-->
कायदे पुरोगामी, मानसिकता मात्र पुराणमतवादी

कायदे पुरोगामी, मानसिकता मात्र पुराणमतवादी

रविवार दि. ३१ जानेवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कायदे पुरोगामी, मानसिकता मात्र पुराणमतवादी
---------------------------------------
एन्ट्रो- दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे ही देखील प्रथाच होती. ती आपण मोडलीच ना? मग शनिदेवाला महिलांनी तेल वाहायचे नाही, मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश करावयाचा नाही, या प्रथा आपण मोडणार की नाही? अशा प्रकारच्या सुधारणा या फक्त हिंदुंच्या देवांना लागू केल्या जातात, देशातील पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना का प्रवेश नाही? याचे उत्तर द्यावे, असा प्रश्‍न तावातावाने उपस्थित केला जातो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश दिला जात नाही, हे चुकीचेच आहे. दुसर्‍या एखाद्या धर्मात चुकीच्या प्रथा आहेत म्हणून आपण आपल्या धर्मातही चुकीच्या प्रथा पाडाव्यात यात शहाणपणा नाही. केरळात आता मशिदीत महिलांना प्रवेश द्यावा यासाठी चऴवळ सुरु झाली आहे, त्याचे स्वरुप लहान आहे परंतु भविष्यात त्यातून मोठी चऴवळ उभी राहून कदाचित महिला पुरुषांच्या बरोबरीने मशिदीत भविष्यात नमाज पडू शकतीलही. आता मुंबईच्या हाजी अलीच्या दर्ग्यात आतमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने सुरु झाली आहेत. अर्थात हे आंदोलन मुस्लिम महिलांमधून पुढे आले पाहिजे. महिलांना कायद्याने समान हक्क दिलेले असले तरीही आपली मानसिकता अजूनही पुराणमतवादी राहिली आहे, त्यामुळे शनि शिंगणापूर, हाजी अलीचा दर्ग्यातील महिलांचे प्रवेश हे प्रश्‍न आजही जिवंत आहेत...
--------------------------------------
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त गाठून शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथर्‍यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. त्यावेळी या प्रथेच्या विरोधात असलेल्या महिला व त्या प्रथेचे समर्थन करणार्‍या महिला अशा समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. यात या प्रथेच्या विरोधात ठाकलेल्या महिलांना पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याची बातमी आहे. शनि शिंगणापूरच्या या मुद्यावरुन देशातील तथाकथीत धर्माचे रक्षणकर्तेही आपले सनातनी विचार घेऊन पुढे आले आहेत. यात आपवाद फक्त श्री.श्री. रविशंकर यांचा. त्यांनी मात्र महिलांनी देवाची पुजा करु नये असे कुठल्याही धर्मग्रंथात म्हटलेले नाही असे सांगून शनि शिंगणापूरच्या या प्रथेला जाहीर विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे शंकराचार्यांपासून सनातन प्रभातपर्यंत सर्वांनीच या प्रथेचे समर्थन केले आहे. सत्ताधारी भाजपाने या वादात फारसे न पडता मिठाची गुळणी घेतली होती. आता मात्र आमचा याला विरोध नाही, महिला असोत वा पुरुष हे समान आहेत व घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करता येणार नाही असे म्हटले आहे. मात्र या सर्वांची पित्रृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजूनही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र सनातन प्रभातने केलेला विरोध पाहता त्यांचीही या शिवाय काही वेगळी भूमिका असले असे नाही, असेच दिसते. देवस्थानच्या विश्वस्तांनी एक वेगळाच तोडगा मांडला आहे. महिलांना तर परवानगी देणारच नाही पण नगद अकरा हजार एकशे रुपये देणार्‍या पुरुषांना चौथर्‍यावर जाण्यासाठी दिली जाणारी परवानगीदेखील रद्द करण्याचा विचार करु असे म्हटले आहे. त्याचबरोबर आंदोलन करणार्‍या महिला आणि त्यांचे पाठीराखे नास्तिक असल्याने त्यांच्याशी चर्चा काय करायची असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन चर्चेचा प्रस्तावदेखील त्यांनी नाकारला आहे. आखाडा परिषदेने यात उडी घेतली आहे. महिलांना देशातील कोणत्याही देवालयात बंदी असता कामा नये कारण स्त्री आणि पुरुष यात भेद करता येत नाही असे या परिषदेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अलीकडेच पार पडलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभ मेळ्यात काही महिला साध्वींनी त्यांच्या स्वतंत्र आखाड्यास अनुमती, आखाड्यास स्वतंत्र जागा आणि शाही स्नानाचा हक्क मिळावा म्हणून आग्रह धरला असता तो याच आखाडा परिषदेने नाकारला होता. इतकेच नव्हे तर साध्वींच्या आखाड्याच्या प्रमुख महिलेने आखाडा परिषदेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोपदेखील केला होता.
शनिशंगणापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शनीच्या मंदिरात चक्क एका  तरुणीने डिसेंबर महिन्यात संरक्षणाचे कडे भेदून शनीच्या चौथर्‌यावर प्रवेश केला व शनीदेवाला तेल वाहिल यावरुन गेली दोन महिने वादांग सुरु आहे. अर्थातच सध्याच्या समानतेच्या काळात अशी परंपरा बंद करण्याची आता वेळ आली आहे. कोणत्याही देवापुढे मग तो कोणत्याही जाती-धर्माचा पुरुष-स्त्री असो तो समान आहे. त्याला देवाची पुजा करण्याचा समान हक्क मिळाला पाहिजे. मग तेथील प्रथा काहीही असल्या तरी त्या घटकाभर बाजूला ठेवल्या पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश करता यावा यासाठी शंभर वर्षापूर्वी संघर्ष करावा लागला. त्या काळी पूर्वापार चालत आलेली प्रथा मोडून काढण्यात आली. सर्व मानव जमातीला हे मंदिर खुले झाले. आज आपण एकवीसाव्या शतकात जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत असताना देवाच्या व्दारी मात्र अजूनही असमानता पोसत आहोत. इंदिरा गांधींना दोन वेळा पुरीच्या जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. एकदा त्यांनी लग्न परधर्मियांशी केले म्हणून व दुसर्‍यांचा नाकारला तो त्या विधवा होत्या म्हणून. दुसर्‍यांदा त्या तेथे गेल्या त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या, परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांनी हा अपमान गिळला. गेल्या महिन्यात अशाच एका दक्षिणेतील मंदिरात महिलांना मासिक पाळीच्या वेळी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना मासिक पाळी येणे हे निसर्गाचे चक्र आहे व त्यात अपवित्र ते काय? परंतु आपल्याकडे पुरुषी वर्चस्वाचा एवढा जबरदस्त पगडा आहे की, त्यातून महिला आयोगाच्या सदस्या देखील या बाबीचे समर्थन करताना दिसतात. या प्रथेचे समर्थन करताना महिला आयोगाच्या एक सदस्या म्हणाल्या होत्या की, मासिक पाळी ही अपवित्र नाही. मात्र मंदिरात असलेल्या प्रथा पाळल्या जाव्यात. मग पूर्वी दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे ही देखील प्रथाच होती. ती आपण मोडलीच ना? मग शनिदेवाला महिलांनी तेल वाहायचे नाही, मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश करावयाचा नाही, या प्रथा आपण मोडणार की नाही? अशा प्रकारच्या सुधारणा या फक्त हिंदुंच्या देवांना लागू केल्या जातात, देशातील पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना का प्रवेश नाही? याचे उत्तर द्यावे, असा प्रश्‍न तावातावाने उपस्थित केला जातो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश दिला जात नाही, हे चुकीचेच आहे. त्याचे कुणी समर्थन करुच शकणार नाही. परंतु दुसर्‍या एखाद्या धर्मात चुकीच्या प्रथा आहेत म्हणून आपण आपल्या धर्मातही चुकीच्या प्रथा पाडाव्यात यात शहाणपणा नाही. केरळात आता मशिदीत महिलांना प्रवेश द्यावा यासाठी चऴवळ सुरु झाली आहे, त्याचे स्वरुप लहान आहे परंतु भविष्यात त्यातून मोठी चऴवळ उभी राहून कदाचित महिला पुरुषांच्या बरोबरीने मशिदीत भविष्यात नमाज पडू शकतीलही. आता मुंबईच्या हाजी अलीच्या दर्ग्यात आतमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने सुरु झाली आहेत. अर्थात हे आंदोलन मुस्लिम महिलांमधून पुढे आले पाहिजे. महिलांना कायद्याने समान हक्क दिलेले असले तरीही आपली मानसिकता अजूनही पुराणमतवादी राहिली आहे, त्यामुळे शनि शिंगणापूर, हाजी अलीचा दर्ग्यातील महिलांचे प्रवेश हे प्रश्‍न आजही जिवंत आहेत.
-------------------------------------------------------------------

0 Response to "कायदे पुरोगामी, मानसिकता मात्र पुराणमतवादी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel