-->
संपादकीय पान शनिवार दि. २५ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सरकारला आता तरी जाग येईल?
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदी सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर आयोजित शेतकर्‍यांच्या सभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच हजारोंच्या जमावादेखत राजस्थानातील गजेंद्रसिंह या ४० वर्षिय तरुण शेतकर्‍याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा प्रकारे जाहीररित्या आत्महत्या करण्याचा हा भयानक व कुणालाही वेदना देणारा अंगावर काटा आणण्याचाच प्रकार होता. अनेक चॅनेल्सनी याचे लाईव्ह प्रसारण केले. गजेंद्रसिंहने आत्महत्या करु नये यासाठी त्याला कुणीही झाडावर चढून अडविण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसही मख्खपणाने हा प्रकार पाहत राहिले. अर्थात हा सर्व प्रकार जसा वेदनाक्षम आहे तसेच सरकारला यातून जाग येईल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने जंतरमंतरवर शेतकरी सभेचे आयोजन केले होते. पोलिसांचा फौजफाटाही खूप होता. सभेला दिल्लीलगतच्या राज्यातूनही शेतकरी आले होते. त्यापैकी एक असलेला गजेंद्रसिंह हा चार-पाच जणांसह झाडावर चढून बसला होता. केजरीवाल यांचे भाषण सुरू असताना अचानक त्याने आपल्या गळ्यात असलेल्या एका कपड्याने फास घेतला. थोड्यावेळाने जवळच असलेल्या लोकांना तो त्याच, लटकलेल्या स्थितीत असल्याचे लक्षात आल्यावर ते झाडावर चढले. त्या वेळी गजेंद्रसिंहला फास बसल्याने तो बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. या घटनेने सभास्थानी गोंधळ उडाला. यानंतर दिल्ली पोलिसांनाही जाग आली व त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने गजेंद्रसिंहला राममनोहर लोहिया रुग्णालयात हलविले. तेथे दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी गजेंद्रसिंह याला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात आणण्यापूर्वीच गजेंद्रसिंह याचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. झागरवाडा गावचा गजेंद्र मॅट्रिकपर्यंत शिकला होता. गावच्या राजकारणात सक्रिय होता. कॉँग्रेस, भाजपा असे पक्ष फिरुरन तो आता आपचा सदस्य होता. जयपूरला जातो असे सांगून घरून निघाला, पण दिल्लीला गेला. गजेंद्र पगडी बांधण्यात माहिर होता. एका मिनिटात २० पगडी बांधण्याचा विक्रमही केला होता. त्याचच्या वडिलांची १७ बिघा शेती आहे. आत्महत्या करावी अशी त्याची काही आर्थिक स्थिती नाही. बुधवारी त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. जंतरमंतरवर हजारो पोलिस व समुदायाच्या देखत एका तरुण शेतकर्‍याने मरणाला कवटाळल्याच्या या भयानक प्रकाराने दिल्ली सुन्न झाली. गजेंद्रसिंहला पाहण्यासाठी केजरीवाल व सिसोदिया रुग्णालयात पोचले तेव्हा तेथील गर्दीने त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. अखेर केजरीवाल यांना भक्कम पोलिस संरक्षणातच आत जाता आले व तेथून बाहेर पडता आले. मृत गजेंद्रसिंह राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत तो याच सभेत आत्महत्या करणार असल्याचे स्पष्ट लिहिले होते. या चिठ्ठीत शेवटी त्याने जय जवान, जय किसान, असे लिहिले आहे. आपली शेती उद्ध्वस्त झाल्याने वडिलांनी आपल्याला घरातून बाहेर काढले. आपल्याला तीन मुले आहेत. आपण बर्बाद झालो आहोत व आपल्याला आत्महत्या करण्याशिवाय अन्य काही मार्ग राहिलेला नाही, असे त्याने त्यात म्हटले आहे. गजेंद्रसिंग राजस्थानातील असल्याने तेथे सध्या भाजपाची राजवट आहे. त्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा उठणे स्वाभाविक आहे. गजेंद्रसिंह याच्या आत्महत्येनंतर काही वेळातच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. कॉंग्रेस व भाजपने आपवर टीका करण्याची संधी साधली. भाजपने ही मानवतेची हत्या असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी आपच्या कार्यकर्त्यांनीच गजेंद्रसिंहला झाडावर चढण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. तसेच आप मृतदेहांबरोबरही राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकारानंतरही केजरीवाल यांनी भाषण सुरू ठेवणे म्हणजे त्यांना लोकांच्या जिवापेक्षा स्वतःचे करिअर महत्त्वाचे वाटत असल्याचा आरोप भाजपचे संबित पात्रा यांनी केला. एकूणच शेतकर्‍याची आत्महत्या राहिली बाजूला आणि त्यातून राजकीय पक्षांनी या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे चुकीचे आहे. भूसंपादनामुळे शेतकर्‍यांच्या जमीनी सरकार भांडवलदारांच्या घशात घालावयास निघालेले असताना त्याला शेतकर्‍यांचा कडाडून विरोध होत आहे. कॉँग्रेसच्या यापूर्वीच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने खरे तर हा कायदा केला. राहूल गांधीं खरे तर हा कायदा करण्यासाठी आग्रही होते. गेल्या काही वर्षात जमीन अधिग्रहण करण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी आदोलने केली, हा अनुभव लक्षात घेऊन जमिन अधिग्रहण करण्याच्या कायद्यात बदल करण्याचे त्यावेळी सरकारने ठरविले. शेतकर्‍यांना भरपूर नुकसानभरपाई देण्याची तरतूद या कायद्यात केली. त्यामुळे डाव्या पक्षांसह अनेक पक्षांनी याला पाठिंबा दिला होता. परंतु हा कायदा देशातील भांडवलदारांना नकोसा वाटत होता. त्यामुळे आता नरेंद्र मोदींना हाताशी घेऊन देशातील आघाडीचे उद्योगपती आता या कायद्यात बदल करीत आहेत. याला सर्व पातळीतून विरोध होत आहे. या निमित्ताने सत्ताधारी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बड्या उद्योगतींना पाठिशी घालण्याचे धोरण आता जनतेपुढे आले आहे. यातून भाजपाचा खरा चेहरा जनतेला दिसला आहे. दिल्लीत गजेंद्रसिंगने जाहीरपणे आत्महत्या केल्याने या प्रश्‍नी शेतकर्‍यांचा विरोध एवढा मोठ्या प्रमाणात आहे की, त्यांना आपल्या जावाचीही पर्वा राहिलेली नाही, हेच दिसते. सरकारने यातून धडा घेऊन आपली ताठर भूमिका आता सोडून द्यावी. परंतु मोदींच्या स्वभावात हे बसत नाही. आपल्या विरोधकांना ते याचे श्रेय जाईल या भीतीमुळे या कायद्यातील सुधारणा करतीलच व कायदा न झाल्यास थेट वटहुकून काढतील, असे दिसते. तसे केल्यास सरकारचीच ती आत्महत्या ठरेल.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel