-->
नेपाळमधील सकारात्मक बदल

नेपाळमधील सकारात्मक बदल

शुक्रवार दि. २ ऑक्टोबरच्या संपादकीय पानासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नेपाळमधील सकारात्मक बदल
जगातील एकमेव हिंदुराष्ट्र अशी ज्याची ओळख होती त्या नेपाळने आपल्या हिंदुत्वाला तिलांजली देत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जाहीर करुन आपल्यात सकारात्मक बदल जाहीर केले आहेत. नेपाळच्या संविधान सभेने धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषीत करताना या नवीन राज्यघटनेवर ६०१ विरुध्द २१ इतक्या फरकाने ही नवी मोहोर उठविली. नेपाळ संसदेच्या ज्या ६०१ खासदारांनी घटना स्वीकारायच्या बाजूने मतदान केले, त्यातले ४८० खासदार हिंदूच आहेत. त्या बहुसंख्य हिंदू खासदारांनी हिंदूराष्ट्र ही संज्ञा नाकारून नेपाळला संघराज्य म्हणून जाहीर केले. विरोध करणारे २५ अधिक तटस्थ राहणारे ६०, असे ८५ खासदार  या संघराज्याच्या विरोधात होते, असे मानले तर ५०७ विरुद्ध ८५ अशी ही मतदानाची विभागणी मानली झाली. २४० वर्षापासूनची नेपाळमधील राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणावी, असा ठराव २००८ साली नेपाळ संसदेने मंजूर केला होता. त्याच सालात नेपाळने कात टाकायला सुरुवात केली होती. संघराज्य निर्मितीसाठी तेव्हाच घटना समिती स्थापना केली गेली. सात वर्षानंतर घटना समितीने नेपाळला हिंदूराष्ट्र शब्दाऐवजी संघराज्य बनवण्याकरिता घटना तयार केली, त्या घटनेला मान्यता द्यायला बहुसंख्य हिंदू खासदार पुढे आले, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे सध्या सत्तेत आसणार्‍या भाजपाला जगातील एकमेव हिंदुराष्ट्र असल्याने नेपाळचा मोठा अभिमान वाटत असे. परंतु आता तेथील हिंदुत्ववाद संपुष्यात आला आहे. नेपाळसारख्या छोटया राष्ट्राने त्यांच्या देशाला एका धर्माच्या चौकटीत बांधून न घेता बहुसंख्याकाचा मुद्दा बाजूला करून, संघराज्याला मान्यता देऊन नेपाळने आपली लोकशाही आणखीनच बळकट केली आहे. भारत व नेपाळ यांचे संबंध हे अलिकडच्या काळातील नसून पौराणिक काळापासून आहेत. वेदातही तसेच रामायण-महाभारतातही नेपाळचा उल्लेख येतो. त्यामुळे या दोन देशांचे संबंध किती जुने आहेत व हे देश सांस्कृतिकदृष्ट्या किती बांधले गेलेले आहेत त्याची कल्पना येते. नेपाळने टाकलेली कात पाहता त्याचे जागतिक पातळीवरुन मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. परंतु भारताशी लागून असलेल्या भागातील मधेशी समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला व त्यात ५० जणांचे नाहक बळी गेले आहेत. परंतु हा हिंसाचार आटोक्यात आला आहे. नेपाळमध्ये जेव्हा नवीन राज्यघटना निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती त्यावेळी देखील हिंसक आंदोलन झाले होते. हे आंदोलन केवळ हिंदूराष्ट्र हवे एवढयासाठीच नव्हते तर नेपाळमधल्या राजेशाहीच्या बाजूनेसुद्धा होती. त्यामुळे आंदोलनकर्ते किती प्रतिगामी आहेत त्याची कल्पना येते. नेपाळच्या तीन कोटी लोकसंख्येत ८० टक्के लोक हे हिंदु आहेत. तर १० टक्के बौध्द, ५ टक्के मुस्लिम व ५ टक्के ख्रिश्‍चन आहेत. भारपासून जोडून असलेल्या भागातील लोकांना मधोशी म्हणतात. त्यांची लोकसंख्या सुमारे ४५ टक्के आहे. नेपाळमधील सत्तेत पहाडी लोकांचे वर्चस्व राहिले आहे, त्यातुलनेत मधेशी लोकांना प्रतिनिधीत्व मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. नेपाळच्या नव्याने मंजूर झालेल्या घटनेत नेपाळी वंशांच्या लोकांना सर्व प्रमुख जागांमध्ये प्राधान्य देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मधेशी लोकांमध्ये नाराजी आहे. नेपाळमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तांंतर झाले होते. नेपाळी कॉँग्रेसला १९६ जागा मिळाल्या व त्यांनी सत्ता हस्तगत केली. त्याखालोखाल नेपाळ कम्युनिस्ट पार्टीला १७५ जागा मिळाल्या होत्या. तर माओवादी पक्षाला ८० जागा मिळाल्या होत्या. मधेशी जनाधिकार फोरमला १० जागा मिळाल्या. नेपाळ हा आपला शेजारी असला तरी आपले परस्परांशी नाते नेहमीच सौदार्याचे राहिले आहे. अर्थात नेपाळला आपले मांडलीक राष्ट्र करावे असे भारताला नेहमी वाटत असले तरीही चीनने यात कुरघोडी करुन मध्यंतरी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. मात्र मध्यंतरी आलेल्या भूकंपात चीनने सर्वात मोठी मदत देऊन आपणच नेपाळचे सख्खे शेजारी असल्याचे जगाला सांगितले. असे असले तरी नेपाळशी भारताचे संबंधहे पूर्वीपासून चांगले होते व भविष्यातही चांगलेच राहातील. मात्र सध्याचा भाजपा सरकारने हिंदुराष्ट्र रद्द करुन घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र नेपाळने कोणती घटना स्वीकारावी हा त्या देशाचा प्रश्‍न आहे. एवढेतरी स्वातंत्र्य त्यांनी नेपाळला द्यायला हवे. तसे न केल्यास सध्याचे संबंध दुरावून नेपाळ चीनच्या जवळ जाण्याचा धोका आहे. भारतात सध्या जो हिंदुत्वाचे प्रयोग केंद्र सरकारने सुरु केल आहेत व सध्याच्या सर्वधर्मसमभावाच्या चौकटीला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ते जसे निषेधार्थ आहेत तसेच नेपाळने हिंदुराष्ट्र म्हणून स्वीकार करावा किंवा नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे, हे वास्तव समजून घ्यावे. नेपाळने हिंदुराष्ट्राची चौकट मोडून सर्वधर्मसमभाव स्वीकारला आहे, ही बाब स्वागतार्ह म्हटली पाहिजे.
---------------------------------------------------------------  

0 Response to "नेपाळमधील सकारात्मक बदल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel