-->
पुन्हा कोरोनाचे आव्हान

पुन्हा कोरोनाचे आव्हान

20 मार्चच्या अंकासाठी अग्रलेख पुन्हा कोरोनाचे आव्हान महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात ओढला जात आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर अशीच म्हणावी लागेल. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या दररोज २५ हजारांनी वाढते आहे व मुंबईतील रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा वाढत चालली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरात याहून कही वेगळी स्थिती नाही. ऑक्टोबर महिन्यांपासून कोरोनाच्या संख्येत उतार सुरु झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे. केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर अन्य काही राज्यातही अशीच स्थिती आहे. परंतु सर्व देशभर ही स्थिती नाही तर काही राज्यातच कोरोना वाढत आहे. यावेळी एकच समाधानाची बाब म्हणजे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय महत्वाच्या काही सूचना केल्या आहेत. त्या मान्य करुन त्याची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज आहे. प्रामुख्याने केंद्राने महाराष्ठ्राला आता लसीचा वाढीव पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. तसेच लसीकरण वेगाने होण्यासाठी लस केंद्र वाढवून ती २४ तास कशी सुरु ठेवता येतील त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. आज राज्यात कोरोना वाढीचे जे हॉटस्फॉट आहेत तेथे लसीकरणा वाढवून तेथून होणारा कोरोनाचा प्रसार थांबविता येईल. त्याचबरोबर ४५ वयोगटातील सर्वांचेच लसीकरण सुरु करण्याची आवश्यकता आहे. सध्या ६०च्या वर सर्वांसाठी लसीकरण सुरु केले आहे. मात्र ४५ ते ५९ या वयोगटात गंभीर आजार असल्यासच लस घेता येते. राज्यात दररोज तीन लाख लोकांना लस देण्यासाठी मुख्यमंत्री नियोजन करीत आहेत. मुंबईसारख्या महानगरात रुग्ण वाढत चालले असले तरीही जनजीवन सुरळीत सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरातील जनजीवन सुरळीत राहिलेच पाहिजे, परंतु योग्य ती खबरदारीही घेण्याची गरज आहे. त्याबाबतीत मुंबईकर हेळसांड करीत आहेत. मुंबईतून अन्य शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोना पसरण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या हातभारच लागत आहे. मुंबई व तिच्या परिसरात गेल्या दोन आठवड्यात ७० टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबई व तिची उपनगरे ही जशी धोकादायक बनली आहेत तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुन्हा एकदा धोक्याच्या स्थितीत आले आहे. गेल्या वेळी येथील कोरोना विशेष प्रयत्न करुन आटोक्यात आला होता. आता मात्र येथे पुन्हा कोरोना डोके वर काढीत आहे. त्याचबरोबर मराठवाडा व विदर्भातील अनेक मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपटपट्टी म्हणून जिचा उल्लेख होतो त्या धारावीत आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. गेल्या वेळी महानगरपालिकेने फार कष्ट घेऊन धारातील कोरोना आटोक्यात आणला होता. पर्यटनाचे महत्वाचे केंद्र व औद्योगिकष्ट्या विकसीत झालेल्या रायगड जिल्ह्यातही कोरोना वाढला आहे. अगदी महिनाभरापूर्वी कोरोना शून्यावर येईल व रायगड कोरोनामुक्त होईल अशी चिन्हे दिसत होती. परंतु त्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन लादले जाणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे. कारण जनतेला व सरकारलाही पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. परंतु लॉकडाऊन होणार नाही यासाटी जनतेने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सध्या उदभवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने काही प्रतिबंध कडकरित्या लादण्याची आवश्यकता आहे. त्यात प्रामुख्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करता येत नसली तर मॉल्स, सिनेमागृहे, समारंभ यावर बंदी घातली गेली पाहिजे. आहे. रेस्टॉरंटमधून फक्त डिलिव्हरी नेण्याची सोय करावी लागणार आहे. यातील काही निर्बंध सरकारने लादले आहेत. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. वाहतुकीची साधने पूर्णपणे बंद करता येणार नाहीत, परंतु त्यातील प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा घालावी लागेल. माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत राज्य सरकारने जशी घरोघरी जाऊन तपासणी मोहिम हाती घेतली होती, तशी मोहीम पुन्हा एकदा राबवावी लागणार आहे. कोरोना वाढलेल्या शहरात सर्वात प्रथम शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे जेथून कोरोना पसरतो तेथेच त्याला रोखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढच्या तीन महिन्यात राज्याला दोन कोटी २० लाख डोसांची आवश्यकता आहे. म्हणजेच दर आठवड्याला २० लाख डोसची गरज आहे. सध्या आलेल्या लाटेत कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे झपाट्याने संसंर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या वाढविल्या तरच रुग्ण आढळतात. सर्वात समाधानाची बाब म्हणजे, यावेळच्या लाटेत रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. म्हणजेच ही लाट तशी सौम्यच असल्याचे सकृतदर्शनी सध्या दिसते. तसेच मृत्यूंचे प्रमाणही खूपच कमी आहे, ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे आता गेल्या वेळच्या लाटेच्या तुलनेत राज्य सरकारचे काम सोपे झाले असले तरीही नवीन आव्हाने उभी ठाकलेली आहेतच. त्यामुळे आता या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसण्याची गरज आहे.

Related Posts

0 Response to "पुन्हा कोरोनाचे आव्हान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel