-->
‘टेकओव्हर टायकून’ (अग्रलेख)

‘टेकओव्हर टायकून’ (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Apr 16, 2013 EDIT


रामा प्रसाद गोयंका यांच्या निधनाने मनाने अस्सल बंगाली, परंतु जागतिक दृष्टी लाभलेले एक ज्येष्ठ सृजनशील उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्यानंतरचा लाल फितीचा कारभार असलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा कालखंड आणि 1991 नंतर सुरू झालेले आर्थिक उदारीकरणाचे युग अशा महत्त्वाच्या तिन्ही टप्प्यांचे ते साक्षीदार होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, 60 ते 80च्या दशकात लाल फितीच्या कारभारामुळे आपली अर्थव्यवस्था बहुतांशी ‘बंदिस्त’ असताना त्यांनी तब्बल 10 कंपन्या ‘टेकओव्हर’ केल्या होत्या. त्यामुळेच ते त्या काळातले ‘टेकओव्हर टायकून’ समजले जात. आताच्या काळात कंपन्यांचे ‘टेकओव्हर’ ही बाब सर्रास झाली आहे. किंबहुना ती काळाची गरज ठरली आहे. मात्र, 90च्या अगोदरच्या तीन दशकांत ज्या वेळी ‘टेकओव्हर’ हे ‘कॉर्पोरेट पाप’ समजले जाई, त्या काळात आपल्या उद्योगसमूहाच्या विस्तारासाठी कंपन्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावणारे आर.पी.जी. हे एकमेव उद्योगपती होते. यात त्यांना कधी अपयश आले, तर कधी यश. मात्र, अपयशाने ते कधीच डगमगले नाहीत. बंगालमधील एका सधन व्यापारी मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या आर.पी.जी.च्या घरात व्यापाराची बीजे रोवलेली होती. मात्र, आयुष्यभर व्यापार करत बसलो तर आपल्याला पुढे जाता येणार नाही, हे त्यांनी ओळखले आणि उत्पादन क्षेत्रात उडी घेतली. त्यामुळेच त्यांना वडिलांकडून वाटणी झाल्यावर 105 कोटी रुपयांची आलेली मालमत्ता ते तीन दशकांत 30 हजार कोटी रुपयांवर नेऊ शकले. निव्वळ व्यापारात जर ते अडकले असते तर त्यांना आपल्या उद्योग समूहाचे एवढे मोठे साम्राज्य करता आले नसते. टायर, कार्बनब्लॅक, औषधे, वीज वाहन, करमणूक, माध्यम, रिटेल या उद्योगांत त्यांनी कंपन्या स्थापन करून (किंवा ताब्यात घेऊन) आपल्या समूहाचा ठसा देशातील कॉर्पोरेट क्षेत्रावर उमटवला आणि आर.पी.जी. एंटरप्रायजेस हा एका मोठ्या उद्योगसमूहाच्या रूपाने नावारूपाला आणला. कंपन्या ताब्यात घेऊन विस्तार करण्याचा सध्याच्या काळातील मंत्र त्यांनी 60च्या दशकात जपला होता.
आता टाटा, बिर्ला, मित्तलसारखे उद्योगसमूह जागतिक पातळीवरील एखाद्या कंपनीचे ‘टेकओव्हर’ सहजरीत्या करतात, परंतु देशातील पहिले ‘टेकओव्हर’ त्यांनी सिएट टायर्स या कंपनीचे केले. त्या काळी या कंपनीत असलेल्या इटालियन कंपनीचे भांडवल खरेदी करण्यासाठी इटलीला 11 वेळा फे-या मारल्या. शेवटी त्यांचे हे पहिले ‘टेकओव्हर’ प्रत्यक्षात उतरले. त्यानंतर त्यांनी नऊ कंपन्या ताब्यात घेतल्या, मात्र सिएटचे त्यांनी त्या काळी केलेले ‘टेकओव्हर’ हे देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक आदर्श ठरले. त्यांनी घेतलेला हा अचूक निर्णय होता. मात्र, त्यांचा अंदाज चुकला तो टेलिकॉम उद्योगाबाबत. त्यांनी व्होडाफोन व सेलफोन या कंपन्यांच्या साहाय्याने आर.पी.जी. सेल्युलर ही संयुक्त कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी चांगला नफा कमावत असतानाही त्यांनी 2003मध्ये या कंपनीतील आपला वाटा एअरसेल या कंपनीला विकला आणि टेलिकॉम उद्योगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पूर्णत: चुकला. कारण त्यानंतरच टेलिकॉम उद्योगाची देशात झपाट्याने भरभराट झाली. जर यातून आम्ही बाहेर पडलो नसतो तर आमचा समूह आणखी मोठा झाला असता, असे आर.पी.जी. यांनी एका मुलाखतीत सांगून आपल्या झालेल्या चुकीची जाहीरपणे कबुलीही दिली होती. आपल्या उद्योगसमूहाचा विस्तार करत असताना आपला संचार सर्वत्र ठेवून राजकारण, चित्रपट, क्रीडा या क्षेत्रांत अनेक मित्र जोडले. देव आनंद, लता मंगेशकर, मीरा कुमारी या चंदेरी दुनियेशी निगडित असलेल्या कलाकारांशी त्यांची नेहमी ऊठबस असे. यातूनच त्यांनी 1985मध्ये ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया लि. ही कंपनी (आताची सारेगम इंडिया लि.) ताब्यात घेऊन संगीत क्षेत्रात प्रवेश केला. ग्रामोफोन या कंपनीकडे भारतीय चित्रपट संगीताचा एक खजिनाच आहे. या कंपनीकडे त्यांनी कधीच नफा कमावण्याच्या दृष्टीने पाहिले नाही, तर संगीताचा आनंद रसिकांना मिळावा यासाठी ही कंपनी चालवली. चित्रपट क्षेत्राप्रमाणेच क्रिकेटपटू विनू मंकड, पॉली उम्रीगर यांच्याशी त्यांची खास दोस्ती होती. कोलकाता विद्यापीठाच्या क्रिकेट चमूतून ते राष्ट्रीय पातळीवर खेळलेले असल्याने त्यांना क्रिकेटविषयी विशेष रस होता. राजकारणातही त्यांनी अनेक मित्र जोडले. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद असले तरीही वैयक्तिक पातळीवर मैत्री होती. कोलकाता शहराला वीजपुरवठा करणारी सी.ई.एस.सी. ही कंपनी त्यांनी ज्या वेळी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या ज्योती बसंूनी त्यांना जोरदार विरोध केला होता. मात्र, सोमनाथ चटर्जींशी त्यांच्या असलेल्या मैत्रीचा त्यांनी ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी कधीच ‘वापर’ केला नाही. किंवा सोमनाथ चटर्जींनीही याबाबतचा विरोध कमी करण्यास कधीच ज्योती बसूंना सांगितले नाही. इंदिरा गांधी व नेहरू घराण्याशी त्यांची जवळीक होती. इंदिरा गांधींच्या विश्वासू उद्योगपतींच्या रांगेत आर.पी.जी. सर्वात पहिले होते. आणीबाणी उठल्यावर सत्तांतर झाले आणि सत्तेत आलेल्या जनता पार्टीने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता; परंतु त्यांनी आपली इंदिरानिष्ठा काही सोडली नाही. त्यामुळेच शेवटपर्यंत नेहरू-गांधी घराण्याच्या तीन संस्थांवर ते विश्वस्त म्हणून कार्यरत राहिले.   तीन वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये समूहाची वाटणी करून देऊन वेळीच निवृत्तीचा मार्ग पत्करला होता. कुठे थांबायचे, याचे अचूक भान असलेल्या रामा प्रसाद गोयंका यांच्या निधनाने देश केवळ एका उद्योगपतीला नव्हे, तर वैश्विक मंत्र देणा-या दार्शनिकाला मुकला आहे.

0 Response to "‘टेकओव्हर टायकून’ (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel