-->
संपादकीय पान मंगळवार दि. १० जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
नेमाडे विरुध्द रश्दी
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघा मराठी माणूस सुखावला. साहित्यातील हा सर्वोच्च सन्मान आपल्या मराठी साहित्यिकास मिळावा हा मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा, मराठी माणसाचा गौरवच होता. मात्र या आनंदाच्या क्षणी भालचंद्र नेमाडे यांनी नको तो वाद उपस्थित करण्यासाठी इंग्रजीवर टिकास्त्र केले. इंग्रजी लेखक सलमान रश्दी, नायपॉल यांच्यावर टीका केली. त्यांची ही टीका खरे तर अनावश्यक व अनपेक्षितच होती. अर्थात नेमाडेंच्या काहीशा हेकट स्वाभावाला साजेशीही होती. त्यावर कढी म्हणजे रश्दी यांनी देखील खालच्या पातळीवर जाऊन नेमाडेंवर कुरकुर करणारा थेरडा अशी टीका केली. रश्दी हे प्रसिद्धीचा एक क्षण सोडत नाहीत. त्यांच्यावर झालेली टीका हे आपल्याला मोठे करण्याची एक नामी चालून आलेली संधीच आहे असे समजत रश्दी त्या टीकेला प्रत्यूतर देतात. तसे पाहता रश्दी हे जागतिक किर्तिचे लेखक व त्यांच्या दृष्टीने नेमांडेंसारख्या एका मराठी लेखकाने केलेल्या टीकेची त्यांनी दखलही घेणे गरजेचे नव्हते. परंतु रश्दी यांचा स्वभाव तसा नाही, ते आपल्यातले मोठेपणा सिध्द करण्यासाठी अन्य कुणालाही कमी लेखतात. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या सर्व भांडणांची सुरुवात नेमाडेंनी केली आणि त्याची गरज नव्हती. आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर इंग्रजी भाषेचा पगडा वाढत गेला. एक तर इंग्रजांनी आपल्याकडे कारकून तयार करण्यासाठी शिक्षण सुरु केले. ब्रिटीशांना अर्थातच कारकून तयार करावयाचे असल्याने व त्यावेळीची सरकारी कामकाजाची भाषा ही इंग्रजी असल्याने त्यांनी इंग्रजी भाषेत शिक्षण सुरु करणे स्वाभाविकच होते. लोकमान्य टिळक, आगरकरांनी देखील इंग्रजी शाळा सुरु केल्या मात्र मातृभाषेला प्राधान्य दिले होते. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे आपण भाषिक तत्व स्वीकारुन राज्यांची विभागणी केली. यातून संबंधीत राज्यातील भाषा विकसीत होतील व त्यांची अस्मिता पोसली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीने मातृभाषेतून शिक्षण घेणे पसंत केले होते, अर्थात त्याचबरोबर इंग्रजी शाळा या होत्याच. मात्र इंग्रजीतून शिक्षण घेणारे हे उच्चभ्रू समाजातील होते. एकीकडे अशी शिक्षणाची विभागणी झाली असताना देशाचा बहुतांशी कारभार हा इंग्रजीतच सुरु होता. कालांतराने राज्यातील भाषांमध्ये राज्य सरकारचा कारभार सुरु असला तरी इंग्रजी भाषेचेही जिकडे-तिकडे प्रभूत्व होतेच. या पार्श्‍वभूमीवर इंग्रजीतून शिक्षण घेतलेली एक पिढी झपाट्याने आपला विकास करुन विविध ठिकाणी चांगल्या हुद्यावर रुजू झाली. यातूनच मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या मनात इंगजीविषयी एक प्रकारचा न्यूनंगड निर्माण झाला. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, ही भाषा जर आपण शिकलो तर जग ही आपल्यासाठी बाजारपेठ आही ही वस्तुस्थीती मराठी माणसाच्या मनात घर करुन राहिली. यात काही चुकीचे नव्हते. मात्र त्याबरोबर एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की, जर्मनीत इंग्रजीचा वापर नाही, फ्रान्समध्ये किंवा युरोपाच्या अनेक भागातही नाही, जपानमध्येही नाही, मात्र असे असले तरीही त्यांनी जगावर आपले अधिराज्य स्थापन केले आहे. अर्थात आपल्याकडे ब्रिटीशांची दीडशे वर्षांची सत्ता असल्यामुळे आपल्यावरील इंग्रजीचा पगडा वाढत गेला आणि स्वातंत्र्यानंतर सत्ताधार्‍यांनीही हा पगडा कमी होऊन आपली राष्ट्रभाषा जगात जावी यासाठी प्रयत्न केले नाहीत, ही दुदैवाची बाब आहे. मात्र इंग्रजीमुळे आपण जगात झपाट्याने पोहोचलो ही वस्तुस्थिती आहे. चीनला देखील हे वास्तव पटले आहे. त्यामुळेच आता चीनची तरुण पिढी इंग्रजी शिकण्यासाठी झपाटली आहे. आपल्याकडेही हीच परिस्थिती आहे. मध्यमवर्गीयांपासून ते ग्रामीण भागातील गरीबांपर्यंत सर्वांना आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा ध्यास आहे. त्याच काहीच चूक नाही. आपल्याकडील इंग्रजीचे प्रभूत्व आता कमी होणार नाही. नेमाडेंच्या वक्तत्यावर खरे तर आता हसे होत आहे कारण नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी आयुष्यभर इंग्रजी शिकविण्याचे काम केले. तेच आता इंग्रजीतून शिक्षण घेऊ नकात असा जनतेला सल्ला देत आहेत. नेमाडेंचे मराठी जनतेने का बरे एैकावे? म्हणजे जे शिवसैनिक व त्यांचे मराठी भाषेच्या नावाने गळा काढणारे नेते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात तसाच भोंदूपणा नेमाडे करीत आहेत. नेमाडे हे साहित्यिक म्हणून  मोठे असल्याने त्याबद्दल त्यांच्याविषयी जरुर आदर आहे. परंतु त्यांनी अशा प्रकारचे सल्ले दिल्यास त्यांचे कुणी एैकणार नाहीत. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य लेखनाचा अर्धशतकाचा प्रवास पूर्ण झाला आहे. कोसला (१९६३) ते हिंदू (२०११) अशा या प्रदीर्घ कालखंडाच्या पोटात नेमाडे यांची समीक्षा, कादंबरी लेखन, कविता, संशोधनात्मक लेखन, संपादने असा पसारा पांगलेला आहे. एखाद्या लेखकाचा अतिशय परिपक्व असा अर्धशतकाचा एवढा लक्षवेधी आणि पृथगात्म प्रवास अपवादालाच पाहायला मिळतो. त्यांच्या लेखनाने या समग्र काळाला कवेत घेऊन प्रभावित केले आहे. अनुभवाला आणि भाषेला थेटपणानं भिडण्यापासून, आपल्या मुळांचा शोध घेणं ही प्रक्रिया लेखनाच्या पातळीवर स्वत:सह, आपल्या भूतभविष्यवर्तमानासह उत्खनन करून समोर ठेवणे, हे नेमाड्यांनी त्यांच्यानंतर येणार्‍या समग्र लेखक कलावंतांसाठी करून ठेवलेले मोठे ऐतिहासिक काम आहे. मात्र त्यांनी मराठीबद्दल अवास्तव प्रेम व्यक्त करु नये. रश्दी यांच्यासारख्या लेखलाकालाही डिचविण्याचे काम करु नये. प्रत्येक साहित्यक आपल्या मातीतला हिरो असतोच.
---------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel