-->
पिडीतांना अद्याप न्याय नाहीच

पिडीतांना अद्याप न्याय नाहीच

शनिवार दि. 09 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पिडीतांना अद्याप न्याय नाहीच
मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला 24 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेचा दुसर्‍या टप्प्यातील निकाल आता जाहीर झाला आहे. यात या खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या फिरोज खान आणि ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या यांना फाशीची, तर कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. रियाज अहमद सिद्दिकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष टाडाफ न्यायाधीश जी. डी. सानप यांनी जाहीर केले. या शिक्षांचे स्वागत तर झालेच आहे. मात्र यातील मुख्य आरोपी कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम कासकर व त्याचे तीन साथीदार अजून फरारच आहेत. त्यामुळे या खटल्याचा पूर्णपणे निकाल लागला असे म्हणता येणार नाही. यातील मुख्य आरोपी दाऊद असून तो जोपर्यंत पकडला जाऊन त्याला शिक्षा ठोठावली जात नाही तोपर्यंत या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. या बॉम्बस्फोटाच्या घटनेला आता दोन दशके ओलांडली असून अद्याप यातील सर्वांना शिक्षा ठोठावली गेली नव्हती. अर्थात आपल्या न्यायव्यवस्थेचे काम किती ढिल्या पध्दतीने चालते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. बारा मार्च 1993 रोजी मुंबापुरीत भीषण बाँबस्फोट झालेे. देशातील ही अतिरेक्यांची ही पहिलीच कारवाई होती. त्यामुळे आपल्याकडील पोलिसांपासून सर्वच यात अनभिज्ञ होते. या स्फोटानंतर दाऊद, मेमन बंधू तसेच अबू सालेम हे आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन फरारी झाले. त्यांच्यापैकी याकूबला भारतात आणण्यात तपास यंत्रणा यशस्वी झाल्या आणि तो फासावर लटकला. अबू सालेमला भारतात आणताना मात्र पोर्तुगीज सरकारशी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला फाशीची शिक्षा न देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळेच तो जन्मठेपेवर सुटला. अन्यथा, त्याचीही फाशी अटळच होती. पण या टप्प्यावर येण्यासाठी तब्बल दोन तपे गेली. हा कालावधी प्रदीर्घ म्हटला पाहिजे. पोर्तुगाल सरकारसोबत प्रत्यार्पण करारानुसार फाशीची शिक्षा ठोठावता येत नसल्याने सालेमला जन्मठेप द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. सालेमप्रमाणेच करीमुल्लालाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची मागणी सीबीआयने केली होती. त्यानुसार त्याला जन्मठेप सुनाविण्यात आली. ताहीर टकल्या आणि फिरोझ खानला कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी सीबीआयच्या वतीने केली होती. या दोघांचा स्फोट घडविण्यात जबाबदार असलेल्या मुख्य आरोपींमध्ये समावेश असल्याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या मुस्तफा डोसा याचा काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. अबू सालेमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली, तरी तो आजन्म तुरुंगात राहणार नाही, असे वकिलांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने पोतुर्गाल सरकारशी केलेल्या प्रत्यार्पण कायद्यामुळे सालेमला फाशी किंवा 25 वर्षांहून अधिक तुरुंगावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. त्यातच त्याने 12 वर्षांची शिक्षा आधीच भोगली आहे. त्यामुळे अजून 13 वर्षे त्याला तुरुंगात घालवावी लागतील; मात्र केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास त्याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बाँबस्फोट मालिकेला राजकीय व धार्मिक विद्वेषाची मोठी पार्श्‍वभूमी होती. अयोध्येतील एतिहासिक बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी सहा डिसेंबर 1992 रोजी एका उन्मादात जमीनदोस्त केली आणि त्याचे पडसाद देशभरात हिंसाचाराने उमटले. बाबरीकांडाच्या रात्रीच या दंगलींचे पहिले सत्र सुरू झाले आणि दोन आठवड्यांनी ते शमले तरी सूडाची भावना अनेकांच्या मनात धगधगतच होती. त्याची परिणती लगोलग जानेवारी 1993 मध्ये पुन्हा हिंसाचार सुरू होण्यात झाली. दंगलींच्या या दोन सत्रांत मिळून किमान 900 लोक मृत्युमुखी पडले. त्याशिवाय कित्येक लोक अपंग झाले आणि लाखोंच्या मालमत्तेचीही हानी झाली. यामुळे या दोन्ही समाजात एक उभी दरी निर्माण झाली. या बॉम्बस्फोटांच्या हिसेंमागे ही पार्श्‍वभूमी असली तीरीही याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. कोणतीही हिंसा ही निंदनीयच ठरावी. या बॉम्बस्फोटानंतर मुंबई नेहमीच स्फोटाच्या उंबरठ्यावर राहिली. त्यानंतर अनेकदा स्फोट झाले आणि हिंसाचार वाढत गेला. त्यामुळे या स्फोटातील आरोपींना कडक शिक्षा करणे गरजेचे होते. त्यानुसार सरकारने पावले उचलली खरी परंतु शिक्षा देताना जो वेग पाहिजे होता तो न दिला गेल्याने दहशतवादाला आअळा बसण्यात अनेक अडचमी आल्या हे देखील तेवढेच खरे. गेल्या 24 वर्षात या आरोपींतील अनेक आरोपी न्यायालयातच मरण पावले आहेत. आता या आरोपिंना शिक्षा होताना यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने पिडीतांना खरा न्याय अद्याप मिळालेलाच नाही असे म्हणावेसे वाटते. प्रमुख सूत्रधार कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा आजही फरारी आहे. आपल्या शेजारी देशाच्या भूमीवर तो सुखेनैव आणि ऐषारामात राहत आहे. आजवर अनेक पक्षांच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यास दाऊदच्या मुसक्या बांधण्याच्या घोषणा केल्या, मात्र यात कोणालाही यश आले नाही. ही बाब यापुढेही नेहमीच डाचत राहणार आहे. मुंबईच्या काळजावर या बाँबस्फोटांमुळे उमटलेला व्रण हा आजही कायम आहे. यातील सर्व आरोपींना जर शिक्षा ठोठावली गेली असती तर हा व्रण काहीसा फिका पडला असता, मात्र तसे दुदैवाने झालेले नाही.
---------------------------------------------------------------

0 Response to "पिडीतांना अद्याप न्याय नाहीच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel