-->
तडाखेबंद सुरुवात

तडाखेबंद सुरुवात

बुधवार दि. 13 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
तडाखेबंद सुरुवात
प्रियांका गांधी यांनी नाट्यमयरित्या राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांनी सोमवारी आपले बंधू व कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासमवेत उत्तरप्रदेशात केलेला रोड शो पाहता विरोधकांच्या म्हणजे भाजपाच्या मनात धडकी भरणे स्वाभाविकच आहे. राहूल गांंधी यांना ते ठरवून सोशल मिडियावर ट्रोल करु शकतात, परंतु प्रियांका यांधींना तसेही करु शकत नाहीत फार फार तर ते प्रियांका यांचे पती वड्रा यांच्यावर असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचे भांडवल करु शकतात. परंतु यातून प्रियांका याची वैयक्तीक प्रतिमा मलिन होऊ शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रियांका गांधी यांचा रोड शो एवढा जबरदस्त होता, लोकांचा याला एवढा उत्सुर्त प्रतिसाद लाभला होता की, मोदींची नेहमी स्तुतीसुमने करणारी चॅनेल्सना देखील हे दाखवण्यास भाग पडले. त्यामुळे प्रियांकाची ही जबरदस्त एन्ट्री संपूर्ण देशात पाहिली गेली. अर्थात याचा उत्तरप्रदेशातील मतदार आपल्याकडे खेचण्यास व आपली लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्यास कॉँग्रेस किती यशस्वी होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु सत्ताधार्‍यांच्या पायाखालील वाळू यामुळे निश्‍चितच घसरण्यास सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की. राहूल गांधी यांनी यावेळी बोलताना कॉँग्रेस पक्ष यावेळी बॅकफूटवर नाही तर तडाखेबंद फलंदाजी करण्यासाठीत निवडणुकीच्या रंणांगणात उतरणार आहे असे म्हटले होते. ते या रोड शोच्या निमित्ताने पटले आहे. उत्तरप्रदेशात कॉँग्रेसला आता अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावयाची आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेली तीन दशके या राष्ट्रीय पक्षाला येथे सत्ता नाही. अनेक त्यांचे मोहरे भाजपाच्या, समाजवादी पक्षाच्या किंवा मायावतीच्या बसपाच्या गाळाला लागले आहेत. कॉँग्रेसचा पूर्वी कट्टर समर्थक असलेला दलित, ब्राह्मण, मुस्लिम, ठाकूर हा समाज पक्षापासून दुरावला आहे. या समाजाला पुन्हा एकदा कॉँग्रेसच्या दावणीला बांधल्याशिवाय पक्षाला येथे सत्ता मिळणार नाही. कॉँग्रेसला सर्व समाजाला एकसंघ ठेवणारे राज्यात नेतृत्व नव्हते. आता प्रियांका गांधींच्या रुपाने ते सापडले आहे, असे म्हणता येईल. गेल्या काही वर्षात कॉँग्रेसने अनेक प्रयोग उत्तरप्रदेशात करुन पाहिले परंतु गेलेला जनाधार त्यांना पुन्हा मिळविता काही आलेला नाही. हा जनाधार पुन्हा प्राप्त करुन देणे हे अवघड काम आता प्रियांका गांधींवर आहे. यात त्या यशस्वी होतील किंवा नाही हे काळच ठरविल परंतु आजवर मरगळलेल्या कॉँग्रेसमध्ये पुन्हा जान आणण्याचे काम तरी सुरु झाले आहे. प्रियांका गांधी यांना आगामी राज्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी सध्या सुरु झाली आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तसे झाल्यास गांधी घराण्याचा मुख्यमंत्रीपदासाठीचा हा पहिला चेहरा असेल. उत्तरप्रदेश हे राज्य देशाच्या राजकारणात फार महत्वाचे आहे. एक तर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा याच राज्यातून येतात. त्यामुळे या राज्यात जो पक्ष जास्त जागांवर विजयी होतो त्याचाच पंतप्रधान होतो असा बहुतेक वेळचा अनुभव आहे. यावेळी कॉँग्रसने समविचारी पक्षांना एकत्र घेऊन भाजपाविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु समाजवादी पक्ष व मायावती यांनी आपली स्वतंत्र आघाडी करुन सेक्युलर मतांची विभागणी करुन अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करण्याचा डाव टाकला. यानंतर मात्र कॉँग्रेसने आपले शेवटचे प्रियांका अस्त्र काढले व सर्वच पक्षांची हवा गुल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रियंका यांची सकारात्मक देहबोली, त्यांचा सहज असलेला कार्यकर्त्यातील वावर, लोकांशी थेट संवाद साधण्याची कला याने हा रोड शो गाजला. केवळ उत्तरप्रदेशातीलच नव्हे तर देशभरातील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या रोड शोमुळे भलताच उत्साह उसळून आला आहे असे चित्र आहे. नुकत्याच झालेल्य तीन राज्यातील विजयानंतर कॉँग्रेसला एक मोठे बल प्राप्त झाले होते. आता मात्र यापुढे जाऊन कार्यकर्त्यांना एक नवा विश्‍वास, उत्साह मिळाला आहे. आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकांत प्रियंका काँग्रेसतर्फे प्रचार करत होत्या. पक्षाच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत, धोरणांमध्ये त्यांचा सहभाग अभावाने असे. तरीही सर्वच काँग्रेसजनांना प्रियंका आज ना उद्या पक्षाची सूत्रे हाती घेतील, गर्तेत गेलेल्या काँग्रेसला बाहेर काढतील, मोदींच्या राजकारणाला तगडे आव्हान देतील, असे वाटत होते. आता ते प्रत्यक्षात उतरले आहे. प्रियंका यांच्या एंट्रीमुळे विरोधकांना प्रामुख्याने भाजपाला काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करण्यास संधी मिळणार आहे. मात्र घरामेशाही ही प्रत्यक पक्षात आहे त्यामुळे हल्ली हा मुद्दा खूपच घासून गुळमुळीत झाला आहे. आता घराणेशाहीविरोधी लाटही नाही. त्यामुळे हा मुद्दा फारसा काही चालेल असे वाटत नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे सर्व जातींचा जनाधार आल्यास या पक्षाची राष्ट्रीय प्रतिमाही उजळू शकते. त्यांच्या नेतृत्वाने राज्यात काँग्रेस पुनरुज्जीवित झाल्यास, राज्यात सर्वाधिक लोकसभा जागा व विधानसभेत एकहाती विजय मिळाल्यास भारतीय राजकारणात तो शक्तिशाली असा राजकीय भूकंप असेल. परंतु या जर तरच्या गप्पा झाल्या. प्रियांका हे आव्हान पेलतील किंवा नाही हे आत्ता सागंणे कठीण असले तरी त्यांच्यासाठी अनेक घटक मात्र अनुकूल आहेत. भविष्यात आता राजकीय हालचाली कशा होतात हे पहावे लागेल. कॉँग्रेससाठी सुरुवात तरी तडाखेबंद झाली आहे.
---------------------------------------------

0 Response to "तडाखेबंद सुरुवात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel