-->
दोन विचारांचा संघर्ष

दोन विचारांचा संघर्ष

संपादकीय पान सोमवार दि. २५ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दोन विचारांचा संघर्ष
जे.एन.यू.चा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारचा मुंबई-पुण्यातील दौरा होऊ नये यासाठी सरकारने पोलिसांना हाताशी धरुन अनेक उपाय केले, परंतु जनतेने ते काही जुमानले नाही. कन्हैयाची मुंबईतील पहिली सभा केवळ झाली नाही तर ती गाजली. पोलिसांनी टाकलेल्या जाचक अटींमुळे सभेचे स्थान बदलावे लागले. परंतु टिळकनगर येथे सभा करुनही तेथे तुडुंब गर्दी झाली होती. जणू काही पुरोगामी डावा विचार आणि बुरसटलेल्या मनुवादाचे रुप घेऊन आलेल्या संघाच्या विरोधातील ही आय.पी.एल. मँचच ठरावी. मात्र आय.पी.एल.मधील धागडधिंग्याप्रमाणे त्याचे स्वरुप नव्हते. तर ती दोन विचारांमधील वैचारिक लढाई खेळली गेली होती. यापूर्वीच्या कन्हैयाच्या नागपूरच्या सभेत झालेली चप्पल फेक, ही सभा होऊच नये यासाठी पोलिसांनी केलेली दमनशाही या पार्श्वभूमीवर कन्हैयाची झालेली सभा लक्षणीयच ठरावी. मुंबई हे गिरणी कामगारांच्या घामातून उभे राहिलेले शहर, परंतु मुंबईची ही कष्टकर्‍यांची ओळख फुसण्यात आजवरचे सर्व सत्ताधारी यशस्वी ठरले असले तरीही वास्तवात मात्र हे शहर कष्टकर्‍यांचेच राहिले आहे. असो. अशा या कष्कर्‍यांच्या शहरात कन्हैयाची झालेली ही सभा म्हणजे आजवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकमान्य टिळक, कॉम्रेड डांगे, डॉ. दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस यांच्या व अन्य नेत्यांच्या वैचारिक सभांची आठवण करुन देणारी होती. याच मुंबईतून स्वातंत्र्य लढ्याची, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची, गिरणी कामगारांच्या एतिहासिक संपाची ढिणगी पडली होती, याची आठवण होण्याचे कारण म्हणजे या सर्व लढ्यांना पोलिसांनी ज्या प्रकारे विरोध केला होता तोच विरोध कन्हैयाच्या जाहीर सभेला केला होता. या सभेच्या बातम्या विविध संघांच्या विचारांना वाहिलेल्या भांडवली विचारांच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर प्रसिध्द केल्या नाहीत, कारण त्यांना या सभेतील क्रांतीची ठिणगी समजायला उशीर लागेल. सत्ताधारी भाजपा व संघपरिवारातील त्यांच्या विविध संघटना आज आपल्या हाती असलेल्या प्रसार माध्यमांव्दारे कन्हैया कम्युनिस्ट आहे व त्यांचा विचार जगातून संपलेला आहे असा आक्रोश करीत असतात. कन्हैया कम्युनिस्ट आहे, तो डाव्या विचारांचा आहे हे वास्तव कधीच अमान्य करीत नाही, उलट तो ही बाब ठणकावून सांगत असतो. मात्र जर कम्युनिस्ट विचार जर संपला आहे तर संघ परिवाराला त्याची भीती कशाला वाटते. कन्हैयाचा विचार एकायला जर हातावर मोजण्याइतपत माणसे येणार असे त्यांना वाटत होते तर त्यांनी पोलिसी दमणयंत्रणा त्याविरोधात वापरण्याची काहीच गरज नव्हती. असो. आज कन्हैया जो विचार मांडत आहे त्यातून आपली सत्ता पुढील काळात जाऊ शकते याची खरी भीती भाजपा व संघाला वाटते म्हणूनच ते कन्हैयाची सभा चिरडू पाहत होते. कन्हैयाने आज जे विचार मांडले आहेत, जे प्रश्न सत्ताधार्‍यांना टाकले आहेत, त्यांची उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहेत. आज नाही तर पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी द्यावीच लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर फिरतात मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळी भागास भेट द्यावी असे कधी वाटले नाही, असा कन्हैयाने सवाल केला आहे. अर्थातच हा सवाल केवळ कन्हैयाच्या मनात आलेला नाही तर प्रत्येकाच्या मनातील आहे. कारण विरोधात आसताना आपण जनतेचे सेवक आहोत व आपण पंतप्रधान झाल्यावर आपले दरवाजे जनतेसाठी खुले असतील. जनतेत आपण मिसळणारे आहोत या मोदींच्या पूर्वीच्या वक्त्‌याव्याला सध्याचे वागणे छेद देणारे आहे. राज्यातील निवडणुकीच्या वेळी देखील मोदींनी राज्यातून दुष्काळ हटविण्याची घोषणा केली होती. आता मात्र दुष्काळ कायमचा हटविणे दूरच दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घ्यायला मोदीसाहेब आले देखील नाहीत. नरेंद्र मोदींना जनतेने विकासाच्या मुद्यावर निवडून दिले, त्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा कधीच चर्चेत नव्हता. मात्र त्यांच्या चेहर्‍यामागे संघाचा मुखवटा होता. अर्थात मोदी सत्तेवर आल्यावर हा मुखवटा टराटरा फाडला गेला. कारण याच सरकारने मनुवाद उकरुन काढला आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे तर दुसरीकडे मनुवाद कसा चांगला होता, आजही त्यात बदल करुन कशा त्यातल्या चांगल्या गोष्टी घेता येतील असे संघाच्या तोंडून वदवायचे. जातीव्यवस्थेचा बळी ठरलेला रोहित वेमुलाला हे सरकार कधी न्याय मिळवून देणार, हा सवाल आहे. एकीकडे जातीयवाद फैलावत असताना दुसीरकडे मुस्लिम समाजाकडे शंकेखोर नजरेने पहायचे, मुसलमानांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी भारत माता की जय म्हणण्याची सक्ती करावयाची. मुसलमानांकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र मागणारे हे कोण, असा सवाल आहे. हे सर्व राजकारण संघाचे राजकारण आहे. त्यामुळे हे भाजपाचे नव्हे तर संघाचे सरकार आहे अशी कन्हैयाकुमारची टीका खरी ठरते. विकासाचे ढोल बडवत असताना मेक इंडियाचा देखावा निर्माण करावयाचा, त्यासाठी विदेशी भांडवलदारांना मुक्तव्दार द्यायचे, प्रत्यक्षात रोजगार निर्मितीसाठी सरकारने काडीचाही प्रयत्न करायचा नाही, ही कन्हैयाकुमारची टीका रास्त ठरते. कन्हैयाकुमारच्या प्रश्नांची उत्तरे हे सरकार देणार नाही, कारण त्यांच्या डोळ्यावर सत्तेची झापडे लावलेली असल्यामुळे त्यांना वस्तुस्थिती दिसत नाही. कोण हा कन्हयाकुमार, त्याला कशाला उत्तेरे द्यायची अशी मग्रुरी देखील त्यांची आहे. परंतु जनता त्यांना पुढील निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखविल. बिहारमधील निवडणुकीपासून भाजपा शहाणा झालेला नाही. येत्या १९ एप्रिलला चार विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाला हिसका दाखविला जाईल. कन्हैया कुमारच्या कष्कर्‍यांच्या मुंबईत व एकेकाळचे पेन्शनरांचे शहर असलेल्या व सध्याचे आय.टी हब असलेल्या पुणे शहराच्या दौर्‍यामुळे एक नवे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तर कन्हैयाकुमार विरुध्द संघ प्रवृत्तींचा हा वैचारिक संघर्ष आहे. हा दोन भिन्न विचारसारणीचा लढा आहे. सध्या यात मनुवाद्यांचा विजय झालेला दिसत असला तरी उज्वल भविष्य हे पुरोगामी शक्तींचेच आहे. कारण आपला समाज आता मनुवाद, ब्राह्मणशाही यात जखडणार नाही. आपण याविरोधात यापूर्वीच लढा दिलेला आहे. आता मनुवाद्यांनी डोके वर काढले आहे. मात्र सध्याच्या आधुनिक जगात हे बुरसटलेले विचार टिकाव धरु शकत नाहीत. आपल्या देशात सर्वधर्मसमभावाची मुहुर्तमेढ पुन्हा रोवावी लागणार आहे, हा संदेश कन्हैयाने दिला आहे. कन्हैयाचा लढा प्रदीर्घ आहे. त्याच्या या लढ्याला सर्व शक्ती देत कृषीवलचा लाल सलाम.
---------------------------------------

0 Response to "दोन विचारांचा संघर्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel