-->
सत्तेसाठी सबकुछ!

सत्तेसाठी सबकुछ!

शुक्रवार दि. 22 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सत्तेसाठी सबकुछ!
सध्या सर्वच पक्षांत आयाराम-गयारामची चलती सुरू आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजपमध्ये आतापर्यंत इनकमिंग जोरात सुरु आहे. म्हणजे सध्या त्यांच्याकडे आयाराम भरपूर झाले आहेत. तर राष्ट्रवादी व कॉँग्रेस या सत्तेत नसलेल्या पक्षात गयाराम सक्रिय झाले आहेत. आजवर कॉँग्रेसच्या काळात राजकारणात प्रस्थापित झालेल्या घराण्यांचे फ्री इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपामध्ये आयाराम वाढण्याची शक्यता एकच आहे व ती म्हणजे त्यांच्याकडील सत्ता. सत्तेच्या गुळाला नेहमीच मुंगळ्या लागतात अशी म्हण आहे. सत्तेच्या राजकारणात सध्या पक्षनिष्ठा ही दुय्यम झाली असून केवळ सत्ता पाहिजे व मंत्रीपद पदरात पडले पाहिजे हे अनेकांचे लक्ष्य आहे. काँग्रेस सरकारमध्ये पंधरा वर्षे मंत्रिपद उपभोगलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण राष्ट्रवादीत जाऊन काय फायदा त्यापेक्षा सध्या भाजपाची चलती आहे, त्यामुळे तेथेच जाऊन मंत्रीपद मिळवावे या विचाराने त्यांना भाजपा सोयीचा वाटला. त्यानंतर 1960 पासून काँग्रेससोबत असलेल्या व राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तेथे गेलेल्या मोहिते पाटील घराण्यानेही भारतीय जनता पक्षाची वाट घरली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद व राज्यसभेत संधी मिळाली. साखर कारखानदारी, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँकेवरचे वर्चस्व मोहिते घराण्याने भूषवलेले आहे. जिल्ह्याच्या सत्तेच्या सर्व चाव्या त्यांच्याकडे गेली 35 वर्षे निर्विवादपणे होत्या. असे असले तरी गेली पाच वर्षे सत्ता नसल्यामुळे पाण्यातून बाहेर काढलेल्या माशांसारखी रणजितसिंह मोहिते पाटील यांची अवस्था झाली होती.  परभणीतही वरपुडकर घराण्याला काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व काही दिले. एक प्रस्थापित घराणे म्हणून वरपुडकरांनी मंत्री, आमदार, खासदारकीच्या संधी घेतल्या. पण त्यानीही सत्तेची सोबत करणे पसंत केले. दिंडोरीत पवार घराण्यातही बंड झाले आहे. ही सर्व पक्षांतरे केवळ सत्ता मिळविणे हे लक्ष्य ठेऊन झालेली आहेत. त्याासाठी पक्षांतर करताना जिल्ह्यातील विकासाची फोडणी लावली लाऊन आपल्या पक्षांतराचे केविलवाणी समर्थन ही मंडळी करतात. तीन दशकांपूर्वी छगन भुजबळांनी केलेले बंड फार गाजले होते. त्याकाळी आपल्याकडे बंडखोरी हा फारसा विषय नसे. त्यात शिवसेनेत बंडखोरी करणे म्हणजे जीव गमावण्याचाही धोका होताच. परंतु ही बंडखोरीही शिवसेनेने पचवली. मात्र त्यानंतर बारा आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी एक तप काँग्रेससोबत सत्ता उपभोगली. सत्तेत असतानाही नारायणरावांनी बंडाचे निशाष फडकविले होते. पण सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याने त्यांचे बंड पेल्यातली वादळं ठरली. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला. काँग्रेसनं त्यांना बांद्रा पोटनिवडणुकीत संधी दिली. तिथेही पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर पाठवले. पण 2005 पासून सत्तेत असलेल्या राणेंना फार काळ विरोधात मन रमले नाही. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपपुरस्कृत राज्यसभेची संधी स्वीकारली. आता तर सत्ता भाजपावाल्यांच्या एवढी भिनली आहे की, ते जनतेलाही गृहीत धरुन वागू लागले आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी तर आता निवडणूक ही केवळ आमच्यासाठी औपचारिकता राहिली आहे असे वक्तव्य केले आहे. सध्याच्या राजकारणात शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे हे नेते अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणातले केंद्रबिंदू आहेत. राज्याचे सर्वच राजकारण या नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत असते. या वेळीही हे नेते प्रमुख भूमिकेतच असले तरी, त्यांच्या पाठोपाठ नवे युवा चेहरेदेखील राजकीय रणांगणात झेपावले आहेत. यात आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, सुजय विखे, रोहित पवार, धीरज देशमुख, अदिती तटकरे, पार्थ पवार, सुजात आंबेडकर, सत्यजित तांबे, सचिन खरात यांसारखे नवे युवा चेहरे या निवडणुकीतले प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. सुजय विखे, अमोल कोल्हे व पार्थ पवार हे लोकसभेचे उमेदवारच असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. यामध्ये जो बाजी मारेल तो तरुण वयातच केंद्राच्या राजकारणात शिरणार आहे. शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार, विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख, प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर, बाळासाहेब थोरात यांचे भाचे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि दलित चळवळीतला तरुण चेहरा सचिन खरात या युवा नेत्यांना निवडणुकीत आपापल्या पक्षासाठी प्रभावी कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. प्रचाराच्या सभांसाठी ते पहिल्यांदा मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रभर फिरणार आहेत. अनेक आंदोलने आणि दलित संघटक म्हणून सचिन खरात यांनाही काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून नेतृत्व ठसवण्याची संधी आहे. प्रत्यक्ष उमेदवार नसलेले हे युवा नेते या निवडणुकीत रणनीतिकार, प्रचारक व संघटक म्हणून सामान्य जनतेच्या समोर प्रथमच जाणार आहेत. या सर्व नव्या व युवा चेहर्‍यांना राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवणारी मोठी संधी म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाईल.
--------------------------------------------------------

0 Response to "सत्तेसाठी सबकुछ!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel