-->
मंगळावर चैतन्य

मंगळावर चैतन्य

संपादकीय पान बुधवार दि. ३० सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मंगळावर चैतन्य
मंगळावर चैतन्य असे म्हटल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटेल व लोक मुर्खातही काढतील. कारण आपल्याकडे मंगळ म्हटला म्हणजे तापदायक, अशी एक समजूत. एखाद्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ असला तर तिचे लग्न जमविणे म्हणजे आई-वडिलांच्या नाकी नऊ येतात. अशा या तापदायक असलेल्या मंगळावर चैतन्य कसले? परंतु मंगळावर पाणी असल्याच्या शास्त्रीय निरीक्षणांना पुष्टी देणारे ठोस पुरावे नासाच्या संशोधक पथकांना उपलब्ध झाले असून याबद्दल सोमवारी रात्री नासाने अधिकृत घोषणा केली. मंगळावर केवळ गोठलेल्या बर्फाच्या स्वरुपातच जलसाठे नसून उन्हाळ्यात मंगळभूमीवरील काही डोंगररांगांमधून खारट पाण्याचे लहान प्रवाहही वाहत असतात, असे नासाने एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हा थराचा तुकडा कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा आहे. लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे. मंगळावर एक विवर भांडयासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांडयासारखी खोलगट व गोलाकार आहेत. नेमके हेच विवर वेगळे का, या प्रश्नाचे उत्तर या बर्फाच्या थरात दडलेले आहे, अशी विवरे फार क्वचितच आढळतात असे ऍरिझोना विद्यापीठाच्या ल्युनर अँड प्लॅनेटरी लॅबोरेटरी किंवा एलपीएलचे सहायक प्राध्यापक शेन बायरन यांनी सांगितले. मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत. एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली. त्यानंतर रडारने मंगळावरील काही प्रारणे टिपली त्यामुळे पृष्ठभागाखाली काय दडले आहे त्याचा शोध लागू शकला. रडार लहरींचा वेग मोजला गेला असून त्याच्या माहितीचे दोन संच आहेत, त्या माहितीवरून या विवराखाली बर्फाचा मोठा थर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची जाडी १३० फूट आहे. मंगळाच्या ध्रुवीय भागातच बर्फ आहे असा आतापर्यंतचा समज होता पण आता मध्यावरही बर्फ सापडले आहे. कॅनडा व अमेरिका सीमा व कन्सास यांच्या दरम्यानच्या अक्षांशांवरील भागात बर्फ सापडण्यासारखा हा प्रकार आहे. त्यातून मंगळावरील पूर्वीचे वातावरण कसे होते हे सांगता येणार आहे. मंगळावर पाणी आढळल्याने आता तेथे मानवी वसाहत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजवर स्टार ट्रेकसारख्या मालिकांमध्ये बाह्य ग्रहांवरील वस्ती दाखविण्यात आली होती ते लेखकाचे स्वप्नरंजन यापुढे खरे ठरु शकते. अलिकडेच अमिर खानच्या गाजलेल्या पी.के. या चित्रपटातही हीच संकल्पना होती. बाह्य ग्रहावरुन पृथ्वीवर आलेल्या एका अज्ञात व्यक्तीची ही कहाणी. परंतु मंगळावर पाणी आढळल्याने अशा प्रकारचे जीव मग ते माणसासारखे असोत किंवा किडे मुंग्यांसारखे असोत, काही तरी जीवसृष्टी तेथे असू शकते.
पृथ्वीवरील माणसाला परग्रहावरील अशा प्रकारच्या जीवस्ृष्टीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. आपल्यासारखेच कुणीतरी भाऊबंद अन्य ग्रहावर असतील व कदाचित ते आपल्यापेक्षा प्रगतही असतील किंवा अप्रगतही असतील याची आस नेहमीच माणसाला आहे. पाणी हे एखादा जीव जगण्याचे मुख्य साधन आहे. पाण्यावरच जगातली जीवसृष्टी अवलंबून आहे. आता मंगळावर पाणी आढळल्याने तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता जास्त बळावते. त्यामुळे भविष्यात मंगळावर स्वारी करण्याच्या योजना नासा आणखी जोरात हाती घेईल. नासाची नवीन रोव्हर गाडी २०२० मध्ये मंगळावर सोडली जाणार असून ती अणुइंधनावर चालेल. आताच्या क्युरिऑसिटी व ऍपॉरच्युनिटी रोव्हरगाडयांपेक्षा ती जास्त प्रगत असणार आहे. नवीन रोव्हर गाडी वजनदार असेल व तिची चाके लांब व जास्त जड असतील त्यामुळे ही गाडी मंगळावर वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. ही गाडी स्मार्ट असेल. गाडी चालवण्यात अडचणी असणार नाहीत किंबहुना त्यावर फार वेळ खर्च होणारच नाही. मंगळावरील महत्त्वाच्या भागांवर ही गाडी जाईल तसेच तेथील वैज्ञानिक माहिती पाठवेल. आता २०२० मध्ये मंगळावर जाणार्‍या रोबोट रूपातील या रोव्हर गाडीची कार्यक्षमता ९५ टक्के इतकी असेल. एकूणच आता मंगळावर पाणी आढळल्याने तेथील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी मानवाने बाह्या सरसावल्या आहेत. यात किती यश येईल हे आत्ताच सांगणे कठीण असले तरीही नेहमीप्रमाणे प्रयत्न हे केलेच जातील.
----------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मंगळावर चैतन्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel