-->
संपादकीय पान बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
कामगारांच्या थडग्यावर उभारली जातेय कतारमध्ये वर्ल्ड कप नगरी
-------------------------------------
डिसेंबर महिन्यात ज्यावेळी अमेरिकेतील देवयानी खोब्रागडे प्रकरण जोरात सुरु होते त्यावेळी दिलीप खोसला हा तरुण आपल्या बंधूचा कतारमध्ये अचानक मृत्यू झाल्यामुळे भारतात विदेश मंत्रालयाकडे झगडत होता. मात्र त्याच्याकडे लक्ष द्यायला विदेश मंत्र्यांना किंवा कोणत्याही माध्यमाला वेळ नव्हता. यामागचे साधे कारण होते ते म्हणजे दिलीप खोसलाचा भाऊ जितेंदरसिंग हा एक सर्वसामान्य कामगार होता आणि त्याला कुणीही वाली नव्हता. जितेंदरसिंगचा अचानक विमानतळावर मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूचे कारणही ठोस देण्यात आले नाही. तत्यामुळे आपल्या भावाच्या मृत्यूचे कारण समजावे अशी दिलीपची रास्त मागणी होती. मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. कतार या आकाती देशात गेलेल्या हजारो कामगारांपैकी अनेकांची अशीच कथा आहे. कतार येथे २०२२ साली आयोजित केल्या जाणार्‍या जागतिक फूटबॉल्ड कपच्या निमित्ताने तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. तेथे भारतातून हजारो कामगार कंत्राटावर गेले आहेत. तेथे काबाडकष्ट करुन ते भारतापेक्षा जास्त मजुरी मिळवितात. परंतु तेथे काम ऐवढे कष्टाचे आहे की त्यात अनेक कामगारांचा म्हणजे सुमारे ५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यांच्याकडे पहायला कुणाला वेळ नाही. कतार सरकार या कामगारांबद्दल ऐवढे निढावलेले आहे की त्यांच्या मृत्यूचे कारणही देत नाही किंवा त्यांच्या शवाचे विच्छेदनही करीत नाहीत. त्यामुळे हे कामगार नेमके कशामुळे मरण पावतात हे समजण्यास मार्गच नाही. कतार ज्या प्रकारे आपल्या बांधकामांसाठी जगातून प्रामुख्याने आशियातील तिसर्‍या जगातून कामगार बोलावून त्यांच्याकडून काम करुन घेत आहे त्याला विविध जागतिक कामगार संघटना व ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने आक्षेप घेतला आहे. सध्या इवल्याश्या कतार मध्ये ९४ टक्के विदेशी नागरिक आहेत आणि त्यातील बहुतांशी हे मजूर आहेत. भारतातून तेथे काम करण्यासाठी सुमारे पाच लाख मजूर गेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. तेथे कामगारांना पगार कमी दिला जातोच शिवाय कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही. तेथील कामगारांना योग्य निवास व्यवस्था पुरविली जात नाही व त्यांच्या आरोग्याचीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे फूटबॉलच्या या आगामी स्पर्धेसाठी आजवर सुमारे चार हजार कामगारांचे बळी गेले आहेत. त्यात सुमारे ५०० भारतीय कामगार आहेत. भारतात वा अन्य देशात त्यांना मिळणार्‍या रोजगारापेक्षा त्यांना जास्त मजुरी मिळते ही वस्तुस्थिती असली तरीही त्यांना कोणत्याही सुविधा न पुरविल्यामुळे हे गरीब कामगार आपले भविष्य चांगले जाईल या इच्छेने तेथे काबाडकष्ट करीत आहेत. तेथे ज्यावेळी एखादा कामगार म्हणून जातो त्यावेळी त्याच पासपोर्ट सरकार ताब्यात घेते. त्यामुळे या कामगारांचा जाण्याचा मार्ग संपतो. ज्यावेळी तेथील व्यवस्थापन पाठवेल त्याचवेळी त्यांना मायदेशी जाता येते. एकप्रकारे ही गुलामीच आहे. जर एखादा कामगार मरण पावला तर त्याचा मृतदेह मिळायला कधी तीन-चार महिने देखील लागतात. गरीब कुटुंबातले हे कामगार असल्याने त्यांना पैशाच्या अभावी मृत्यूचे कारण शोधणे कठीण असते. कतारमध्ये कोणतेही स्वातंत्र्य नाही. तेथे स्वयंसेवी संघटना नाहीत किंवा निर्बंधमुक्त असे माध्यमे नाहीत. भारत, फिलिपाईन्स, नेपाळ, श्रीलंका या देशातून हे गरीब कामगार कामाला जातात आणि तेथे जाऊन फसतात. अनेकदा त्यांचे मृतदेहच येतात. फूटबॉलचे सामने भरविण्यासाठी कतारमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. २०२२ साली हे सामने ज्या ठिकाणी खेळले जातील तेथे अनेक कामगारांची थडगी असतील, असेच खेदाने नमूद करावेसे वाटते.
------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel