-->
प्लेबॉय ते पंतप्रधान

प्लेबॉय ते पंतप्रधान

सोमवार दि. 30 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्लेबॉय ते पंतप्रधान
एकेकाळी प्लेबॉय म्हणून लंडनमध्ये गाजलेले तसेच क्रिकेटचे मैदानही गाजवून आपल्या देशाला वर्ल्ड कप मिळवून देणार्‍या इम्रान खान यांची आता राजकीय इनिंगही यशस्वी ठरली असून लवकरच ते पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. गेल्या वेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाच्या बहुतंशी उमेदवारांच्या अनामती रकमा जप्त झाल्या होत्या. यावेळी मात्र हा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. अर्थात ही काही जादू नाही, तर यावेळी इम्रान यांच्या पक्षाला पाक लष्कराने व आय.एस.आय.ने दिलेला मुक पाठिंबा. गेल्या महिनाभरात इम्रान खान यांचा पक्ष यशस्वी व्हावा यासाठी लष्कराने विशेष मेहनत घेतली. बेनझीर भुत्तो यांचा पक्ष असो किंवा नवाझ शरीफ यांचा पक्ष असो या दोघांमध्ये घराणेशाही व भ्र्रष्टाचार या मुद्यावरुन जनतेत रोष होता. त्याचे कारणही तसेच आहे, कारण या पक्षात व त्यांच्या नेत्यांमध्ये माजलेला भ्रष्टाचार पाक जनतेला नकोसा झाला होता. यातून पाक लष्कर व आय.एस.आय.ला आपल्याकडे झुकणारा नव्या चेहर्‍याचा राजकारणी पाहिजे होता. त्यात इम्रान खान हे चपखल बसले. इम्रान खान यांचा विजय सुकर व्हावा यासाठी कट्टर दहशतवादी विचारांच्या लोकांना यावेळी जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात ुबे करण्यात आले होते. यातून मतांची विभागणी झाली व इम्रान यांच्या पक्षाचा विजय अनेक ठिकाणी सुकर झाला, असे बोलले जाते. आजवर पाकच्या इतिहासात कट्टर दहशतवादी विचारांचे लोक एवढ्या संख्येने निवडणुकीत कधीच उतरले नव्हते. इम्रान खान यांंनी देखील निवडणुक प्रचाराच्यावेळी भारतविरोधी गरळ ओकून लष्कराला व आय.एस.आय.ला साथ देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. परंतु सत्तेच्या जवळ येताच त्यांनी भारताशी दोस्ती करण्यासाठी हात पुढे केला आहे. यात अनेकांना आश्‍चर्य वाटलेही असेल. परंतु पाक राजकारणी हे असेच नेहमी वागत आलेले आहेत. इम्रान यांनी चीनशी देखील आपली मैत्री वाढविण्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या राजकाकरणाशी साजेसे असेच हे त्यांचे निर्णय आहेत. पाकिस्तानच्या केंद्रीय प्रतिनिधिगृहात 342 सदस्य आहेत. त्यातील 272 हे थेट जनतेतून निवडून येतात तर उर्वरित 60 जागा या महिला, धार्मिक अल्पसंख्य यांच्यासाठी राखीव असतात. निवडणुकीत किमान पाच टक्के वा अधिक मते पडणार्‍या पक्षांना त्यांच्या मतांच्या टक्केवारीनुसार या राखीव जागांसाठी प्रतिनिधी पाठवता येतात. सरकार स्थापनेसाठी 172 जागांची आवश्यकता असते, व त्या पक्षाचा पंतप्रधान म्हणून निवडला जातो. आपल्यासारखीच निवडणूक प्रक्रिया तेथे आहे. फारसा काही फरक नाही. पाकिस्तानात केंद्रीय निवडणुकांच्या बरोबरीने चार प्रांतिक सरकारांसाठीदेखील निवडणुका झाल्या. त्यात सिंध प्रांतात अपेक्षेप्रमाणे बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो झरदारी याच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीस यश मिळाले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री, नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना चांगली आघाडी मिळाली. अन्यत्र मात्र इम्रान यांच्या तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे यश लक्षणीय म्हणावे इतके आहे. जमात ए इस्लामी, जमात उलेमा ए इस्लाम, जमात ए उलेमा ए पाकिस्तान आणि तेहरीक ए जफारिया असे अनेक फुटकळ पक्ष जे मुल्लामौलवी चालवतात, त्यांनाही काही प्रमाणात प्रतिनिधीत्व यावेळी मिळाले आहे. मुंबईवरील हल्ल्यास जबाबदार असलेल्या हफीझ सईद हा विजय्ी झाला असला तरी त्याच्या पक्षास मात्र अन्य काहीच जागा मिळाल्या नाहीत, ही बाब आपल्यासाठी सुखद ठरावी. इम्रान खान यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना अशाच काही फुटकळ पक्षांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढील काळात अतिरेक्यांशी दोन हात करताना कठीण जाणार हे नक्की. इम्रान खान यांचे राहणीमान आजवर पाश्‍चिमात्य राहिले असले तरीही तयंचे विचार हे धर्मांधतेला पोषकच आहेत. त्यामुळे त्यांनी जे निवडणउक काळात भारविरोदी गरळ ओकले ते स्वाभाविकच होते. त्यामुळे असा धर्मवादी विचाराशी जवळीक असलेला पंतप्रधान पाकिस्तानात सत्तेवर येणे हे आपल्यासाठी काही चांगले चिन्ह नाही. या निवडणुकांत नवाझ शरीफ यांच्या पक्षाच्या हाती फारसे काही लागले नाही. परंतु देशात येताच त्यांना आणि त्यांची कन्या या दोघांनाही पाकिस्तानी न्याययंत्रणेने तुरुंगात डांबले. त्यांची कर्मभूमी असणारा पंजाब प्रांत सोडला तर अन्यत्र शरीफ यांना काही फारसे यश मिळाले नाही. पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासात 26 वर्षे लष्करी राजवट अस्तित्वात होती. त्यामुळे तेथे लोकशाही फारशी रुजलेली नाही. ज्यावेळी तेथे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार होते त्यावेळी त्यांना लष्कराच्या प्रभावाखालीच रहावे लागले आहे. लष्करात व राजकीय नेत्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, सरकारकडे जेमतेम तीन महिन्यांचा कारभार चालेल अशी गंगाजळी आहे, अमेरिकन कर्जाच्या ओझ्याखाली देश पूर्णपणे दबला आहे, अशा स्थितीत अनेक आव्हाने इम्रान खान यांच्यापुढे आहेत. इम्रान खान यांना लष्कराच्या हातातले बाहुले म्हणून राहून राज्यकारभार करावयाचा आहे, त्यामुळे त्यांना भारतासी मैत्रीचा हात कितीही पुढे केला तरी तो हात लष्कर मागे खेचणार आहे. असे असले तरी इम्रान खान यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा.
------------------------------------------------------------

0 Response to "प्लेबॉय ते पंतप्रधान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel