-->
स्टार मुष्टीयोध्दा

स्टार मुष्टीयोध्दा

संपादकीय पान सोमवार दि. ०६ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्टार मुष्टीयोध्दा
जागतिक पातळीवरील मुष्टीयोध्दा मोहम्मद अली यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. गेली ३४ वर्षे त्यांना पार्किन्ससारख्या दुर्धर रोगाने पछाडले होते. गेले काही दिवस त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने अमेरिकेतील रुग्णालयात दाखल होते. परंतु त्यातून ते काही सावरु शकले नाहीत. अलींच्या निधनामुळे जगातील एक स्टार मुष्टीयोध्दा पण जसा गमावला आहे तसाच अमेरिकनांचा कृष्णवर्णीयांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अलींनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी पहिला सामना खेळला आणि जिंकला. तेव्हापासून त्यांनी कधी माघार घेतली नाही. अली हे नेहमीच स्पष्टवक्ते व मानवी हक्काचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून जगापुढे आले. नुकतेच त्यांनी अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्या मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदीवर सडकून टीका केली होती. आम्ही आमचा धर्म घरात पाळतो व त्याचा कुणालाही अडसर होऊ देत नाही असे त्यांनी यावेळी ट्रम्प यांना ठणकावले होते. खरे तर ते जन्माने ख्रिश्चन होते. मात्र त्यांनी नंतर मुस्लिम धर्म स्वीकराला होता. त्यानंतर त्यांनी मोहम्मद अली हे नाव घेतले होते. व्हिएतनामच्या युध्दाच्यावेळी त्यांनी युध्दात सहभागी होण्यासाठी कडवा विरोध केला होता. युध्द करुन जगाचे प्रश्न सुटू शकत नाहीत यावर त्यांची द्दढ श्रद्दा होती. कृष्णवर्णीयांवर अमेरिकेत होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांनी वेळोवेळी वाचा फोडली होती. त्यावेळी ते खरे तर कृष्णवर्णीयांचे अघोषीत नेते झाले होते. १९६० साली त्यांनी पहिल्यांचा अलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. परंतु त्यांना त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये केवळ कृष्णवर्णीय आहोत म्हणून सोडा देण्यास नकार दिला होता. यातून त्यांनी चिडून आपले पदक नदीत फेकून दिले होते. त्यानंतर ते अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढ्यात सक्रिय झाले होते. १९७८ साली त्यांचा एका तरुण मुष्टीयोध्दाने पराभव केला आणि पुढच्याच वर्षी त्यांनी आपले करिअर आता संपले आहे असे मान्य करुन निवृत्ती पत्करली. परंतु तरी त्यांना काही स्वस्त बसवेना. शेवटी १९८० साली त्यांनी एक सामन्यात उतरण्याचे ठरविले. अलींचा सामना पाहणे हा त्याकाळी प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच असे. मात्र यातही त्यांचा पराभव झाला व अलींनी निवृत्ती स्वीकारली ती कायमची. २००५ साली त्यांचा अमेरिकेतील तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी देशातील सर्वोच्च पदक देऊन सन्मान केला. मात्र त्यावेळी त्यांना पार्किन्सनने पूर्णपणे वेढले होते. त्या सन्मानाला ते उत्तरही देऊ शकले नव्हते. अशा एका जागतिक मुष्टीयोध्दाने जगाचा निरोप घेतला आहे मात्र बर्‍याच काही चांगल्या बाबी पुढील पिढीसाठी शिल्लक ठेवल्या आहेत, हीच त्यांची मोठी मिळकत ठरावी.      
----------------------------------------------------------------

0 Response to "स्टार मुष्टीयोध्दा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel