-->
कडाडलेला टोमॅटो

कडाडलेला टोमॅटो

संपादकीय पान शनिवार दि. ०४ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कडाडलेला टोमॅटो  
सर्वसामान्यांच्या जेवणात महत्वाचे स्थान असलेला टोमॅटो आता खिशाला परवडणारा राहिलेला नाही. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात तब्बल ८० रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या दोन वर्षात नरेंद्र मोदींच्या नेृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून अच्छे दिन येण्याचा केलेला वादा कधी पूर्ण होणार याकडे देशातील जनता आस लावून बसली आहे. हा वादा पूर्ण होईल असे काही वाटत नाही. कारण महागाई ही गेल्या दोन वर्षात झपाट्याने वाढत चालली आहे. डाळींच्या किंमतीने गेल्या वर्षात दोनशेचा आकडा पार केला. त्याचबरोबर वेळोवेळी कांदा, बटाटा यांच्या देखील किंमती वाढत होत्या. सध्या कांदा घसरलेला आहे मात्र टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात दुष्काळामुळे अनेक पिकांची हानी झाली ही वस्तुस्थिती आपण मान्य केली तरीही अनेकदा हे कारण नाममात्र ठरते. शेतकर्‍याकडून खरेदी करणारे दलालच यातील किंमती नियंत्रीत करीत असतात व तेच अशा प्रकारे किंमती वाढवितात. आजवर अनेकदा कृषी उत्पन्नाच्या बाबतीत हे सत्य पुढे आले आहे. परंतु या सट्टेबाज, साठेबाज दलालांना सरकार काही धडा शिकवायला पुढे सरसावत नाही. दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकर्‍यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले असे सांगण्यात येते. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती टप्प्यात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हाच टोमॅटो मुंबई आणि पुण्याच्या घाऊक बाजारात जातो, परंतु गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे धरणांच्या पायथ्याशी असणार्‍या बागायत शेतीसाठी पाणी पूर्णत: बंद केले गेल्याने, फळभाज्यांची लागवडच शेतकर्‍यांना थांबवावी लागली. याचा सर्वाधिक विपरित परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढू लागले आहेत. मार्केटमध्ये ३० ते ३५ ट्रक टेम्पोमधून सुमारे १४०० क्विंटलची आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी हीच आवक तिप्पट होती. आवक कमी असल्याने घाऊक बाजारातील दर ४० ते ४५ रुपये किलो झाला असून, किरकोळ बाजारातमध्ये टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मात्र दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्‍यांच्या हाती यातून काहीच पडणार नाही. दलालांचीच भर होणार आहे. यातून अच्छे दिन येणार कसे?
------------------------------------------------------------------

0 Response to "कडाडलेला टोमॅटो "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel