-->
यकृत प्रत्यारोपणावर जनजागृती आवश्यक : डॉ. अनिल सूचक

यकृत प्रत्यारोपणावर जनजागृती आवश्यक : डॉ. अनिल सूचक

दिव्‍य मराठी | Apr 15, 2013 NIRAMAYA


यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण ही आता फार काही कठीण बाब राहिलेली नाही. प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान गेल्या दशकात झपाट्याने वाढले आहे. यकृत निकामी झालेल्या अनेकांचा यातून पुनर्जन्म झाला आहे, परंतु याबाबत अजून समाजात जागृती नाही. यकृत प्रत्यारोपण कसे करतात? यकृत देणगीदार यातून कसा ठिकठाक  होऊ शकतो? यकृतदात्यामुळे एखाद्याचे प्राण कसे वाचू शकते? याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील नामवंत डॉ. अनिल सूचक यांनी देशव्यापी मोठी चळवळ उभारली आहे. स्वत:च्या यकृताचे प्रत्यारोपण झाल्यावर त्यांना या जनजागृतीची आवश्यकता वाटली आणि यातून त्यांनी ही चळवळ उभारली. त्यांच्याशी याबाबत केलेली चर्चा.
यकृत प्रत्यारोपणाच्या या चळवळीला आपण वाहून घेण्याचे का ठरवले ?
माझे स्वत:चे यकृत प्रत्यारोपण झाले आहे. मी माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर इंटर्नशिप करीत असताना माझ्या स्कूटरला मुंबईत अपघात झाला. यात मला पोटाला मोठा मार लागला आणि रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झाला. अशा स्थितीतूनही बचावलो आणि अगदी ठिकठाक झालो. मात्र, त्यानंतर आठ वर्षांनी मला पन्हा त्रास सुरू झाला. माझ्या पायाला सूज यायची व थोडेसे काम केले तरी थकवा यायचा. वैद्यकीय व्यवसायात असल्याने कामाचा ताण जास्त होता. त्यामुळे कदाचित असे होत असेल असे सुरुवातीला मला वाटले. परंतु नंतर हे दुखणे काहीतरी वेगळे आहे हे जाणवले. यातून मी सर्व चाचण्या केल्या. या चाचण्यात माझ्या यकृताची हानी झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टर असूनही मी पूर्णत: हादरलो. मुले लहान होती आणि माझ्या डोळ्यासमोर मला मृत्यू दिसत होता. परंतु लवकरच यातून मी सावरलो आणि याचा मुकाबला करण्याचे ठरवले. माझ्या पूर्वीच्या अपघातात मला जे रक्त देण्यात आले होते त्यातून माझ्यात जिवाणू गेले आणि त्या जिवाणूंनी माझ्या यकृतावर हल्ला केला होता. त्या काळी रक्त देताना आतासारखी खबरदारी घेतली जात नसे. फक्त रक्ताचा गट जुळला की रक्त रोग्याला दिले जाई. माझे त्या वेळी प्राण जरूर वाचले, परंतु दीर्घकालीन रोग माझ्या नशिबी आला होता. यकृत प्रत्यारोपणाशिवाय काहीच पर्याय नाही हे स्पष्ट झाल्यावर मी याचा पूर्ण अभ्यास करण्याचे ठरवले. भारतात कुठे प्रत्यारोपण होते याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या काळी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई ही प्रत्यारोपणाची मुख्य केंद्रे होती. (आजही हीच केंद्रे आघाडीवर आहेत. मुंबईसारख्या महानगरात मात्र आता कुठे याची सुरुवात होते आहे.) मला यकृतदाता मिळवण्यासाठी मोठी वणवण करावी लागली. शेवटी माझ्या मेहुण्याने मला यकृत देण्याचे मान्य केले. आता माझ्या ऑपरेशनला सहा वर्षे पूर्ण झाली असून मी ठिकठाक आहे. पथ्यपाणी आजही पाळावे लागते. मात्र, पूर्वीप्रमाणे मी तेवढ्याच जोमाने डॉक्टरी व्यवसाय करतो. बरे झाल्यावर मी यकृतदानाची माहिती लोकांना देण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवले होते. मला यातून जाताना ज्या अनेक अडचणी आल्या त्या इतरांना येऊ नयेत यासाठी indianliverfoundation.com ही वेबसाइट सुरू केली.(संपर्क- 9820080151) नामवंत अभिनेता इम्रान हाश्मी हा माझा पेशंट असल्याने त्याचा माझा परिचय होता. त्याने माझ्यासोबत विनामूल्य काम करण्याची तयारी दाखवली आणि तो आमच्या चळवळीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला. एका कार्यक्रमात आमच्यासोबत नामवंत अभिनेता मिथुन चक्रवर्ती सहभागी झाला होता. अशा प्रकारे सेलिब्रिटींना यात सहभागी करून आम्हाला ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायची आहे.
यकृतात दोष कशामुळे होतो?
यकृतात दोष प्रामुख्याने दोन कारणांमुळे होतो. एक महत्त्वाचे कारण म्हणजे अतिमद्यपानामुळे किंवा दुसरे कारण म्हणजे हिपॅटायटिसमुळेही जिवाणू आपल्या शरीरात जाऊन ते आपल्या यकृतावर हल्ला करतात. अतिमद्यपान हे शरीरास घातकच आहे. त्यामुळे यकृत संपूर्णपणे बिघडू शकते. हिपॅटायटिसची लस आता उपलब्ध असल्याने त्याद्वारे यकृतावर होणारा हल्ला आपण टाळू शकतो. त्यासाठी वेळीच हिपॅटायटिसची लस घेणे गरजेचे आहे.
यकृत प्रत्यारोपण म्हणजे काय?
यकृत प्रत्यारोपण म्हणजे निकामी झालेले यकृत पूर्णत: काढून टाकून त्या जागी नवीन यकृत बसवणे. त्यासाठी यकृतदाता शोधणे गरजेचे असते. यकृत प्रत्यारोपणाचे ऑपरेशन आता फार काही अवघड राहिलेले नाही. पूर्वी या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 20 तास लागत. आता ही शस्त्रक्रिया आठ ते दहा तासांवर आली आहे. आपल्या शरीरातील यकृताचे दोन भाग असतात. हे दोन भाग या शस्त्रक्रियेत कापले जातात. काही काळाने हे कापलेले यकृत पूर्वस्थितीला येते आणि दोघेही उत्तम होतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेत सर्वात प्रथम रोग्याचे खराब झालेले यकृत काढून टाकले जाते. त्यानंतर यकृतदात्याचे यकृत अर्धे कापले जाते आणि ते रोग्याला लावले जाते. ज्याने यकृत दान दिलेले असते त्याचे यकृत पुढील तीन महिन्यांत पूर्णपणे वाढून पूर्वीच्या स्थितीत येते. त्यानंतर यकृतदाता ठीक होऊन पूर्वीप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतो. इकडे रोग्याला लावलेले अर्धे यकृत टप्प्याटप्प्याने वाढून पूर्ण स्थितीला पोहोचते. मात्र रोग्याला प्रकृती जपावी लागते. त्याच्या पोटात विषाणूंचा मारा होणार नाही याची खात्री सतत घ्यावी लागते.
यकृत प्रत्यारोपणाची चळवळ करण्याची आपणाला गरज का वाटली ?
सध्या आपल्याकडे दरवर्षी सुमारे एक लाख लोक यकृत निकामी झाल्याने मरण पावतात. यातील 50 हजार लोक हिपॅटायटिस लस न घेतल्याने या रोगाचे बळी ठरतात. त्यामुळे जर ही लस घेण्यासाठी जनजागृती केली तर आपण मोठ्या संख्येने यकृत निकामी होण्याचे रोगी टाळू शकतो. देशात सध्या जेमतेम एक हजार ऑपरेशन प्रत्यारोपणाची होतात. ही संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी यकृतदाते मिळण्याची आवश्यकता आहे. यकृत हे जसे जिवंत माणूस देऊ शकतो तसे अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रोग्यांचे यकृत काढून रोग्याला लावता येते. तामिळनाडून अशा प्रकारे ‘ब्रेन डेड’ झालेल्या रोग्यांचे यकृत काढण्याचा कायदा संमत झाला हा कायदा देशपातळीवर विविध राज्यांत होणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने मी ही चळवळ उभारण्याचे ठरवले.
यकृत प्रत्यारोपणाला किती खर्च येतो?
सध्या यासाठी   सुमारे 20 लाख रुपये खर्च येतो. परंतु या शस्त्रक्रिया जशा वाढत जातील तसा हा खर्च कमी होईल. सिंगापूरमध्ये हा खर्च एक कोटी रुपये होतो. त्यामुळे आपल्याकडे यातील विदेशी रोगी येऊ शकतील.
मुलाखत : प्रसाद केरकर

0 Response to "यकृत प्रत्यारोपणावर जनजागृती आवश्यक : डॉ. अनिल सूचक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel