-->
अमेरिकेशी मैत्रीचे वारे

अमेरिकेशी मैत्रीचे वारे

संपादकीय पान शनिवार दि. ११ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमेरिकेशी मैत्रीचे वारे
सध्या देशात नरेंद्र मोदी यांना अमेरिकेशी मैत्री करण्याशिवाय अन्य काही सुचत नाही असेच दिसते. कारण गेल्या दोन वर्षात त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तब्बल सात वेळा भेटी घेतल्या. यातून निष्पन्न काय झाले हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी पंतप्रधानांना अमेरिकेतील संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली. अर्थात भारतीय पंतप्रधानाला अशा प्रकारे मिळालेली ही काही पहिली संधी नव्हती. कारण यापूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरु व राजीव गांधी यांनाही अमेरिकन संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली होती. सध्या मोदींच्या भाषणाबद्दल त्यांचे कौतुक होत असले तरीही नेहरु व राजीव गांधी यांची भाषणे याहून गाजली होती, हे विसरता कामा नये. नेहरुंचे भाषण हे तर शीत युध्दातील काळातील होते आणि राजीव गांधींचे भाषणे हे शीतयुध्दानंतरच्या काळातील होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाला एक वेगळा जागतिक संदर्भ होता. नरेंद्र मोदींना त्यातुलनेत फक्त भारत अमेरिका सहकार्य व दहशतवाद हेच मुद्दे पुढे ठेवावे लागले आहेत. मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्या दहशतवादाबद्दल भाष्य केले. अर्थात अमेरिकेला केलेली ही काही नवीन तक्रार नाही. मात्र अमेरिका याकडे काही काळ लक्ष देते आणि मदत करण्याची वेळ येते त्यावेळी ते पाकिस्तानलाच मदत करतात. प्रामुख्याने लष्करी सहाय्य करण्याचा प्रश्‍न येतो त्यावेळी त्यांना पाकिस्तान जवळचा वाटतो. आता अफगाणिस्तानातून अमेरिकेतच्या सैन्याची माघार झाल्यापासून त्यांनी पाकवर मदतीची खैरात केली होती. अर्थात सध्याच्या नवीन समिकरणात पाकने चीनशी केलेली दोस्ती पाकिस्तानला काही रुचलेली नाही. त्यामुळे त्यांनी भारताशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे राजकारण हे अशा प्रकारचे आहे. अमेरिकेशी पक्की व निश्‍चित मैत्री त्यामुळेच होऊ शकत नाही. अमेरिकेला जर आपल्यापेक्षा कोण जास्त प्रिय वाटला तर ते त्यांच्यादिशेने कधी धावतील ते समजणार नाही. २००८ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी आपले सरकार पणाला लावून भारत-अमेरिका अणुकरार घडवून आणला होता. त्या वेळी भाजपने संसदेत व रस्त्यावर उतरून या अणुकरारावर प्रखर टीका केली होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व आजच्या केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-अमेरिका अणुकराराची तुलना तर देश गहाण टाकला जात आहे अशी टीका करुन करण्यात आली होती. आता केंद्रातले सत्ताधारी मोदींच्या अमेरिका भेटीचे व नव्या मैत्रीपर्वाचे गुणगान गात आहेत. मोदींच्या अमेरिका भेटीने उभय देशांमध्ये अणुतंत्रज्ञान हस्तांतरण, अणुकरार दायित्वाचे काही मुद्दे, भारताला जगात एक अण्वस्त्रधारी देश म्हणून हवी असणारी प्रतिमा व भारताचे अणुक्षेत्रात जगाचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर बरेच मंथन झाले. मोदींनी अमेरिकेशी केवळ लष्करी व आर्थिक पातळीवर संबंध मर्यादित न ठेवता आण्विक क्षेत्रात अमेरिकेच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा भारताला अधिकाधिक फायदा व्हावा यादृष्टीने पावले उचलली आहेत. म्हणजे विरोधात असताना एक भूमिका व आता सत्तेत असताना दुसरीच भूमिका अशी भाजपाची निती आहे. यात अमेरिकन मैत्रीचे वारे किती काळ टिकणार ते पहायचे.

0 Response to "अमेरिकेशी मैत्रीचे वारे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel