
एक वर्षानंतर...
24 मार्चच्या अंकासाठी अग्रलेख
एक वर्षानंतर...
देशात लॉकडाऊन सुरु झाले त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. देशातील लॉकडाऊन वर्षानंतरही पूर्णत: उठलेले नाही. उलट काही भागात तर पुन्हा लॉकडाऊन लादण्याची नामुष्की आली आहे. मुंबईसह बहुतांशी राज्यातील महानगरात कोरोनाने पुन्हा एकदा जबरदस्त डोके वर काढले आहे. कोरोनाची जशी स्थिती लॉकडाऊन सुरु करताना होती आज तीच स्थिती वर्षानंतर बहुतांशी कायम आहे. फक्त एकच जमेची बाब म्हणजे कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याकडे आता लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्याचा मार्ग अतिशय सुलभ झाला आहे. विज्ञानाने दिलेली ही लसच
आता लोकांचे जीव वाचवित आहे, हे विसरता येणार नाही. देशात कोरोना सुरु होण्याअगोदर आपण बेफिकीर होतो. त्यावेळी सरकारने ट्रम्प यांच्या प्रचारार्थ अहमदाबादमध्ये जोरदार सभा आयोजित केली होती. भर कोरोनात ५० हजारांचा जमाव बोलाविण्यात आला होता. त्यानंतर मध्यप्रदेशातील कॉँग्रेसचे सरकार पाडून भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारने आपले लक्ष कोरोनाकडे वळविले. कोरोनाची ही आपली लढाई प्रदीर्घ आहे व त्यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने बजाऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष केले होते. चीनमधून आलेला हा कोरोना जगभर पसरला, मात्र चीनी सरकारने कडक उपाययोजना करीत म्हणजेच बंदुकीच्या धाकाने लोकांना शिस्त लावीत त्याला आटोक्यात आणले. आजही चीनमध्ये कोरोना आहे, परंतु अगदीच नगण्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मात्र भारतासह जगभर कोरोना आपले अस्तित्व टिकवून आहे. कोरोनाचा नेमका उगम कोठून झाला व त्याची कारणे कोणती तसेच हा विषाणू कृतिमरित्या सोडण्यात आला आहे का, या सर्वांची उत्तरे अजून तरी एक वर्षानंतर अनुत्तरीतच आहेत. सर्व जगाने याबद्दल चीनला लक्ष्य केले आहे, परंतु त्याचे काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काळाच्या ओघात याचेही नेमके उत्तर मिळू शकेल. कोरोनाचा पहिला विषाणू नोव्हेंबरात आढळला होता आणि त्यानंतर एका महिन्याने चीनने याची माहिती जगाला दिली. त्यानंतर आपल्याकडे प्रत्यक्षात लॉकडाऊन सुरु व्हायला मार्च महिन्याचा अखेरचा आठवडा आला. आपल्याकडे लॉकडाऊनची पंतप्रधानांनी घोषणा केली, मात्र कोणाला घरी पोहोचण्याची किंवा इच्छीत स्थळी जाऊन लॉकडाऊनच्या काळात राहण्याची संधीच दिली गेली नाही. त्यामुळे लोक एका रात्रीत अचानकपणे जिकडे होते तिकडे अडकले. यात सर्वात हाल झाले ते स्थलांतरीत मजुरांचे. कारण त्यांना गावी जाता येत नव्हते किंवा कामाच्या ठिकाणी राहणे परवडणारे नव्हते. अशा स्थितीत या मजुरांनी दोन दोन महिने कसेबसे काढले आणि गावी जाण्यासाठी पायपीट सुरु केली. मे महिन्याच्या भयाण ऊनातून त्यांना पायी चालत जावे लागले. त्यात अनेकांचे वाटेतच मृत्यू झाले. परंतु याची दखल काही सरकारने घेतली नाही. ज्यावेळी अशाच एका मजुरांच्या ताफ्याला पहाटेच्या वेळी रेल्वेने चिरडले आणि बारा जण मृत्यू पावले त्यावेळी सरकारला जाग आली. या घटनेनंतर श्रमिकांसाठी खास रेल्वे सुरु करण्यात आल्या. परंतु सरकारने या मजुरांना मोफत घऱी पोहोचविले नाही तर त्यांच्याकडूनही भाडे वसुल केले. कोरोनाचे जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला फटके बसले तसेच विविध उत्पन्न गटातील लोकांना चटके उपभोगायला लावले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, प्रामुख्याने ज्यांचा वयोगट ५०च्या वर आहे त्यांचे यात जास्त नुकसान झाले. या वयोगटातील लोकांना पुन्हा अन्य ठिकाणी नोकरी मिळणेही अवघड जात आहे. लाखो लोकांच्या यात नोकऱ्या गेल्या. तसेच ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांना पगारकपातीला सामोरे जावे लागले. आजही वर्षानंतर यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्वपदाला आले नाहीत. अनेक उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले. यातील काही उद्योगधंदे पुन्हा सुरु होतीलच असे नाही. अनेकांना कोरोनानंतर आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागत आहे. सरकारने किमान तीन मोठ्या आकड्यांची पॅकेज जाहीर केली. परंतु त्यातील फारसा फायदा कोणाला झालेला नाही. कारण आकड्यांशी गोलमाल करुन केलेली ही सर्व पॅकेज होती. पंतप्रधानांनी एकदा मोठी घोषणा करुन वीस लाख कोटी रुपयांचे अवाढव्य पॅकेज जाहीर केले. परंतु याचा नेमका लाभ किती लोकांना मिळाला याचा अभ्यास केल्यास यात फारच कमी लाभार्थी मिळतील. कोरोनाची लस आपल्याकडे आता हाती आल्याने फार सोपे काम झाले आहे. कोरोनाशी लढाई एवढ्या लवकर संपणारी नाही. त्यासाठी प्रदीर्घ लढा अजूनही द्यावा लागणार आहे. केवळ टाळ्या वाजवून किंवा मेणबत्या लावून ही लढाई संपणारी नव्हती. आपल्याकडे पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन याहीही बाबी लोकांनी उत्साहाने केल्या. दर शतकाने येणारी ही महामारी आहे, त्यातून जगाची दिशा बदलत असते. यावेळच्या कोरोनाच्या लढाईतून जग कशा रितीने बदलते ते पहावे लागेल. कार्यालयाशिवाय कामकाज आता नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य आहे, कोरोनाने हे जगाला आता पटवून दिले आहे. त्यामुळे कोरोनापश्चात जग हे पूर्णपणे बदललेले असेल, यात काही शंका नाही. आगामी काळात कोरोना नियंत्रणात आल्यावर जगाने कात टाकलेली असेल व त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान अग्रभागी असेल.
0 Response to "एक वर्षानंतर..."
टिप्पणी पोस्ट करा