-->
लाल फितीत ई रुग्णालय

लाल फितीत ई रुग्णालय

संपादकीय पान बुधवार दि. २९ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लाल फितीत ई रुग्णालय
अनेक सरकारी योजना या असतात, त्यामागचा उद्देश उत्तम असतो मात्र नोकरशाहीच्या लाल फितीत त्या अडकल्यामुळे अनेक योजनांचे पूर्णपणे दिवाळे वाजते. अशा प्रकारची डझनभर उदाहरणे आपल्याला देता येतील. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ई-रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र दीड वर्षांनंतरही हा प्रकल्प कार्यान्वयित न होता सर्व कागदावरच राहिला आहे. ई-रुग्णालयासाठी पुरवण्यात आलेली संगणकीय प्रणाली धूळ खात पडली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयासाठी ६० लाख ९४ हजार रुपये किमतीची साधन सामूग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. यात ५८ संगणक, १० टॅबलेट, २ पिट्रर आणि २ सर्व्हर आणि इतर साधन सामग्रीचा समावेश आहे. हे सर्व संगणक विविध विभागात बसवणे अपेक्षित होते. त्यानंतर सर्व संगणक सर्व्हरला जोडले जाणार होते. यासाठी सिडॅक या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दैनंदिन कामकाजातील गरजा लक्षात घेऊन सिडॅक ही संस्था ई-रुग्णालयासाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करणार होते. संगणकाच्या वापरासाठी जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार होते. या घटनेला आज दीड वर्ष लोटले आहे. मात्र ई-रुग्णालय सेवा कार्यान्वयित होऊ शकलेली नाही. सरकारची ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे संगणकीकरण केले जाणार होते. या योजनेतून रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग संगणकांनी जोडले जाणार आहेत. दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी आणि रुग्णालयातील कागदांचा अपव्यय टाळावा, रुग्णाचे आजार आणि त्यावरील उपचारांची अचूक नोंद ठेवता यावी हा यामागचा मूळ उद्देश होता. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ई-रुग्णालय सेवा तीन महिन्यांत कार्यान्वयित होणे अपेक्षित होते. मात्र त्यामुळे आरोग्य विभागाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याआधीच अडचणीत सापडला. ई-रुग्णालय सेवा सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा रुग्णालयात पडून आहे. या प्रकल्पाचे दहा टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे अलिबाग मधील हे रुग्णालय सुसज्ज होईल असे वाटत होते. खरे तर हे ई रुग्णालय करण्याऐवजी येथे सध्या नसलेल्या डॉक्टरांची पदे भरली तर रोग्यांची फार मोठी सोय झाली असती. पुरेसे डॉक्टरच नाहीत तर ई रुग्णालय करुन त्यातून काय साध्य होणार असा सवाल आहे. सरकारी रुग्णालयात रुग्णांना चांगली सुविधा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर असणे गरजेचे आहे. हे जर डॉक्टरच नसते तर संगणकीकरण करुन तत्यातून काहीही साध्य होणार नाही. यासाठी सरकारने वास्तव मान्य करुन त्यादृष्टीने पावले टाकल्यास अनेक प्रकल्प सुरळीत सुरु राहातील. त्यानुसार ई रुग्णालयाची काही गरज नाही, फक्त तज्ज्ञ डॉक्टर दिले तर सिव्हीलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण सरकारला दुवा देईल.
----------------------------------------------------------------

0 Response to "लाल फितीत ई रुग्णालय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel