-->
आणखी एक अतिरेकी हल्ला

आणखी एक अतिरेकी हल्ला

संपादकीय पान गुरुवार दि. ३० जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आणखी एक अतिरेकी हल्ला
फ्रान्समधील अतिरेकी हल्यानंतर काही फुटकळ घटना वगळता जगातील कानाकोपर्‍यात अतिरेकी हल्ले थांबल्यासारखे चित्र होते. मात्र आता तुर्कस्थानचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले. या भीषण स्फोटात आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४७ हून अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसने केल्याची शक्यता तुर्कस्थानाने व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा ५० पर्यंत वाढण्याची भीती तुर्कस्थानच्या सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. इस्तंबुल विमानतळावरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. या विमानतळावर केवळ बॉम्बस्फोटच नव्हे तर एके ४७ असलेल्या काही अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या बंदुकधारी दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. अचानक झालेल्या या दोन स्फोटानंतर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी जमिनीवर झोपले तर काहींनी इमारतीमध्ये धाव घेतली. बॉलिबुडचा सुप्रसिध्द अभिनेता ऋतिक रोशन या विमानतळावरच त्याच्या दोन मुलांसह होता. मात्र या हल्यातून तो सुदैवाने सहिसलामत बचावला आहे. ऋतिकचे कनेटिंग फ्लाईट चुकल्यामुळे तो या विमानतळावर होता आणि त्याचवेळी तेथे हा हल्ला झाला. या वर्षातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. या हल्ल्याानंतर तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादाविरोधात सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले आहे. या वर्षातील इस्तंबुलमध्ये झालेला हा चौथा मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यानंतर इस्तंबुल विमानतळावरुन सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असताना तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सुरक्षा कॅमेर्‍यांनी हे दोन्ही बॉम्बस्फोट टिपले असून, एका क्लिपमध्ये टर्मिनल बिल्डींगच्या प्रवेशव्दारातून आगीचा मोठा लोळ येताना दिसत असून, भेदरलेले प्रवासी सैरवैरा पळत आहेत. दुसर्‍या व्हिडीओमध्ये काळपोषाख परिधान केलेला एक दहशतवादी इमारतीमध्ये पळताना दिसत आहे. स्फोटाच्या आवाजानंतर विमानतळावरील प्रवासी सर्व दिशांना पळत सुटलेे. कुर्दीश बंडखोर आणि इसिसच्या दहशतवाद्यांवर या हल्याचा संशय आहे. मार्च महिन्यात युरोपमधील ब्रसेल्स विमानतळावर अशाच पद्धतीने बॉम्बस्फोट झाले होते. दोन्ही विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्याची पद्धत एकसारखीच आहे. ब्रसेल्स हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते. धर्माच्या नावावर लढणार्‍या या अतिरेक्यांचा जगभरातून निषेध होत आहे. तुर्कस्थान हे युरोपचा दरवाजा असे संबोधले जाते. तुर्कस्थानात मोठ्या संख्येने मुस्लिम राहातात. गेल्या तीन दिवसांपूर्वीच तुर्कस्थानने इस्त्रायलशी संबंधीत पुन्हा स्थापन करण्यासंबंधी करारावर सह्या केल्या होत्या. तसेच सिरीयातील कारवाई दरम्यान तुर्कस्थानने एक रशियन विमान तुर्कस्थानची हद्द पार केल्याबद्दल पाडले होते. या घटनेबद्दल रशियाकडे माफी मागून तुर्कस्थानच्या पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले होते. तसेच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी तुर्कस्थानच्या पंतप्रधानांनी इजिप्तबरोबर संबंध सुरळीत सुरु करण्याची इच्छा प्रदर्शीत केली होती. या तीन घटनांमुळे हा हल्ला झाला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. यातील हल्लेखोर व त्यांचा उद्देश लवकरच जाहीर होईल परंतु अशा प्रकारे निष्पापांचे जीव घेणे कोणत्याच धर्मात सांगितलेले नाही, याची अतिरेक्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

0 Response to "आणखी एक अतिरेकी हल्ला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel