-->
सर्वसामान्यांची एस.टी.

सर्वसामान्यांची एस.टी.

रविवार दि. ०५ जूने २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
सर्वसामान्यांची एस.टी.
--------------------------------------------
एन्ट्रो- कोणताही सरकारी उपक्रम म्हणजे तो तोट्यातच असला पाहिजे हा नियम अगोदर खोडून काढला पाहिजे. त्यानुसार, एस.टी. देखील फायद्यात चालली पाहिजे. एकदा एस.टी.त बसलेल्याला पुन्हा त्यातून प्रवास करण्याची इच्छा झाली पाहिजे. सध्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एस.टी.ने आपल्या जाहीरातील फार महत्वाचा निर्णय् जाहीर केला आहे. यानुसार, वाढीव उत्पन्नातील २० टक्के रक्कम त्या बसच्या चालक व वाहकाला देण्याचा प्रस्ताव आहे. यातून एस.टी.चे उत्पन्न वाढेल व चालक व वाहकांना यातून एक वेगळा आनंद मिळू शकेल. कर्मचार्‍यात यातून स्पर्धा वाढेल व त्यांचा अंतिम परिणाम एस.टी.चे उत्पन्न वाढण्यात होऊ शकतो. अशा प्रकारचे कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देणारे प्रयोग राबविण्याची आज एस.टी.ला गरज आहे...
--------------------------------------
सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या एस.टी. नुकतीच आपल्या स्थापनेची ६८ वर्षे पूर्ण केली. एस.टी.चा पसारा गेल्या सहा दशकात मोठ्या प्रमाणात वाढला यात काहीच शंका नाही. गाव तिथे एस.टी. ही ऐकेकाळची घोषणा त्यांनी खरी करुन दाखविली. राज्यातील आज असे एकही गाव नाही की जिकडे एस.टी.चा मार्ग पोहोचलेला नाही. दिवसातून एकदा का असेना एस.टी. प्रत्येक गावात जातेच. परंतु खासगी बस उद्योजकांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात एस.टी. मागे पडली. अर्थातच याला अनेक सरकारी धोरणेच कारणीभूत ठरली. त्यामुळे एस.टी.ची पिछेहाट झाली. लाल डब्बा म्हणून या एस.टी.कडे कितीही नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तरीही हा लाल डब्बा अनेकांचा प्रवासाचे एक उत्तम साधन म्हणून आहे. ज्या संस्था काळाच्या ओघात बदलल्या नाहीत, मग त्या खासगी असोत वा सरकारी, त्यांचा मृत्यू हा अटळ ठरतो. त्यानुसार काळाच्या ओघात आता उशीर झालेला असला तरीही एस.टी.ने आपल्यात बदल करुन आणला नाही तर खासगी वाहतूक कंपन्या एस.टी.ला गिळून टाकेल यात काही शंका नाही. गेल्या काही वर्षात एस.टी.ने ज्या काही चांगल्या बाबी केल्या त्यातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई-पुणे सुरु केलेली सेवा. स्पर्धेच्या काळात एस.टी.ने आपल्यात बदल करुन आपल्याला पुढे कसे नेले पाहिजे याचे ते एक उत्तम उदाहरण ठरेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग सुरु झाल्यावर मुंबई-पुणे या प्रवासाचे अंतर झपाट्याने कमी झाले. त्यातच रेल्वेने पुण्याला जाणे ही काही क्रेझ राहिली नाही. मुंबई-पुणे महामार्गावरुन जाण्याकडे लोकांचा ओघ वाढला. अशा स्थितीत एस.टी.ने काळाची गरज ओळखून मुंबई-पुणे बस सेवा सुरु केली. यात वातानुकुलीत सेवेपासून बिगर वातानुकुलीत तसेच वॉल्हो बससेवा सुरु केली. त्याचबरोबर या मार्गावर वेळेत बस सोडल्या जातात. त्यामुळे अनेकदा प्रवासी खासगी बसमधून प्रवास करण्याऐवजी एस.टी.च्या बसने हा प्रवास करणे पसंत करतो. त्यामुळे या मार्गावर एस.टी.चाच वरचश्मा आहे. एस.टी.ने हाच पॅटन अन्य ठिकाणी राबवायला सुरुवात केली पाहिजे. सध्या एस.टी.च्या सेवांमध्ये स्थानिक गावपातळीवरील सेवा, राज्यांतर्गत सेवा व अन्य राज्यांना जोडणारी बस सेवा असे तीन टप्पे आहेत. यातील स्थानिक पातळीवरील अनेक भागात सध्या एस.टी.ला रिक्षा, आठ आसनी सितारे यांच्याशी स्पर्धा करावी लागते आहे. या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी चांगली सेवा व कमी भाडे ठेवावे लागेल. यातील अनेक मार्गांवर बसगाड्या नादुरस्त झाल्याचे चित्र आपल्याला वारंवार दिसते. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यासाठी हे चित्र थांबविले पाहिजे. त्यासाठी बसची चांगली देखभाल करावी लागणार आहे. त्याज्या जोडीला कमी भाडे ठेवून प्रवाशांना आकर्षित करावे लागेल. राज्यातील मोठ्या रुटसाठी एस.टी.ला चांगल्या गाड्या किंवा वॉल्होच्या धर्तीवर बस ठेवून खासगी बस चालकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्याच्या जोडीला लाल डब्याच्या गाड्या ठेवून कमी भाड्याचा पर्याय प्रवाशांपुढे ठेवावा लागणार आहे. अन्य राज्यात जाणार्‍या गाड्या या चांगल्या प्रकारातीलच ठेवाव्या लागणार आहेत. कारण त्यांची खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. एस.टी.ने आता सीझननुसार भाडे कमी जास्त करण्याची पध्दत सुरु केली आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरीही खासगी बस प्रमाणे अगदीच व्यवहारी होऊन चालणार नाही, हे देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रवाशांचे भाडे हे कमी ठेवावे लागणार आहे. एस.टी. चालक व वाहकांना प्रवाशांनी कशा प्रकारे आदरतिथ्याने बोलायचे यासंबंधी प्रशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. दीर्घपल्याच्या एस.टी.च्या गाड्या या जेवढ्या आरामदायी तेवढ्याच त्यातील वाहकाने आबदीने प्रवाशांशी बोलणे देखील गरजेचे असते. या गाड्या म्हणजे रस्त्यावरचे विमान वाटले पाहिजे. कोणताही सरकारी उपक्रम म्हणजे तो तोट्यातच असला पाहिजे हा नियम अगोदर खोडून काढला पाहिजे. त्यानुसार, एस.टी. देखील फायद्यात चालली पाहिजे. एकदा एस.टी.त बसलेल्याला पुन्हा त्यातून प्रवास करण्याची इच्छा झाली पाहिजे. सध्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एस.टी.ने आपल्या जाहीरातील फार महत्वाचा निर्णय् जाहीर केला आहे. यानुसार, वाढीव उत्पन्नातील २० टक्के रक्कम त्या बसच्या चालक व वाहकाला देण्याचा प्रस्ताव आहे. यातून एस.टी.चे उत्पन्न वाढेल व चालक व वाहकांना यातून एक वेगळा आनंद मिळू शकेल. कर्मचार्‍यात यातून स्पर्धा वाढेल व त्यांचा अंतिम परिणाम एस.टी.चे उत्पन्न वाढण्यात होऊ शकतो. अशा प्रकारचे कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देणारे प्रयोग राबविण्याची आज एस.टी.ला गरज आहे. विद्यमान परिवाहनमंत्री दिवाकर रावते यात पुढाकार घेतील असे वाटते. प्रवाशांच्या विम्यासाठी एस.टी.ने त्यांच्यावर भुर्ंदंड न घालता स्वत: भार सोसून विमा दिल्यास एक मोठा दिलासा प्रवाशांना मिळू शकतो. भविष्यातील वाटचाल करताना एस.टी. ने असा प्रकारे आता कात टाकण्याची आवश्यकता आहे. एस.टी. ही सर्वसामान्यांसाठी जशी आहे तशीच नव्याने विकसीत होत असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी प्रवाशांची मोठी बाजारपेठ आहे. बदलत्या काळानुरुप एस.टी.ने आपल्यात बदल केल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल.
---------------------------------------------------------

0 Response to "सर्वसामान्यांची एस.टी."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel