूल यांना ठिकठिकाणी अनपेक्षीतपणे प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत ते ज्या राज्यात गेले आहेत तेथे कॉँग्रेसची सत्ता नाही. सध्या देशात जेमतेम दीड राज्यात कॉँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता आहे म्हणून गर्दी जमविण्यात यश आले असे काही म्हणू शकत नाही. तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरीकापर्यंत त्यांना भेटावयास येतात. त्यांना कडकडून मिठी मारतात, काहींना तर आनंद गगनात मावेनासा वाटतो. काही ज्येष्ठ नागरीक आम्ही तुमच्या आजी, वडिलांना असेच भेटलो होतो अशा आठवणी सांगतात. अनेक जाती, जमातींचे लोक आपल्या पारंपारिक नृत्यासह येतात आणि त्यात त्यांना सामिल करुन घेतात. राहूल गांधीं त्यांच्या भोवती असलेले संरक्षणकडे तोडून त्यांना मोठ्या प्रेमाने भेटतात, मिठी मारतात व त्यांच्यात मिसळतात. लोकांना त्याचे फार कौतुक वाटते. कॉँग्रेस पक्षाचा नेता आपल्याला भेटतो यात अबालवृध्दांना एक वेगळाच आनंद दिसतो. या यात्रेत केवळ कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नाहीत तर या देशात काही तरी चांगले घडावे असे मनोमन वाटणारे लोक सहभागी होतात. त्यात कॉँग्रेस पक्षाचे विरोधक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांचा समावेश असतो. अर्थात तेथे येणारे लोक हे स्व:यं स्पुर्तीने आलेले दिसतात, भाडोत्री लोक आणले व शो केला जातो असे काही सध्यातरी जाणवत नाही. एकूणच राहूल गांधींची ही पदयात्रा जबरदस्त यशस्वी होण्याच्या मार्गाने जात आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे या पदयात्रेत काही काळ सामिल झाले होते. अशा प्रकारे राज्यातील महाविकास आघाडीच्या सोबत आपण आहोत हे दोघांनी दाखवून दिले. एकूणच पाहता ही पदयात्रा राजकिय किंवा कॉँग्रेस पक्षाची नाही असे कितीही सांगितले तरीही त्यातून राजकारण पेरले जाणार आहे यात काही शंका नाही. अर्थात कोणतीही गोष्ट ही बिनराजकीय असूच शकत नाही. परंतु या यात्रेचा राहूल गांधी यांच्या कॉँग्रेस पक्षाला किती फायदा होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महत्वाचे म्हणजे निवडणुका असलेल्या राज्यातून जाणेही त्यांनी टाळले आहे. त्यामुळे ही यात्रा व निवडणुकांशी त्यांनी काही संबंध जोडलेला नाही. याचा कॉँग्रेस पक्षाला तोटा काही होणार नाही हे नक्की, मात्र फायदा किती होईल हे काळ ठरविणार आहे. सध्या कॉँग्रेस पक्ष एवढा रसारतळाला गेला आहे की त्यांचे आता नुकसान होण्याचे काही शिल्लक राहिलेले नाही. कॉँग्रेस पक्ष संपविणार, असे बोलणाऱ्यांना या यात्रेने एक चांगलीच चपराक दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेली दशकभर विरोधकांनी केलेली बदनामी, प्रतिमा मलिन करण्याचा केलेला प्रयत्न, पप्पू असे संबोधून केलेली मानहानी हे सर्व सहन करीत राहूल गांधी त्यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे शून्यातून वर आले आहेत. त्याजागी एखादा कुणी नेता असता तर त्याने कंटाळून राजकारण सोडले असते किंवा आपले आयुष्यही संपविले असते. परंतु राहूल गांधी हे सर्व स्वीकारत, मुकाट्याने हे सर्व गिळत त्यातून ते आता बाहेर येत आहेत. ही पदयात्रा त्याचे एक उत्तम उदाहरण ठरावे. त्यांच्या राजकीय जाणिवांविषयी थट्टा केली जाई, राहूल हे लोकांना भेटत नाहीत, अशी टीका केली जाई. परंतु आता राहूल हे हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोकांमध्ये मिसळू लागले आहेत. कॉँग्रेससाठी ही बाब लक्षणीय ठरावी. आता कॉँग्रेसला गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष लाभला आहे, त्यामुळे विरोधकांची घराणेशाहीची हवाच काढली गेली आहे. सध्या कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटला आहे. गेली कित्येक वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे अनेक वाईट गुण त्यांच्या भोवती चिकटले आहेत. जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती वाढली आहे. गेली आठ वर्षे सत्ता नसल्यामुळे हे सर्व नेते हतबल झाले आहेत. पुन्हा सत्ता मिळविण्याएवजी सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षात उड्या मारण्याची त्यांची प्रवृत्ती वाढली आहे. राहूल गांधींच्या या यात्रेच्या निमित्ताने कॉँग्रेस मधील सर्व गट एकत्र येताना दिसत आहेत. महाराष्ट्रात तर राज्यातले अनेक गटबाजी करणारे नेते राहूल यांच्या सोबतीने चालत होते. मृतवत झालेल्या कॉँग्रेसमध्ये चेतना आणण्याचे काम राहूल यांनी केले असले तरी पुढील काळात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन काम करण्याची गरज आहे. तरच कॉँग्रेस पक्षात नवचैतन्य येऊ शकते अन्यथा या यात्रेचा कॉँग्रेसला काहीच उपयोग होणार नाही. आजही कॉँग्रसे पक्ष सत्तेत नसला तरीही त्यांचे गावोगावी कार्यकर्ते आहोत, काही प्रमाणात बांधलेली मते आहेत. यात्रेच्या माध्यमातून राहूल यांनी हे सर्व जागविण्याचा प्रयत्न जरुर केला आहे, आता पुढे कॉँग्रेस कार्यकर्ते काय काम करतात त्यावर याचे यश अवलंबून असेल.

Related Posts

0 Response to "शून्यातून घेतलेली झेप..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel