-->
संपादकीय पान बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
बिहारी तडका
---------------------
देशाच्या राजकारणात आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. आजवर दोस्त म्हणून सत्तेत असताना गळ्यात गळे घातलेले पक्ष आता विभक्त होण्याच्या मार्गात आहेत. तसेच काल पर्यंत शत्रू पक्ष म्हणून ओळखले गेलेले आता तुझ्या गळा माझ्या गळा असे गाणे म्हणू लागले आहेत. एकूणच काय तर सर्व गणिते सत्तेची आहेत. प्रत्येकाला सत्तेपर्यंत पोहोचायचे आहे आणि हे पोहोचण्यासाठी ते आपली तत्वे गुंडाळून ठेवण्यासही तयार झाले आहेत. सत्तेची पायरी चढणे हे प्रत्येक राजकारण्याचे उदिष्ट असते, असावेही. परंतु त्यासाठी आपल्या तत्वांना, विचाराला तिलांजली द्यायचा निर्णय घेतला तर या राजकारण्यांना जनता हिसका दाखविते. निवडणुकीच्या तोंडावर सध्या बिहारमध्ये जे राजकीय नाट्य सुरु झाले आहे त्याला काही तोड नाही असेच म्हणावे लागेल. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री व चारा फेम गुन्हेगार लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. हा लालू व कॉँग्रेस या दोघांनाही जबरदस्त धक्का समजला जातो. कारण बिहारमध्ये या दोघांची युती आहे. आगामी लोसकभा निवडणुकीतही ही युती होण्याचे संकेत होते. लालूंच्या बिहारमधील २२ पैकी १३ आमदारांनी स्वतंत्र होऊन आपला एक वेगळा गट स्थापन केला आहे. यातील सात जण पुन्हा लालू यांच्या गटात परतल्याची  बातमी आहे. मात्र हे सर्व अनिश्‍चित आहे. एक वस्तुस्थिती आहे की लालू यांची जी पक्षात दादागिरी होती आणि त्या जोरावर आमदार त्यांच्या भोवती होते ती स्थिती आता राहिलेली नाही. प्रामुख्याने चारा घोटाळा प्रकरणी लालू दोषी ठरल्यावर १७ वर्षांनतर त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. ज्या कॉँग्रेसची त्यांनी गेल्या पंधरा वर्षात पाठराखण केली त्यांचेच आघाडी सरकार सत्तेत असताना चारा घोटाळा प्रकरणी लालूंना जेलमध्ये जावे लागणे हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. कॉँग्रेसला सत्तेत पाठिंबा देऊन मग उपयोग तो काय झाला असा संप्तत सवाल लालू प्रसाद यांच्या समर्थकांचा आहे. लालू प्रसाद यांचा मतदार हा प्रामुख्याने यादव व मुस्लीम आहे. सध्या फूटून बाहेर पडलेल्या आमदारात यातीलच म्हणजे मुस्लीम व यादव आमदार आहेत. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या या मतदारांच्या पेटीलाच सुरुंग लागला आहे. लालू हे जेलमध्ये गेल्यापासून त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये एक अनिश्‍चतेचे व नैराश्येचे वातावरण तयार झाले. आता आपला नेताच जर जेलमध्ये खडी फोडायला गेला तर आपले काय होणार अशी अनिश्‍चितता त्या आमदारांना वाटणे स्वाभाविकच आहे. तत्यातून हे आमदार फूटून बाहेर पडले आहेत. एक तर सध्याच्या स्थितीत लालूप्रसाद यांच्या बरोबर राहणे म्हणजे आपली पत कमी करुन घेणे हे स्पष्टच आहे. त्याचबरोबर सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या कॉँग्रेस पक्षाने देखील आपल्या नेहमीच्या स्टाईलने लालूप्रसाद यांच्याबरोबर जागा वाटपाची चर्चा अजून केलेली नाही. म्हणजेच लालूंच्या पक्षाला कॉँग्रेसने ताटकळत ठेवले आहे. बरे कॉँग्रेसची बिहारमधील ताकद अगदी नगण्य झाली आहे. गेल्या वेळी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राहूल गांधी यांनी ठिकठिकाणी प्रचार दौरे करुन कॉंग्रेसमध्ये जान आणण्याचा प्रयन केला होता परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि कॉँग्रेसची ताकद तसूभरही वाढली नाही. अशा प्रकारे एकीकडे ताकद कमी असतानाही कॉँग्रेसची बिहारमधील मस्ती काही कमी झालेली नाही. त्यांना लालू व पासवान यांच्या सोबत जागा वाटपाचा समझोता करण्याशिवाय काही पर्याय नाही. असे असले तरी हे दोघे आपल्यापेक्षा वरचढ होणार नाहीत हे कॉंग्रेस बघत बसल्याने आता त्यांना फटका सहन करावा लागणार आहे. निवडणुकांसाठी पासवान यांनी कॉँग्रेसशी हातात हात घेण्याची तयारी ठेवली होती. मात्र कॉँग्रेसने त्यांना दरवाज्यावरच प्रदीर्घ काळ उभे ठेवल्याने पासवान यांनी आता भाजपाचा मार्ग धरला आहे. अर्थात पासवान हे यापूर्वी भाजपाच्या आघाडीत होते. मात्र २००२ साली गुजरात दंगलीनंतर त्यांनी भाजपाची साथ सोडली होती. आता मात्र ते पुन्हा एकदा भाजपाच्या कळपात जायला सज्ज झाले आहेत. भाजपाबरोबर जाण्यात नरेंद्र मोदी यांचा काही अडथळा नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याने रामविलास पासवान आता भाजपाच्या कळपात गेल्यासारखे आहेत. यावेळी कॉँग्रेसबरोबर जामे म्हणजे विरोधात बसणे. त्यापेक्षा भाजपाबरोबर जाऊन निदान सत्तेच्या जवळ जाण्याचा आपला चान्स वाढू शकतो असे गणीत त्यांनी मांडले असावे. तिकडे राज्यात सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी भाजपाची साथ सोडल्यावर तेथे झालेल्या भाजपाच्या व नरेंद्र मोदींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे यावेळी मोदी नितीशकुमार यांच्या बाजूची मते खेचणार की काय अशी चींता त्यांना लागली आहे. एकेकाळी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र आता त्यांच्यावर राज्यातली सत्ता टिकविण्याचे मोठे संकट येणार आहे. बिहारमध्ये आता अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. लालूप्रसाद यादव हे यावेळी निवडणूक लढवू शकणार नाहीत. लालूंची जादू आता संपली आहे. कॉंग्रेसची तर तेथील स्थिती दयनीय आहे.  अशा वेळी कोणता पक्ष बाजी मारतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे. सध्यातरी राजकारणात बिहारी तडका जबरदस्त रंग आणीत आहे. या तडक्याचा कुणाला ठसका लागतो ते पहायचे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel