-->
डिजिटल इंडियाचे आभासी प्रयोग

डिजिटल इंडियाचे आभासी प्रयोग

संपादकीय पान मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डिजिटल इंडियाचे आभासी प्रयोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट वक्ते आहेत व त्यांनी त्याच जोरावर निवडणुकीत सोशल मिडियाला हाताशी धरुन कॉँग्रेस विरोधी प्रचाराची राळ उठविली व विजयश्री खेचून आणली. आता त्यांनी रविवारी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलितील आय.टी. कंपन्यांच्या दिग्गज सी.ई.ओ.ची भेट घेतली व त्यांना जिडिटल इंडियाच्या आभासी जगाची भूरळ घातली. याप्रसंगी ऍडॉबचे सीईओ शांतनू नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, क्वॉलकॉमचे कार्यकारी चेअरमेन पॉल जेकब्स, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते. नेहमी हिंदितून भाषण करणार्‍या मोदींनी यावेळी इंग्रजीत भाषण केले हे एक आणखी वैशिष्ट्य. असो. नरेंद्र मोदींनी तयार केलेल्या डिजिटल इंडियाचा प्रयोग हा काही वाईट नाही. त्यामुळे भारत प्रगतीच्या वाटेवर जाऊ शकेल हे काही कुणी नाकारणार नाही. मात्र सध्याच्या स्थितीत भारताच्या गरजा या वेगळ्या आहेत. मोदी म्हणतात तसे ८० कोटी तरुण या देशात आहेत. म्हणजे १५० कोटी हातांना आपल्याला काम द्यावयाचे आहे. जिडिटल इंडियाच्या या प्रयोगातून यातील किती हातांना काम लाभेल? याचा विचार आपल्याकडे कुणी करताना दिसत नाही. नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आले पाहिजे हे वास्तव आहे. राजीव गांधींनी ज्यावेळी पंतप्रधान असताना संगणक आणण्यास सुरुवात केली त्यावेळी याच भाजपावाल्यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली होती. आता तर हाच भारत आपल्या देशात डिजिटल युगात नेण्याची घाई करीत आहे. आज आपल्याकडे जे अनेक गंभीर प्रश्‍न आहेत त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. सध्या कमी पावसामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती असणार आहे. यातून जीवाला कंटाळलेले शेतकरी आत्महत्या करण्यास पुढे सरासावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत आल्याच्या काळात या आत्महत्या वाढल्या आहेत. याचे उत्तर डिजिटल इंडियाकडे आहे का, असा सवाल आहे. मोदी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन आपल्या भाषणात सांगतात, मी ग्रामीण भागात गेलो असताना माझा आदिवासींनी फोटो काढला. मी त्यांच्या विचारले, मोबाईलमध्ये फोटो काढून त्याचे तुम्ही काय करणार? त्यावर ते आदिवासी म्हणाले आम्ही मोबाईलमधून हा फोटो कॉम्प्युटरमध्ये टाकणार व त्यातून त्यीच प्रत काढून आमच्याकडे ठेवणार. आपल्याकडे आदिवासी एवढे पुढे गेले आहेत का याची शंका यावी. त्यांच्याकडे मोबाईल असू शकतो. परंतु तो त्यातून फोटो काढून मोबाईलवरुन संगणावर नेणार व त्याची प्रत काढणाक्ष. म्हणजे आदिवासी वसत्यांंमध्ये संगणक, प्रिंटर हे आहेत व सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व चालविण्यासाठी त्यांच्याकडे वीज आहे. आम्हाला खरोखरीच हे सर्व भघायला आवडेल. मोदी कोणत्या राज्यातल्या आदिवासींकडे हे बघायला गेले होते ते त्यांनी सांगावे भारतात येऊन जनतेला सांगावे. आम्ही त्याची तपासणी करु. आपल्याकडे आदीवासी पाड्यात आत्ता कुठे लाईट पोहोचते आहे, अजूनही अनेक भागात लाईट पोहोचलेली नाही, तर त्यांच्याकडे संगणकत आणि प्रिंटर कुठे असणार? अमेरिकेतल्या सी.ई.ओ.ना त्याचे आश्‍चर्य व आनंद वाटावा व त्यांनी भारताच्या प्रगतीकडे पाहून टाळ्या पिटाव्यात ही बाब चांगली आहे. परंतु या देशात वास्तव काही वेगऴेच आहे. अर्थात हे सर्व सी.ई.ओ. भारतात गुंतवणूक करताना विचार करतील, त्याअगोदर आपले प्रतिनिधी पाठवतील व वास्तव काय आहे ते तपासतील यात काहीच शंका नाही. कारण आजवर मोदींनी २२ हून जास्त विदेश दौरे गेल्या सव्वा वर्षात केले मात्र अजूनही एक डॉलरची गुंतवणूक आलेली नाही. सध्या चालू आहेत त्या फक्त घोषणाच. घोषणा व प्रत्यक्ष गुंतवणूक यात जमीन-आसमानचा फारक असतो. आजवर ऍपलने भारतात नव्हे तर चीनमध्ये आपला उत्पादन प्रकल्प सुरु केला आहे याचा मोदींजींना विचार करावा. आपल्याकडे नव्याने गुंतवणूक येण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांना अपेक्षित असणारे कायदे कानून, पायाभूत सुविधा ज्या चीन पुरविते त्या आपण अजून देऊ शकत नाही, मग विदेशी कंपन्या आपल्याकडे काय येतील,असा प्रश्‍न आहे. देशातील उद्योगपतीही सध्या गुंतवणूक करीत नाहीत. मोदींना आपण सत्तेवर आल्यावर देशातील गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करतील असे वाटले होते परंतु ते काही शक्य झालेले नाही. देशातील भांडवलदार सध्या गुंतवणूक करीत नाहीत तर विदेशातील कशाला करतील, याचा विचार पहिला झाला पाहिजे. मोदींचे भाषण तर उत्कृष्ट झाले, याबाबत काहीच शंका नाही. परंतु देशातील प्राधान्यातेच्या बाबींपासून ते भाषण फारच दूर होते. अशा प्रकारे डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवून आय.टी. कंपन्या आपल्याकडे येऊन गुंतवणूक करतील अशी जर मोदींची समजूत असेल तर ती चुकीची ठरेल असे लवकरच दिसेल. डिजिटल इंडियाच्या आभासी जगात सध्या मोदींजींनी न राहाता देशाला भेडसाविणारे जे प्रश्‍न आहेत ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
----------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "डिजिटल इंडियाचे आभासी प्रयोग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel