-->
सरकारची इज्जत गेली

सरकारची इज्जत गेली

रविवार दि. २६ जून २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
सरकारची इज्जत गेली
-----------------------------------------
एन्ट्रो- ज्यांना अर्थशास्त्रातला ओ की ठो माहित नाही असे भाजपातील लोक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे काढले आहे व त्यांना मुदतवाढ देऊ नये अशी जाहीर टीका करीत होते. त्यामुळे उद्दीग्न झालेल्या व विचारवंत असलेल्या राजन यांना ही बाब मनाला लागणे स्वाभाविक होते. तसेच राजन हे अमेरिकेसारख्या प्रगत व मुक्त देशात काम केलेले असल्याने त्यांचे विचार हे प्रागतिक आहेत. ते कोणत्याही एका विचाराला बांधून घेण्यापेक्षा ते अर्थशास्त्राला व त्यातील संशोधनाला प्राधान्य देतात. त्यांच्या मते अर्थकारण व राजकारण या दोन भिन्न बाबी आहेत. राजन यांच्या अर्थशास्त्रातील अभ्यासाला जगातले नामवंत सलाम करतात, तसे त्यांचे कामही आहे. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या सर्वाच्चपदी काम करताना स्वातंत्र्य हवे होते. त्यांना राजकीय हस्तक्षेप नको होता. यापूर्वीच्या केंद्रातील कॉँग्रेसच्या सरकारने ते स्वातंत्र्य त्यांना बहाल केले होते. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिद्मबरम यांनी त्यांच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नव्हता. आता मात्र भाजपाचे सरकार आल्यापासून त्यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप सुरु झाला होता. त्याचबरोबर राजन यांची नियुक्ती कॉँग्रेसच्या सरकारने केलेली असल्याने भाजपाला ते नकोसे झाले होते...
-----------------------------------------------
कोणतेही सरकार चालविताना शासकीय पातळीवर फक्त माना डुलविणारे होयबा ठेवून चालत नाही तर स्वतंत्र विचारांची माणसे आपल्याला ठेवावी लागतात. तसेच जे तज्ज्ञ असतात त्यांचे विचार एैकून घेतल्यास व त्यानुसार पावले टाकल्यास त्याचा देशातील जनतेलाच उपयोग होऊ शकतो. अनेकदा तज्ज्ञ हे सरकारी पक्षाच्या राजकीय विचाराला बांधलेले नसतीलही, परंतु त्यांना काम करण्याची मूभा देऊन त्यांच्या चांगल्या गुणांचा वापर करुन घेणे हे शहाणपणाचे ठरते. परंतु सध्याचे  सरकार चालिवणार्‍या भाजपाला बहुदा आपल्यापेक्षा म्हणजे हिंदुत्ववादी विचारापेक्षा वेगळा विचार असणार्‍यांना आपल्या दाराशी उभेच करावयाचे नाही असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशार्‍यावर नाचणारे किंवा त्यांचच्या विचारांचा पाया असणारे हेच विचारवंत अशी बहुदा त्यांची ठाम समजूत आहे. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी आरुढ झाले त्यावेळी देश आर्थिक संकटाच्या दारात उभा होता. देशाला कधी नव्हे ते सोने गहाण टाकावे लागले होते. अशा वेळी नरसिंहराव यांनी देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणी राजकारण्याची नव्हे तर डॉ. मनमोहनसिंग यांची देशाच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली होती. मनमोहनसिंग यांनी आपली निवड काळाच्या ओघात खरी करुन दाखविली व देशावरील आर्थिक संकट संपुष्टात येण्यास मदत झाली. हे उदाहरण सांगण्याचे कारण म्हणजे नुकतेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या सेवेची तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा या पदावर काम करण्यास उत्सुक नसल्याचे जाहीर केले आहे. राजन यांच्या निर्णयामुळे संपूर्ण आर्थिक क्षेत्रास एक धक्काच लागला आहे. शेअर बाजाराचीही घसरण अजून सावरत नाही. अर्थमंत्र्यांनी तर त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार मानले आहेत. म्हणजे या सरकारला राजन हे नकोसे झाले होते हेच स्पष्ट होते. राजन हे जागतिक दर्ज्याचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. रघुराम राजन यांनी जगावरील २००८ सालच्या आर्थिक संकटाचे भविष्य अगोदरच वर्तविले होते. त्यांचे हे भविष्य एवढे खरे ठरले की या मंदीतून अजूनही जग सावरलेले नाही. त्यावरुन राजन यांचा अर्थशास्त्रातला अभ्यास व त्यांची दीर्घदृष्टी लक्षात येते. मात्र ज्यांना अर्थशास्त्रातला ओ की ठो माहित नाही असे भाजपातील लोक राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे काढले आहे व त्यांना मुदतवाढ देऊ नये अशी जाहीर टीका करीत होते. त्यामुळे उद्दीग्न झालेल्या व विचारवंत असलेल्या राजन यांना ही बाब मनाला लागणे स्वाभाविक होते. तसेच राजन हे अमेरिकेसारख्या प्रगत व मुक्त देशात काम केलेले असल्याने त्यांचे विचार हे प्रागतिक आहेत. ते कोणत्याही एका विचाराला बांधून घेण्यापेक्षा ते अर्थशास्त्राला व त्यातील संशोधनाला प्राधान्य देतात. त्यामुळेच राजन यांच्या अर्थशास्त्रातील अभ्यासाला जगातले नामवंत सलाम करतात, तसे त्यांचे कामही आहे. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या सर्वाच्चपदी काम करताना स्वातंत्र्य हवे होते. त्यांना राजकीय हस्तक्षेप नको होता. यापूर्वीच्या केंद्रातील कॉँग्रेसच्या सरकारने ते स्वातंत्र्य त्यांना बहाल केले होते. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिद्मबरम यांनी त्यांच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नव्हता. आता मात्र भाजपाचे सरकार आल्यापासून त्यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप सुरु झाला होता. त्याचबरोबर राजन यांची नियुक्ती कॉँग्रेसच्या सरकारने केलेली असल्याने भाजपाला ते नकोसे झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुदतवाढीचे निमित्त साधून त्यांच्यावर भाजपाने निशाना साधून त्यांना मुदवाढ काही दिली जाणार नाही असेच सुचित केले होते. त्यामुळे त्या मुदवाढीच्या निर्णयाअगोदरच राजन यांनी आपला निर्णय जाहीर केला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात फिरुन आपली प्रतिमा सुधारण्याची व जगातून गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारण्याचा निर्णयाचे दीर्घकालीन पडसाद उमटू शकतात. राजन यांच्यासारखा विव्दान व हुशार माणूस तुम्ही जपू शकत नाहीत तर तुम्ही जगातल्या भांडवलदारांच्या गुंतवणूक अपेक्षा कशा पूर्ण करणार असा सवाल उपस्थित होतो. खरे तर राजन यांना संपूर्ण सहकार्य करुन त्यांच्या अनभवाचा फायदा करुन घेण्याचे सरकारने ठरविले असते तर एक वेगळे चित्र निर्माण झाले असते. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या सरकारची लायकीच नाही अशी संप्तप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती स्वाभाविक आहे. त्यात काही चूकही नाही. राजन यांच्या जाण्याने भारताची जागतिक अर्थक्षेत्रातील पत घसरली आहे. गेल्या तीन वर्षातील राजन यांची कामगिरी अतिशय उत्तम होती. केवळ देशच नव्हे तर जग मंदीच्या तड्याख्यातून जात असताना राजन यांनी त्यातूनही देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोठे प्रयत्न केले, हे कौतुकास्पदच आहेत. त्यांनी सप्टेंबर २०१३ साली हे पद स्वीकारले त्यावेळी रुपयाची मोठी घसरण होत होती, चलनफुगवटा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याविरुद्ध लढण्यासाठी राजन यांनी कृती आराखडा तयार केला. आपल्या परकीय साठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनिवासी भारतियांची विदेशी चलनातील खाती वाढविली. याबाबतचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. परंतु भागवेकरण सर्वत्र सुरु केलेल्या या सरकारला राजन यांच्या जमेच्या बाजू कधीच दिसल्या नाहीत, ही दुदैवाची बाब आहे. राजन यांच्या देश सोडण्याने जे भारतीय देशासाठी काही तरी करावे अशी इच्छा बाळगून विदेशातून परत मायदेशी येऊ इच्छित होते त्यांच्या येण्याला खीळ लागू शकते. त्यामुळे आपल्याकडे विदेशात गेलेली आपली बुध्दीमत्ता परत आणण्यात दोन पावले मागे गेलो आहोत. मोदी सरकारने विदेशातून काळा पैसा आणण्याची केवळ घोषणाच केली होती. काळा पैसा काही परत आला नाहीच, उलट विदेशातून येणारी आपली बौध्दीक संपत्तीही येण्याचा मार्ग रोखला आहे. राजन यांनी या सरकारने दोन वर्षात ११ हजार कोटी रुपये खर्च केवळ स्वत:च्या प्रसिध्दीसाठी खर्च केले आहेत, असे खोटे वागणार्‍यांसोबत आपण काम करु शकत नाही असे जे म्हटले आहे त्यातून या देशातील जनतेने बोध घ्यावा. कारण सध्याचे मोदींचे सरकार काम करण्यापेक्षा जास्त प्रचार व मार्केटींगवर भर देत आहे. राजन यांनी हे उघडपणे सांगितले आहे. अशा रितीने स्पष्ट बोलणारे रघुराम राजन मोदींना नकोसे झाले आहेत.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "सरकारची इज्जत गेली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel