-->
लसीकरणाचे आव्हान

लसीकरणाचे आव्हान

25 मार्चच्या अंकासाठी अग्रलेख लसीकरणाचे आव्हान वयाची ४५ वर्षे पार केलेल्या सर्वांनाच आता लस घेता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे जरुर स्वागत झाले पाहिजे, परंतु यापूर्वीच्या टप्प्यातील लोकांचे लसीकरण अर्ध्यावरही झालेले नसताना एक नवीन टप्पा खुला करणे ही सरकारची फार घाई झालेली आहे असेच म्हणावे लागते. पहिला टप्पा हा वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी व डॉक्टरांसाठी होता. यांचेही अजून लसीकरण पूर्ण झालेले नाही. अर्थात लसीकरण एवढ्या झपाट्याने होणे काही शक्य नाही. रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी लसीचा साठा आहे म्हणून देणे काही योग्य ठरणार नाही. ही लस त्यांना रुग्णालय चालू ठेऊनच द्यावयाची आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात दिली जाणार हे ओघाने आलेच. हा टप्पा अर्धवट असताना दुसरा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा टप्पा सुरु करण्यात आला. या गटातील लसीकरणही अद्याप ६० टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही. त्यानंतर ६० च्यावर वय असलेल्या ज्येष्ठांसाठी व ज्यांचे वय ४५ ते ४९ दरम्यान आहे अशा गंभीर रोग असलेल्यांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. या टप्प्यात ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे येथेच कोरोनाचा फैलाव होतो की काय अशी काहींना शंका येऊ लागली. ती शंका स्वाभाविकपणे खरीच होती. ही गर्दी कमी करण्यासाठी ज्या गतीने लसीकरण केंद्र वाढविली गेली पाहिजेत तशी त्याता वाढ करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातील लोकांचा लस घेण्याकडे जास्त कल आहे. तसे पाहता शहरातील लोकसंख्या पाहता कोरोना तेते झपाट्याने फैलावतो. त्यामुळे शहरी लोकांना लस घेऊन आपली प्रतिकारशक्ती लवकर वाढवायची आहे. ग्रामीण भागातील लोकांचा त्यातुलनेत लस घेण्याकडे कल कमी आहे. आता ४५ वयोगटातील सर्वांसाठीच आता लसीकरण खुले करण्यात आले. अगोदरच्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झालेले नसताना घाईघाईने हा वयोगट लसीकरणासाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशातील ३४ कोटी लोक यासाठी पात्र झाले आहेत. हा फार मोठा टप्पा आहे व त्यांचे योग्यरित्या व कसलाही गोंधळ, गर्दी न होता लसीकरण होणे हे एक आव्हान आहे. परंतु सरकार केवळ घोषणा करते त्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यात कार्यक्षमता दाखवित नाही. त्यामुळे लोकांची ससेहोलपट होत आहे. आज अनेक वृध्द रांगेत उभे राहून लस घेत आहेत, त्यांच्या गर्दीत आता आणखीन भर पडणार आहे. सरकारने ही घाई करण्याचे कारणे म्हणजे देशातील वाढत चालेला कोरोना. पण ज्या प्रमुख शहरात कोरोना वाढत चालला आहे त्या ठिकाणी ४५ च्यावरच्या वयोगटातील सर्वांसाठी लस खुली करण्याचे ठऱविणे अधिक सोयीस्कर झाले असते. देशातील काही भागात वेगाने म्हणजे प्रामुख्याने महानगरातील लोकांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. अशा परिस्थितीत सध्या या महानगरांवर लक्ष केंद्रीत करुन येथील लसीकरणाचा वेग वाढविला असता तरी मोठे उद्दिष्ट साध्य झाले असते. तसेच कोरोनाच्या प्रसाराला शहरातच लगाम लावण्याता आला असता, परंतु तसे न करता सर्वासांठीच लसीकरण खुले केल्याने सरकारच्या आव्हानात मोठी भर पडली आहे. सुमारे ३४ कोटी लोकांना लसीकरण करणे म्हणजे जगाचा विचार करता संपूर्ण युरोपाला किंवा अख्या अमेरिकेला लसीकरण करण्यासारखे आहे. देशाच्या अनेक भागात लसींचा पुरेसा साठा नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे लसींचा पुरवठा वाढविण्याची तातडीची गरज आहे. सरकारने यापूर्वी पहिल्या डोसानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्याचा आदेश काढला होता. परंतु आता या डोसातील कालावधी वाढविण्याता आला आहे. सहा ते आठ आठवड्याच्या अंतराने दुसरा डोस घेता येणार आहे. यासंबंधी सिरम इन्स्टिस्ट्टचे अदीर पुनावाला यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, या लसची निर्माते असलेल्या ऑक्सफर्ड व अँस्ट्राझेंका यांना नुकत्याच केलेल्या एका पाहाणीनुसार, जर दोन डोसातील अंतर वाढविले तर लसीचा प्रभाव अधिक वाढतो असे त्यांना आढळले आहे. सरकारने याविषयी स्पष्टीकरण करुन व तशी लोकांना माहिती देऊन डोसातील अंतर वाढविण्याचे जाहीर करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना हे समजविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे. कोरोना सध्या तरी काही नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत आपल्याकडे लस प्रभाविरित्या वापरुन जनतेला संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. हाफकिन या शासकीय लस निर्मिती केंद्रास अलिकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी भेट देऊन तेथून लस उत्पादन करण्याचा घेतलेला निर्णय त्यादृष्टीने फार महत्वाचा व स्वागतार्ह आहे. हाफकिनसारख्या नामवंत सरकारी संस्थेस उशीरा का होईना त्यात सहभागी करुन घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारच मानावयास पाहिजेत. येत्या वर्षअखेर पर्यंत जर लसीकरण पूर्ण करण्याचे आपण उदिष्ट नक्की केले तर त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या सर्व लस उत्पादनाचे पर्याय खुले केले पाहिजेत. आता कोरोनासी लढण्यासाठी जे लसीचे अस्त्र आपल्या हातात आले आहे त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. केवळ घोषणा न करता पूर्ण विचाराने व त्यादृष्टीने आखणी करुन लसीकरणाचा कार्यक्रम राबविला गेल्यास जनतेला सुसाह्य होईल.

Related Posts

0 Response to "लसीकरणाचे आव्हान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel