-->
सोन्याचा धूर! (अग्रलेख )

सोन्याचा धूर! (अग्रलेख )

दिव्य मराठी | Nov 24, 2012 EDIT
सोने खरेदीसाठी कर्जे देऊ नयेत, असा एक महत्त्वपूर्ण आदेश गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिला आहे. अर्थात हा आदेश सर्वसामान्यांसाठी नाही, तर सोन्याच्या व्यापार्‍यांसाठी आहे. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणाचे सर्वात प्रथम स्वागत केले पाहिजे. कारण व्यापारी सोन्याच्या वाढत्या किमतीचा लाभ घेण्यासाठी बँकांकडून कज्रे घेऊन त्यातून नफेखोरी करण्यासाठी बँकांचा पैसा वापरत होते. बँकांनाही ही कज्रे अनुत्पादित होणार नाहीत याची खात्री वाटत असल्याने ही कज्रे देण्यात कोणताही धोका वाटत नव्हता.

बँकांनी एखाद्या उद्योगाला कर्ज दिले तर ते बुडीत खात्यात जाण्याचा धोका असतो. मात्र सोन्याच्या बाबतीत असे होत नाही. त्यामुळे ही कज्रे देताना बँका आपली सुरक्षितता पाहत असल्या तरी या कर्जामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विनाकारण बोजा पडत होता. गेली काही वर्षे सोन्याच्या किमती दरवर्षी सरासरी किमान 25 टक्क्यांनी वाढत आहेत. या वाढत्या किमतीचा लाभ घेत सोन्याचे व्यापारी सरासरी 12 टक्के व्याजाने बँकांकडून कज्रे घेत आणि सोन्याच्या किमती वाढल्यावर ते विकून कर्ज फेडून टाकीत. सोन्याचे व्यापारी बँकांकडून मिळणार्‍या कर्जाचा वापर करून स्वत:च्या खिशात नफा घालीत होते. कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त नफा कमावणे सोन्याच्या व्यापार्‍यांना यामुळे शक्य झाले होते. आता याला प्रतिबंध घातल्याने या व्यापार्‍यांना रोखीने सोने खरेदी करावे लागणार आहे. सोन्याची खरेदी जशी वाढते तसा आपल्या अर्थव्यवस्थेला मात्र ताण सहन करावा लागतो. कारण आपल्याला सोने आयात करावे लागते. गेल्या वर्षी आपण 800 टनांहून जास्त सोन्याची खरेदी केली.
आपल्या खालोखाल चीनची सोने आयात होते. फक्त सोने खरेदीतच चीन आपल्याला मागे टाकू शकलेला नाही. पूर्वी आपल्याकडे सोन्याचा धूर निघे असे म्हटले जाई. आजही आपल्याकडे सोन्याचे उत्पादन दोन टक्केही नाही, मात्र 800 टनांहून जास्त सोने आयात करून आपण आपली खरेदीची भूक भागवतो. सोन्याची ही खरेदी म्हणजे काही समृद्धी नव्हती तर तो एक आभास होता. आजही या स्थितीत काही फरक पडलेला नाही. सोन्याची खरेदी जशी वाढते तसा मागणीमुळे डॉलर महाग होत जातो. डॉलर महागल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतात. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत होणारे हे अवमूल्यन आपल्याला परवडणारे नाही. आपण सध्या पेट्रोलियम पदार्थांची सर्वात जास्त आयात करतो. त्याखालोखाल आपली खरेदी ही सोन्याची होते. संपूर्ण अर्थव्यवस्थाच अवलंबून असल्याने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी थांबवणे आपल्याला शक्य नाही. सोन्याचे मात्र तसे नाही. सोन्याची खरेदी कमी झाली तरी आपल्या अर्थव्यवस्थेवर काही नकारात्मक परिणाम होणार नाहीत. त्यामुळेच सोन्याची खरेदी र्मयादित व्हावी आणि सोने खरेदीसाठी म्हणजेच अनुत्पादित बाबींसाठी बँकांचा पैसा अडकू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले. रिझर्व्ह बँकेचे हे धोरण स्वागतार्ह असले तरीही सोने खरेदीचा मोह आपल्याकडे कुणाला टाळता आलेला नाही. देशातला गरीब असो वा र्शीमंत, प्रत्येक जण सोन्याची आपल्या आर्थिक कुवतीनुसार खरेदी करीतच असतो.
 केवळ लग्नसराईसाठीच आपल्याकडे सोन्याची खरेदी केली जाते असे नाही तर सोन्याकडे एक गुंतवणुकीचे चांगले साधन म्हणून पाहिले जाते. सोन्यातील गुंतवणूक ही व्यक्तिश: त्याला लाभदायक असली तरीही त्यामुळे देशाच्या अर्थकारणाला काही चालना मिळत नाही. सोन्यातील गुंतवणूक ही ‘स्थितिशील’च असते. सोन्याच्या किमती जेवढय़ा झपाट्याने वाढत आहेत ते पाहता खरे तर त्याची खरेदी कमी व्हावयास पाहिजे. मात्र असे होत नाही. दिवसेंदिवस सोन्याची खरेदी वाढतच जात आहे आणि ही खरेदी काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. सोन्याची खरेदी वाढत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे गरज भासल्यास सोन्याचे कधीही झटकन पैशात रूपांतर होण्याची असलेली सुविधा. देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात तुम्हाला सोने विकून पैसे उभारता येण्याची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळेच ग्रामीण भागातला शेतकरी असो किंवा शहरी मध्यमवर्गीय, या दोघांनाही सोने हे एक ‘चलन’ म्हणून फार उपयोगी पडते. बरे सोन्याच्या किमती ज्या गतीने वाढल्या आहेत ते पाहता सोन्यातील गुंतवणूक ही सर्वांनाच मोहदायी ठरली आहे. गेल्या दहा वर्षांत तर सोने सहापटींनी वधारले आहे. त्यामुळे आपल्याकडे सोने खरेदीचा ओघ सतत वाढत आहे. त्यातच आपल्याकडे सोने खरेदीची परंपरा आहे. चीनमध्येदेखील याच परंपरेमुळे सोन्याची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होते.
 अमेरिका, युरोपसारख्या विकसित देशांत मात्र सोन्याची खरेदी करण्यास फार कुणी उत्सुक नसतो. तिकडे मात्र देश आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या या वाढत्या मागणीपोटी आपण 2015 मध्ये सुमारे 100 अब्ज डॉलर खर्च करू, असा अंदाज आहे. सोने खरेदीसाठी आपल्याला एवढे विदेशी चलन खर्च करणे परवडणारे नाही. पुढील काळातील हा धोका लक्षात घेऊनच रिझर्व्ह बँकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र या धोरणामुळे सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका जसा आहे तसेच मागणी व पुरवठा यातील तफावत वाढल्याने सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अर्थात सोने महाग झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेला काहीच फरक पडणार नाही. नाराज होईल तो सोन्याचा खरेदीदार. परंतु सोने कितीही महाग झाले तरी त्याची खरेदी करण्याची आपल्याकडे मानसिकता आहेच!

0 Response to "सोन्याचा धूर! (अग्रलेख ) "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel