-->
एअर इंडियाची भरारी

एअर इंडियाची भरारी

दि. 11 डिसेंबरच्या मोहोरसाठी चिंतन
एअर इंडियाची भरारी एअर इंडियाची केंद्र सरकारकडून खरेदी केल्यावर आता टाटा समूहाने ही कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जगात नावारुपाला येण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी टाटा समूहाची भांडवली सहभाग असलेली विस्तारा एअर लाईन्स एअर इंडियात विलीन करण्याचे ठरविले आहे. ही एक महत्वाची घडामोड ठरणार आहे. कारण विस्तारा ही कंपनी टाटा समूह व सिंगापूर एअरलाईन्स यांच्या भागिदारीत स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे विस्तारा विलिन झाल्यावर एअर इंडियात सिंगापूर एअरलाईन्सचे २५ टक्के भांडवल असेल. त्यामुळे भविष्यात एअर इंडियाला सिंगापूर एअरलाईन्सकडून विविध प्रकारच्या सेवांबाबत सहकार्य लाभेल. त्यापाठोपाठ एअर एशिया ही टाटांची भांडवली गुंतवणूक असलेली विमान कंपनीही एअर इंडियात विलीन होण्याच्या तयारीत आहे. एअरइंडिया या दिग्गज ब्रॅन्डला आणखी तेजोमय भविष्य लाभण्याचे संकेत आहेत. येणाऱ्या दिवसांत तुम्हाला एअर इंडियाचा सुवर्णकाळ दिसेल, अशी ग्वाही टाटा सन्सच्या अध्यक्षांनी जानेवारीत कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रातून दिली होती. त्या दृष्टीने टाटा समूहाने आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीयीकरणामुळे सरकारी ताब्यात गेलेली विमानसेवा पुन्हा सहा दशकानंतर स्वत:कडे घेऊन टाटा समूहाने एक विलक्षण वर्तुळ पूर्ण केले होते. आता ५४ विमाने आणि साडेचारशे कर्मचारी असलेल्या विस्तारा या एअरलाइन्सचे एअर इंडियात विलिनीकरण झाल्यावर एअर इंडिया नव्याने भरारी घेण्यास सज्ज होईल. कर्जाचा डोंगर असलेल्या व दिवसेंदिवस पत गमावत चाललेल्या एअर इंडियाला टाटा समूहाने आपल्या पंखाखाली घेतले. कर्जाचा मोठा वाटा सरकराने आपल्याकडे राखला असला तरीही विमानसेवा चालविणे ही काही सोपी बाब नाही. नाही तरी सरकारला एअर इंडिया हे एक ओझेच झाले होते आणि हा भार त्यांनी टाटांवर टाकला. विलान सेवा चालविणे हे सरकारचे काम नाही असे कवेळ गृहीत धरले तरीही सिंगापूर एअर लाईन्सची मालकी ही सिंगापूर सरकारचीच आहे, मात्र ही कंपनी व्यवसायिकदृष्ट्या चालविली जाते. त्याउलट एअर इंडियाच्या कामात सरकारी हस्तक्षेप असल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. बरे सर्वच खासगी विमानसेवा उत्कृष्ट चालतातच असे नव्हे, अन्यथा जेट, सहारा, किंगफिशर या खासगी विमानसेवा दिवाळ्यात निघाल्या नसत्या. सहा दशकापूर्वी राष्ट्रीयीकरणानंतर टाटांना आपली ही विमानसेवा परत आपल्या ताब्यात पाहिजे तर होतीच शिवाय विमानसेवा उत्कृष्ट चालविता येते हे सरकारलाही दाखवून द्यायचे होते. आता विस्तारा आणि एअर इंडिया यांच्या एकीकरणातून एअर इंडियाचा विश्वास दुणावेल आणि त्यांच्या पंखांनाही नवे बळ येईल. गेल्या जानेवारीतील अधिग्रहणानंतरचे महत्त्वाचे पाऊल म्हणून या विलिनीकरणाकडे बघितले जात आहे. येत्या तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. विलिनीकरणानंतर नव्या एअर इंडियाचे बाजारमूल्य एक अब्ज डॉलर एवढे होईल. येत्या पाच वर्षात एअर इंडिया जगातिक एक नामवंत विमानसेवा होण्याची पायाभरणी करीत आहे. सिंगापूर एअरलाइन्स या जगातील उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या व सिंगापूर सरकराचे सर्वाधिक भांडवल असलेल्या या कंपनीला भारतीय विमान सेवा बाजारपेठेचे नेहमीच आकर्षण वाटत आले होते. त्यांना भारतीय हवाई सेवेत नेहमीच रस होता, परंतु योग्य ती संधी मिळत नव्हती. यापूर्वीच म्हणजे १९९४ मध्ये भारतीय विमान वाहतुकीतील भागीदारीचा प्रयत्न केला होता. सन २०००मध्ये एअर इंडियातील वाटा खरेदीतही त्यांना रस दाखविला होता. परंतु टाटांनी एअर इंडियात सर दाखविल्यावर त्यांनी माघार घेतली असावी व नंतर टाटांशी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला असावा. सन २०१३ मध्ये अस्तित्वात आलेली टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड ही विस्ताराची होल्डिंग कंपनी आहे. विमान वाहतुकीच्या क्षेत्रातील ही घडामोड अनेक संभाव्य शक्यतांची नांदी आहे. विस्तारातील अनेक माजी कर्मचाऱ्यांना एअर इंडियाने नोकरी दिली आहे. व्यवस्थापकीय संचालक कॅपबेल विल्सन यांनी सिंगापूर एअरलाइन्समध्ये काम केले असल्याने याचा एअर इंडियास फायदाच होईल. यापूर्वी टाटा समूहाने एअर एशिया इंडियाच्या एअर इंडिया एक्स्प्रेससोबत विलिनीकरणाची घोषणा केलीच होती. पुढच्या वर्षीपर्यंत एअर एशिया ब्रॅन्ड समाप्त होईल. टाटा समूहाने पाच वर्षांचे कणखर लक्ष्य निर्धारित केले असून एअर इंडियाचा देशांतर्गत वाटा तीस टक्क्यांनी वाढविला जाणार आहे. या विलनीकरणामुळे दोन कंपन्यांमधील स्पर्धा संपली असून नव्या भरारीसाठी टाटा समूह सज्ज होतो आहे. एअर इंडियाने आता सुमारे साडेतीन हजार कोटी खर्च करुन विस्तार पर्कल्प हाती घेतला आहे, यात सध्याच्या विमानांचे आधुनिकीकरण, काही नवीन विमाने भाडेपट्टीने खरेदी करणे यावर खर्च केला जाईल. त्यामुळे आता टाटांनी एअर इंडियाचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलून टाकून नवा अवतार धारण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवाई सेवांची बाजारपेठे गेल्या दोन दशकात झपाट्याने वाढत गेली आहे व भविष्यातही वाढत जाणार आहे. देशातील मध्यमवर्गींयांची जशी संख्या वाढत जाईल तसे हे क्षेत्र फुलत जाणार आहे. आज दशातील विमान सेवेत इंडिगो ही प्रथम क्रमांकाची असून त्यांचा वाटा ५० टक्क्याहून जास्त आहे. त्याखालोखाल आता एअर इंडिया असेल. त्याशिवाय काही किरकोळ हवाई सेवा आहेत. परंतु भविष्यात खरी स्पर्धा ही इंडिगो व एअर इंडियात असणार आहे. असे असले तरीही देशातील विमान सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने अजूनही आणकी दोन नवीन विमान सेवा सुरु झाल्यास त्या चांगल्या प्रकारे टिकू राहू शकतात. खरे तर विमान सेवा बाजारातील स्पर्धात्मक वातावरण राहिलेच पाहिजे अन्यथा देशातील इंडिगो व एअर इंडिया या आपले स्थान बळकट करुन तिकीटांचे दर उतरु देणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करायला आणखी किमान दोन कंपन्या आपल्याकडे आसण्याची गरज आहे. यातून ही बाजारपेठ विस्तारण्यासही मदत होईल.

0 Response to "एअर इंडियाची भरारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel