-->
मनोमिलनाची नांदी (अग्रलेख)

मनोमिलनाची नांदी (अग्रलेख)

Apr 05, 2013 EDIT

रिलायन्स या देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहात आठ वर्षांपूर्वी फूट पडून अनिल व मुकेश या दोन भावांमध्ये वाटणी झाली त्या वेळी हे दोघे बंधू पुढील काळात परस्परांना उद्योगात सहकार्य करतील, असे कुणालाही वाटले नव्हते. कारण त्या वेळी या दोघांमधील कटुता विकोपाला गेली होती. मात्र, आता काळाच्या ओघात म्हणजेच जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर या दोघा भावंडांनी टेलिकॉम क्षेत्रात एकत्र येऊन संयुक्तरीत्या उद्योग करण्याचे ठरवले आहे. रिलायन्स समूहाच्या दृष्टीने ही घटना स्वागतार्ह तर आहेच, मात्र देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला नवे वळण देणारी ठरू शकते. त्यामुळे शेअर बाजाराने या घटनेचे जोरदार स्वागत केले आहे. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश व अनिल या दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आणि त्यानंतर 2006 मध्ये अधिकृतरीत्या हा उद्योगसमूह दुभंगला. थोरले बंधू मुकेश यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी म्हणजे पेट्रोलियम उद्योग आला, तर अनिल यांच्याकडे वित्तीय, टेलिकॉम, वीज, पायाभूत क्षेत्र या उद्योगातील कंपन्या आल्या. ही वाटणी झाली त्या वेळी देशातील अर्थव्यवस्थेत तेजी होती. आपली अर्थव्यवस्था नऊ टक्क्यांनी धावत होती. दोघा भावांनी या तेजीच्या वातावरणाचा फायदा उठवत अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या. विद्यमान असलेल्या उद्योगांच्या बरोबरीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी विस्तार प्रकल्प हाती घेतले. मुकेशकडील रिलायन्सकडे गडगंज राखीव निधी असल्याने त्यांनी रिटेल क्षेत्रात उतरण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली. अनिल यांच्याकडे टेलिकॉम, वित्तीय या झपाट्याने विस्तारणार्‍या क्षेत्रातल्या कंपन्या होत्या. त्याच्या जोडीला त्यांनी पायाभूत क्षेत्रातील वीजनिर्मितीबरोबर करमणूक उद्योगात पाऊल टाकले. त्या काळी या दोन्ही भावांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य जवळपास सारखेच होते. मात्र, यात मुकेश यांची कंपनी मोठी असल्याने ते नेहमीच वरचढ ठरले होते. समूहाच्या विभागणीनंतर हे दोघे बंधू आपापल्या वाट्याला आलेल्या उद्योगात लक्ष घालून सामंजस्याने उद्योग सांभाळतील, असे वाटत होते; परंतु हा समज खोटा ठरला आणि या दोघा भावंडांमधील वैर वाढतच गेले. यातून न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले गेले. 2009 मध्ये अमेरिका व युरोपातील मंदीचे पडसाद आपल्याकडे उमटण्यास सुरुवात झाली आणि देशातील उद्योगांना याची झळ लागायला लागली. रिलायन्सच्या या दोन्ही समूहातील कंपन्या यात होरपळणे स्वाभाविक होते. मुकेश अंबानींनी रिटेल उद्योगातील आखलेल्या मोठ्या योजनांना सुरुंग लागण्यास सुरुवात झाली. कधी नव्हे तो रिलायन्सला रिटेल उद्योगात फटका सहन करावा लागला. मात्र, मुकेश अंबानी यांच्याकडे पेट्रोलियम, तेल उत्खननासारखा चांगला नफा देणारा उद्योग असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला हा तोटा सहजरीत्या जिरवता आला. शेवटी मुकेश अंबानीनी आपला रिटेलचा प्रयोग गुंडाळण्यास प्रारंभ केला. याच काळात त्यांनी ओबेरॉय हॉटेल्समधील 14 टक्के भांडवल खरेदी केले, मात्र त्यांना या हॉटेलवर काही ताबा मिळवता आला नाही. 2010 मध्ये दोघा भावांमध्ये स्पर्धा कराराविषयी झालेला करार संपुष्टात आला आणि मुकेश यांनी इन्फोटेल ही कंपनी ताब्यात घेऊन टेलिकॉम उद्योगात प्रवेश करण्याचे सूतोवाच केले. अनिल अंबानी यांच्याकडे असलेल्या टेलिकॉम, वित्तीय, वीजनिर्मिती उद्योगातील कंपन्यांना तर मंदीचा जबरदस्त तडाखा बसला. टेलिकॉम उद्योगात पहिल्या क्रमांकावर राहण्याची स्वप्ने अनिल यांनी पाहिली होती. मात्र, या उद्योगात त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे टेलिकॉम उद्योगातील स्पर्धेत ते पार सीमेपलीकडे फेकले गेले. त्यातच अनिल यांनी आफ्रिकेतील टेलिकॉम कंपनी ताब्यात घेण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या थोरल्या बंधूंनी हाणून पाडला. अनिल यांनी वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प आखले खरे; परंतु या प्रकल्पांसाठी जमीन ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न फसल्याने या प्रकल्पांची अंमलबजावणी रखडली. अनिलभाई हे समाजवादी पक्षाचे खासदार झाल्याने त्यांचे प्रकल्प यशस्वी कसे होणार नाहीत, हे उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी पाहिले. त्यामुळे अनिल अंबानी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्यासारखी स्थिती निर्माण झाली. त्यांच्या समूहाला मिळालेला मुंबईतील मेट्रोच्या उभारणीचा प्रकल्प प्रदीर्घ काळ लांबल्याने येथेही आर्थिक गणिते बिघडली. त्याचबरोबर त्यांनी करमणूक क्षेत्रात मोठ्या अपेक्षेने उडी मारली होती; परंतु आपल्याकडे करमणूक क्षेत्र अजून उद्योग म्हणून विकसित न झाल्याने तसेच या क्षेत्रात असलेल्या अस्थिरतेमुळे अंबानी यांना अपेक्षेएवढे यश काही मिळाले नाही. अनिल यांनी जे उद्योग विस्तारासाठी निवडले त्यात धोकेही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या उद्योगातील त्यांच्या योजना मंदीमुळे विस्कटल्या. या पार्श्वभूमीवर दोघा भावांमधील कटुता कमी होत होती. दोन वर्षांपूर्वी धीरूच्या चोरवाड येथील जन्मगावी एका कार्यक्रमात हे दोघे बंधू एकत्र आले, त्या वेळी काही तरी ‘शिजू’ लागल्याचे गॉसिप कॉर्पोरेट जगतात सुरू झाले. त्यानंतर आफ्रिकेत सफारीला दोघांच्याही कुटुंबीयांनी एकत्र जाणे हे एक पाऊल पुढचे होते. आता मात्र उद्योगात ‘डिस्कनेक्ट’ झालेल्या या दोघा भावांना टेलिकॉम उद्योगाने एकत्र आणून ‘कनेक्ट’ केले आहे. अर्थात यातून भविष्यात हे दोन्ही समूह एकत्र येतील, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र, उभयतांतील या करारामुळे दोन्ही समूहांचे मनोमिलन सुरू झाले आहे, असे म्हणता येईल.   

0 Response to "मनोमिलनाची नांदी (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel