-->
विधानपरिषद अखेर बिनविरोधच

विधानपरिषद अखेर बिनविरोधच

संपादकीय पान सोमवार दि. ०६ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विधानपरिषद अखेर बिनविरोधच
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ अर्ज आल्याने यावेळी निवडणूक होणार व चुरशीची होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपाच्या मनोज कोटक व प्रसाद लाड यांनी माघार घेतल्याने हा फुसका बारच ठरला. परिणामी विधानपरिषदेसाठी दहा जण बिनविरोध निवडून आले. भाजपाचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन व कॉँग्रसेचा एक असे दहा उमेदवार निवडून आले. जर भाजपाने उमेदवार मागे घेतले नसते तर विधानपरिषदेच्या या निवडणुकीत घोडेबाजार झाला असता, हे नक्की होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चर्चेनंतर भाजपाच्या उमेदवारांनी माघार घेतली असे वृत्त आहे. या दोघा नेत्यांमधील चर्चा काय झाली हे समजणे अवघड आहे. मात्र पुढील काळात कोणता समझोता झाला त्याचे संकेत मिळू शकतात. असो. खरे तर या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार सरळ निवडून येत होते. मात्र त्यांनी मनोज कोटक व प्रसाद लाड या दोघांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाला नेमके काय करायचे आहे, याचा अंदाज येत नव्हता. भाजपाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यावर भाजपातील जुन्या जाणत्यांना उमेदवारी डावलली व नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली असा आरोप झाला होता. यात तथ्यही होते. यातील आर.एन.सिंग व प्रवीण दरेकर यांच्याबाबत प्रामुख्याने आक्षेप होते. आर.एन. सिंग हे कधी भाजपात होते असा सवालही करण्यात आला होता. हे सिंग महाशय कॉँग्रेसच्या काळात गाजलेल्या कृपाशंकरसिंग यांचे निकटवर्ती आहेत. जे सत्तेवर असतील त्यांच्या भोवती ते असतात असे बोलले जाते. प्रवीण दरेकर हे दोन वर्षापूर्वी मनसेचा त्याग करुन भाजपात आले. त्यांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्यावर करोडो रुपयांच्या भ्रष्टाराचा आरोप आहे. अशा उमेदवाराला विधानपरिषदेवर पाठविण्याचे कारणच काय, असा भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांचा सवाल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या जाणत्या व अभ्यासू असलेल्या माधव भंडारींना मात्र डावलण्यात आले. पुढील वर्षी येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंदाज घेऊन ही तिकीटे देण्यात आली असे म्हणणेही अयोग्य ठरेल. सिंग हे हिंदी भाषिकांची मते खेचणारे काही नेते नाहीत. ते हिंदी भाषिक असले तरीही त्यांच्यामागे किती हिंदी भाषिक आहेत हा एक संशोधनाचा विषय ठरेल. एक आहे की, ते निवडणुकीत पैसे उभे करु शकतात. दरेकरांच्या बाबतीतही तसेच आहे. जे मागच्या विधानसभेला पडले होते त्यांच्या मागे किती लोक आहेत त्याचा अंदाज येऊ शकतो. दरेकर आल्यामुळे भाजपाचे नगरसेवक काही वाढणार नाहीत. मग त्यांना उमेदवारी का दिली गेली, असा सवाल आहे. माधव भंडांरींशी तुलना करता दरेकर पैसा जास्त उभारु शकतात हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. यात अभ्यासू, विचारवंत लोक आले पाहिजेत. यातील झालेली चर्चा ही खालच्या सभागृहालाही मदतकारक ठरु शकते. त्यामुळे या सभागृहाचे एक पावित्र्य आहे. ते जपले गेले पाहिजे.

0 Response to "विधानपरिषद अखेर बिनविरोधच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel