-->
आता मॉन्सूनचा अचूक अंदाज

आता मॉन्सूनचा अचूक अंदाज

संपादकीय पान मंगळवार दि. २६ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता मॉन्सूनचा अचूक अंदाज
आपल्या देशातील मान्सून अत्यंत बेभरवशाचा. तो कधी पडणार? किती पडणार? याचा नेमका अंदाज कोणी बांधू शकत नाही. त्यातच आपल्या देशातील हवामान खात्याची नेहमीच थट्टा होते. आपल्या हवामान खात्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान अजूनही उपलब्ध नाही. आपण आजही पूर्वीच्या तंत्रज्ञानाच्या आधारावर अजूनही अंदाज बांधतो व ते फसतात आणि आपण पुढील नियोजन काही करु शकत नाही. गेल्या दोन वर्षात पडलेला भीषण दुष्काळ पाहता हवामानाचा अचूक अंदाज बांधणे ही काळाची गरज ठरली आहे. भारतीय शेतकर्‍यांसाठी मान्सूनचे टायमिंग अत्यंत महत्वाचे आहे. भात, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी पाऊस योग्य वेळी पडणे आवश्यक असतेे. मान्सूनच्या फरकामुळे पूर किंवा दुष्काळ पडू शकतो. जलविद्युत प्रकल्पाचे पूर्ण नियोजन मान्सूनवर अवलंबून असते. सलग तीन वर्षांपासून हिंदी महासागरात एल निनो या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे देशभरात पावसाने ओढ दिली होती. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. हे सर्व पाहता मान्सूनचा अंदाज योग्य असणे हे अत्यंत महत्वाचे ठरते. परंतु आपल्याकडे सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करता आपण अचूक अंदाज व्यक्त करु शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशांकडून आपल्याला याविषयीचे ज्ञान मिळविणे गरजेचे झाले आहे. यंदा आपल्याला अचूक अंदाज जर्मन तंत्रज्ञान देणार आहेत. या भारतीय मान्सूनचा अभ्यास करून त्याचे अचूक टायमिंग वर्तवण्याची किमया जर्मन संशोधकांनी केली आहे. त्यामुळे मान्सून कधी येणार व कधी जाणार याची अचूक माहिती आता भारताला मिळेल. त्यामुळे पीक व जलविद्युत प्रकल्पांना मोठा मदत मिळणार आहे. जर्मनीतील हवामान खात्यातील संशोधकांच्या सांगण्यानुसार, ते मान्सूनचे भाकीत दोन आठवडे आधी वर्तवू शकतात. तर पावसाळा कधी संपणार याचे भाकीत सहा आठवडे आधीच सांगू शकतात. प्रादेशिक हवामान माहितीच्या विश्लेषणावर ही पद्धत अवलंबून आहे. हे संशोधक लवकरच आपले मॉडेल भारतीय हवामान खात्याला सादर करणार आहेत. उत्तर पाकिस्तान व पूर्व घाट हा डोंगराळ प्रदेश हिंदी महासागराच्या जवळ आहे. तापमानातील बदल व उष्म्याच्या प्रमाणामुळे मान्सूनमध्ये बदल होतो. भारतात पारंपरिकपणे केरळमधील मान्सूनच्या आगमनावर लक्ष केंद्रीत केले जाते. यंदाच्या वर्षात संपूर्ण देशभरातच सरासरी ओलांडणार्‍या पावसाचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले असतानाच, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. यंदा आपण मान्सूनच्या भविष्याबाबत केवळ देशातील हवामानखात्यावर अवलंबून नाही, यंदा यातील जर्मन व जपान तसेच ऑस्ट्रेलियातील तंत्रज्ञ आपल्याला अंदाज व्यक्त करण्यात मदत करणार असल्याने शेतकर्‍यांनी निर्धास्त व्हायला हरकत नाही, असे दिसते. १९७२ च्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती, मात्र पाणी उपलब्ध होते. पाण्याची उपलब्धता असल्याने जनतेने तो दुष्काळ परतवून लावला होता. यंदा मात्र पाण्याचीच भीषण टंचाई निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्याने आत्तापासून दुष्काळग्रस्त भागास दिलासा मिळाला आहे. हिंदी महासागरात या वेळी कमालीचे तापमान वाढले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच पावसाला अनुकूल असणारे दमट वातारणही त्यामुळे निर्माण होत असल्याचे दोन्ही देशांच्या वेधशाळेने म्हटले आहे. एल निनो हळूहळू कमी होत आहे. या काळात दक्षिण गोलार्धात त्याचा वातारणावर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे सागरी प्रदेशात येणार्‍या देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Related Posts

0 Response to "आता मॉन्सूनचा अचूक अंदाज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel