-->
संपादकीय पान गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
स्पर्धेच्या युगात ग्राहकच राजा
----------------------------
सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकच राजा ठरणार आहे. प्रामुख्याने ज्या क्षेत्रात कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे तिकडे ग्राहकांचा नेहमीच फायदा होतो असे आढळले आहे. याबाबतचे उत्तम उदाहरण हवाई क्षेत्रातील कंपन्यांचे देता येईल. सध्या विमान कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. सध्या एकतर मंदीचे वातावरण आहे त्यामुळे विमान प्रवास करणार्‍यांची संख्या घटली आहे. अशा वेळी कंपन्या तिकीटांचे दर उतरवून आपल्याकडे खेचण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून स्पाईस जेट या विमान कंपनीने १ एप्रिल ते ३० जून या काळासाठी आपल्या तिकीटात तब्बल ७५ टक्के सवलत देऊ केली आहे. याचे उत्तम उदाहरण द्यावयाचे झाल्यास दिल्ली ते गोवा विमानाचे भाडे ११,१४८ रुपये एवढे आहे. मात्र स्पाईस जेटने या काळात हे भाडे खाली उतरवून चक्क ३७३७ रुपयांवर आणले आहे. स्पाईस जेटने अशा प्रकारे विमानाचे भाडे कपात जाहीर केल्यावर त्यापाठोपाठ इंडिगो व गोएअर या कंपन्यांनी देखील भरघोस कपात केली आहे. त्याचबरोबर टाटा समूहाच्या दोन विमान कंपन्या येत्या गर्दीच्या हंगामातच कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याने विमानाने प्रवास करणार्‍यांसाठी आणखी सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आगामी सुट्टीच्या हंगामासाठी अनेक पर्यटक आपले प्रवासाचे नियोजन करतात आणि त्याची तयारी आत्तापासून सुरु होते. अशा वेळी या ग्राहकाला आपल्याकडे खेचण्यासाठी हवाई कंपन्याची एकच भाऊगर्दी होणे स्वाभाविक आहे. अर्थातच कंपन्यांमध्ये स्पर्धा झाल्याने आता भाडे उतरण्याची संधी प्राप्त झाली आहे. परंतु पूर्वी आपल्याकडे म्हणजे वीस वर्षांपूर्वी विमान सेवेत फक्त सरकारी कंपनी एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स यांचीच मक्तेदारी होती. मात्र उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्वात पहिल्यांदा हवाई उद्योग खुला करण्यात आला आणि या क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची मक्तेदारी मोडीत निघाली. अनेक भूछत्रासारख्या नवीन पिढीतल्या विमान कंपन्या सुरु झाल्या. मात्र त्यातील फारच कमी कंपन्यांना या उद्योगात स्थिरस्थावर होता आले. त्याकाळी स्थापन झालेल्या कंपन्यांनी स्पर्धेमुळे व एकूणच जमा-खर्चाचा मेळ घालता न आल्याने या कंपन्यांना आपला गाशा तरी गुंडाळावा लागला किंवा अन्य कंपन्यात तरी जेमतेम तीन वर्षात विलिन व्हावे लागले. यातील सुरुवातीला स्थापन झालेल्यापैकी फक्त जेटएअरवेज फक्त आजवर आपले अस्तित्व टिकवून आहे. सात वर्षापूीर्व मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या किंगफिशर एअरलाईन्सलाही पाच हजार कोटींचा तोटा झाल्याने त्यांनाही आपला गाशा गुंडाळावा लागला. मात्र आता ज्या कंपन्या खासगी क्षेत्रात टिकून आहेत त्या भविष्यात आपले चांगलेच मूळ धरतील असा अंदाज आहे. त्यातच आता टाटा उद्योगसमूहाच्याही दोन कंपन्या हवाई बाजारपेठेत उतरत आहेत. सुरुवातीला हे क्षेत्र खुले जाल्यावर सरकारी कंपनी एअर इंडियाला स्पर्धा काय असते आणि त्यात टिकून धरण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे ग्राहकांना चांगली सेवा द्यावी लागते हे समजून चुकले. याचा परिणाम असा झाला की, या सरकारी कंपन्यांची सेवा सुधारली. तसेच विमानांच्या दरात लक्षणीय घट झाली त्यामुळे विमानाने फिरणार्‍यांची संख्या वाढली. जो मध्यमवर्ग पूर्वी रेल्वेच्या वाताननूकुलीत डब्यातून प्रवास करीत होता तो विमानाने प्रवास करणे पसंत करु लागला. विमानाचे दर उतरल्याचा या वर्गाने सर्वात जास्त फायदा उठविला. शेवटी सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्राहक हाच सर्वश्रेष्ठ ठरु लागला आहे. त्यामुळे आपण स्पर्धेचे नेहमीच स्वागत केले पाहिजे.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel