-->
कलाकारांची चुप्पी / महागाईचा भडका

कलाकारांची चुप्पी / महागाईचा भडका

शनिवार दि. 11 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कलाकारांची चुप्पी
सध्या जे.एन.यु.मध्ये दीपिका पदुकोण गेल्यापासून व तिने युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून सिनेजगत खवळून उठले आहे. सोशल मिडियावर दीपिका ट्रोल तरी होतेय किंवा तिच्या समर्थनार्थ मोहीम आखली जात आहे. हिंदी चित्रपट कलाकारांमध्येही सरळसरळ दोन तट पडल्यासारखी स्थिती आहे. दीपिकाला अनेपेक्षितरित्या मोठा पाठिंबा मिळत आहे. ज्यांनी तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे, त्यांना उत्तर द्यायला काही जण हा चित्रपट दोनवेळा पाहाण्याचे आवाहन करीत आहेत. एकूणच दीपिकाला व छपाकला चांगली प्रसिध्दी या निमित्ताने मिळत आहे. शेवटी कोणी कोणती भूमिका घ्यावयाची ही त्यांची वैयक्तिक बाब आहे व तो त्यांचा व्यक्तीगत स्वातंत्र्याचा भाग झाला. मात्र यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहेरे मात्र कोणतीही भूमिका न घेता चूप आहेत. त्यांनी कोणतीही भूमिका घ्यावी परंतु व्यक्त व्हावे अशी अपेक्षा आहे. अभिनेता सुबोध भावे यांच्या सांगण्यानुसार, आपल्या देशात प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणीही व्यक्त होऊ शकतं. त्यावर इतर कुणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तसेच उगाचच टीका करत राहण्यातही काही अर्थ नाही. सोशल मीडियावर व्यक्त होणार्‍यांचे आणि त्यावर टीका करणार्‍यांचे मला काहीच वाटत नाही. कोणाचेही व्यक्त होणे आवडले नाही की त्यावर टीकेची झोड उठते. जगात काय घडतेय, याच्याशी त्या बोलणार्‍यांचा फारसा संबंध असतोच असे नाही. फक्त सोशल मीडियावर व्यक्त होणार्‍यांवर टीकाटिपण्णी करणे हेच त्यांचे काम असते. या सगळ्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, असे सुबोध भावे यांनी सांगून आपला अलिप्ततावाद जाहीर केला. सुबोध भावे राहुल गांधी बरोबर व्यक्त झाले होते, दीपिका जे.एन.यु.च्या विद्यार्थ्यांबरोबर व्यक्त झाली, सोनाली तर विविध विषयांवर आपले मत मांडत असते. अशा प्रकारे नेहमीच सेलिब्रेटी व्यक्त झाले तर बिघडले कुठे? दीपिकाला किंवा या विषयावर व्यक्त होणार्‍या कोणत्याही कलाकाराला इतके धारेवर धरले जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य बहाल करण्यात आलेले आहे. काही वर्षांपूर्वी दीपिका मानसिक आरोग्यावर व्यक्त झाली होती, तेव्हा ही टीका करणारी मंडळी कुठे गेली होती? बरे तिचे व्यक्त होणे संयमी नव्हते, तिची भाषा योग्य नव्हती किंवा तिची कृती आक्षेपार्ह होती असेही काही नव्हते. मग तिच्याबद्दल हे असे वाट्टेल ते बोलणे कशाला? देशाची नागरिक म्हणून व्यक्त होण्याचा तिला पूर्णपणे अधिकार आहे. प्रत्येक कलाकार हा माणूस आहे, स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. आचार विचारांचे इतर लोकांसारखेच अधिकार त्यालाही आहेत, हे कसे विसरून चालेल? मुळात सार्वजनिकरित्या एखादी भूमिका घेणे सोपे नाही. म्हणूनच बरेच लोक गप्प बसतात. त्यात कलाकारांनी घेतलेली भूमिका आपल्या विचारधारेशी मिळतीजुळती असली तर उदो उदो करायचा आणि नसली, तर अगदी हिन पातळीला जाऊन विरोध करायचा हे बरोबर नाही. कलाकार जर बोललेच नाहीत तर सेलिब्रिटी आपल्याच विश्‍वात असतात, ह्यांना काय पडलेय समाजाचे, देशाचे? असेही म्हणणारे आपणच म्हणतो.
महागाईचा भडका
नवीन वर्षाच्या प्रारंभीच पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांची वाढ केल्याने आता महागाईच्या भडक्यातआ णखीनच भर पडली आहे. त्याचबरोबर एक जानेवारीपासून रेल्वे प्रवास भाड्यामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात ही महागाई नाही असे म्हणणारे नममध्यमवर्गीय आपल्याकडे मोठ्या संख्येने आज आहेत. त्यांना या महागाईची झळ पोहोचत नाही हे वास्तव असले तरीही ही महागाईने जगणे मुश्कील होणार्‍यांची संख्याही मोठी आहे. आज आपण महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो, मात्र दुसरीकडे रात्रीच्या वेळी उपाशी रहावे लागणार्‍यांची संख्याही आपल्याकडे 25 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचाही विचार करावा लागणार आहे. रेल्वेने भाडेवाढ जाहीर करताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट दरामध्ये किलोमीटरमागे एक पैसा ते चार पैसे अशी वाढ केली आहे. पैशाच्या प्रमाणात झालेली ही वाढ किरकोळ स्वरूपाची वाटत असले तरीही प्रत्यक्षात एकूण प्रवासाच्या किलोमीटरचा अंदाज घेता ही रक्कम मोठी होते. म्हणजे पाचशे किलोमीटरच्या अंतरासाठी दहा रुपयांपर्यंतची वाढ होईल. रेल्वेने केलेल्या दरवाढीनुसार सर्वसाधारण वातानुकुलित नसलेल्या गाड्या आणि उपनगरीय सेवेत नसलेल्या गाड्यांची तिकिटे प्रति किलोमीटर एक पैशाने महागली आहेत. वातानुकुलित नसलेल्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर दोन पैशांची वाढ झाली आहे. तर, वातानुकुलित रेल्वे गाड्यांचा प्रवास चार पैशांनी महागला आहे. शताब्दी, राजधानी, दुरंतो अशा प्रीमियम गाड्यांनासुद्धा ही दरवाढ लागू होणार आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस 1384 किलोमीटर अंतर पार करते. किलोमीटरला चार पैसे या दराने या गाडीचे तिकीट  55 रुपयांपर्यंत महाग होईल. खानपान सेवेच्या शुल्कामध्ये वाढ केली नसल्याचे जाहीर केले असले तरी अलीकडेच त्यात वाढ करण्यात आली आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही. मुंबई उपनगरांतील लोकल प्रवाशांना मात्र यातून वगळले आहे. ही एक दिलासादाय बाब ठरावी.
--------------------------------------------------

Related Posts

0 Response to "कलाकारांची चुप्पी / महागाईचा भडका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel