-->
संपादकीय पान बुधवार दि. ११ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
आपच्या विजयाचा अर्थ
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचा हाती आलेला निकाल पहाता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाचा यात भ्रमाचा भोपळा फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीककडे भाजपाचा भ्रोपळा फुटला असताना दुसरीकडे एका वर्षापूर्वी सलग १५ वर्षे सत्तेत असणार्‍या कॉँग्रेसला आपला भोपळाही फोडता आलेला नाही. कॉँग्रेसचे पानिपत अपेक्षित होते परंतु एवढी घोर निराशा कॉँग्रेस पक्ष करील असेही वाटले नव्हते. आम आदमी पक्षाने आपली लाट असल्याचे दाखवित जबरदस्त बहुमत कमविले आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना तर आमदारकीचाही लाभ झाला नाही, मुख्यमंत्री होणे दूर राहिले. त्याचबरोबर भाजपाला दहा टक्के जागा न मिळाल्याने विरोधी नेतेपदही मिळणार नाही. त्यादृष्टीने पाहता भविष्याच्या राजकारणाची ही निवडणूक दिशादर्शक ठरणारी आहे हे नक्की. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजपाला विविध विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे यश पदरी पडल्यामुळे आता देशात सर्व राज्यात आपलेच सरकार येणार अशी एक हवा तयार करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपण सोशल मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया हातीशी घेतल्यावर विजयश्री खेचता येते अशी एक ठाम समजूत करुन घेतली होती. केंद्रात सत्तेत येताना त्यांनी या दोन प्रभावी माध्यमांना आपल्या खीशात टाकले होते, ही वस्तुस्थिती होती. तेच सूत्र सर्व देशभर लागू करण्यासाठी भाजपा व मोदी सज्ज झाले होते. परंतु त्यांचा हा उधळणारा वारु आता दिल्लीतील जनतेने रोखून धरला आहे. या निवडणुकांचे विश्‍लेषण करताना भाजपा कोणत्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात आली हे लक्षात घ्यावे लागेल. केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या कॉँग्रेसच्या नकर्तेपणामुळे व त्यांच्या अकार्यक्षमतेचा फायदा उठवित लोकांमधील कॉँग्रेस विरोधी लाटेला आपल्या शिडात भरीत नरेंद्र मोदी सत्तेत आले. त्यांच्या या विजयाचे श्रेय जसे मोदींकडे जाते तसेच कॉँग्रेसकडेही जात होते. लोकांना कॉँग्रेस नकोशी झाली होती, कारण भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याने बरबटलेले कॉँग्रेसचे नेते आता नकोच अशी ठाम भूूमिका नऊ महिन्यांपूर्वी मोदी सत्तेत येताना जनतेची होती. आजही जनतेची इच्छा तशीच  आहे कारण दिल्लीत कॉँग्रेसला शून्य भेदता आलेले नाही. महाराष्ट्रातही गेले १५ वर्षे सत्तेत असलेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारची स्थिती अशीच होती. लोकांना बदल हवा होता आणि त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता दिल्लीत मात्र काहीसे वेगळे चित्र होते. अरविंद केजरीवाल हे स्वच्छ प्रतिमेचे असलेले व्यक्तीमत्व लोकांनी स्वीकारले. त्याउलट किरण बेदी या देखील स्वच्छ प्रतिमेच्या होत्या, मात्र त्यांना दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारले. किरण बेदींचे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून नाव जाहीर होताच भाजपामध्ये विरोध सुरु झाला होता. निवडणुकीच्या प्रचार दरम्यान या विरोधाने टोक गाठले. बेदींच्या पराभवाची जी अनेक कारणे आहेत त्यात हे कारणही महत्वाचे आहे. तसे पाहता ही लढत नरेंद्र मोदी विरुध्द केजरीवाल अशीच होती. परंतु दिल्लतील निवडणूक सहजरित्या जिंकता येणार नाही हे दिसताच मोदी व अमीत शहा यांनी किरण बेदींचे बुजगावणे पुढे केले. कारण विजय झालाच तर मोदींचा विजय आणि पराभव झाला तर बेदींचा असे सूत्र होते. अर्थात अशी खेळी कॉँग्रेसमध्येही नेहमी खेळली जाते. पराभव झाला तर स्थानिक नेत्यांच्या माथी मारावयाचा आणि विजयाचा हक्कदार मात्र गांधी घराण्यातील नेता. त्यामुळेच भाजपा व कॉँग्रेसमध्ये काही फरक नाही. दिल्लीतील जनता ही मोठी धुर्त आहे. एकतर दिल्ली ही पूर्णत: मुंबईप्रमाणे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. येथे जसे उच्चभ्रू राहातात तसेच कष्टकरी मोठ्या संख्येने आजूबाजूच्या राज्यातून रोजगारासाठी येतात. मोठ्या संख्येने झोपडपट्या आहेत. त्यांचे प्रश्‍न आजवर टांगणीलाच लागले आहेत. गेल्या सहा महिन्यात भाजपाच्या नेत्यांनी जो हिंदुत्वाचा जप लावला आहे व मोदींना निवडून देण्यासाठी पाच-पाच मुलांना जन्म द्या हा जो जयघोष लावला आहे त्याचा या शहरी जनतेचा विरोध आहे. अशा प्रकारचे सरकार यावे यासाठी भाजपाला निवडून दिलेले नाही. विकासाच्या मुद्यावर भाजपाने व नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत मते मागितली होती. आता सत्तेवर येताच त्यांनी आपला हिंदुत्वाचा अजेंडा उघड केला आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रणही दिले गेले नव्हते. राजशिष्टाचाराचा हा भाग मोदी सरकार विसरेल असे म्हणणे चुकीचे ठरेल. अर्थात हे जाणूनबुजून करण्यात आले होते. त्याचा राग दिल्लीतील जनतेला आला होता. या निवडणुकीतून जनतेने आपला आवाज पुन्हा एकदा राजकराण्यांच्या कानावर जोरदारपणे घातला आहे. एक तर काम करुन दाखवा नाहीतर खुर्चीवरुन खाली खेचण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही बजावून दाखवू असे दिल्लतील जनतेने ठणकावून सांगितले आहे. गेल्या नऊ महिन्यांच्या काळात आता देशात फक्त भाजपाच हा पक्ष अस्तित्वात असेल असे काहीसे चित्र उभे करण्यात आले होते. विरोधकांना म्हणजे केवळ कॉँग्रेसच नव्हे तर सर्वच विरोधी पक्षांना संपविण्याच्या दृष्टीने भाजपाच्या हालचाली सुरु होत्या. मात्र आता तरी भाजपाचे पाय जमिनीवर येतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकारणास एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. देशातील प्रादेशिक पक्षांना चांगले भवितव्य आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. भाजपा या पराभवाने खचून जाईल तर कॉँग्रेस पक्ष पराभवाच्या गर्तेतून एवढ्यात तरी काही बाहेर येणार नाही असा याचा अर्थ आहे. अशा स्थितीत भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी डाव्या पक्षांनी पुढाकार घेऊन प्रदेशिक धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ घेत नवी आघाडी उभारण्याची आवश्यकता आहे.        

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel