-->
धर्म, जात आणि  राजकारण

धर्म, जात आणि राजकारण

शनिवार दि. 23 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
धर्म, जात आणि
राजकारण
सध्या मध्यावधी निवडणुकात धर्म, जात, पैसा, पक्षनिष्ठा यामुळे सर्व वातावरण पार ढवळून गेले आहे. निवडणुकीत अर्थात अशा प्रकारची घुसळण अपेक्षितच असते. या घुसळणीनंतर देश सकारात्मक बाबींकडे जावयास पाहिजे, दुर्दैवाने आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. आपल्या लोकशाहीच्या गाभ्यालाच यातून धक्का लागतो की काय अशी भीती वाटत असते. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्तेच्या दिशेने धावताना पक्षनिष्ठा सर्रास वेशीवर टांगली जात आहे. ज्या नेत्यांनी आपले आयुष्य सर्वधर्मसमभाव मानणार्‍या पक्षात काढली त्यांनी केवळ सत्तेसाठी रातोरात हिंदुत्ववादी पक्षात जावे याला म्हणायचे तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सत्तेपुढे पक्षनिष्ठेलाही आता महत्व राहिलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्याला सात दशके झाली असताना लोकशाहीचे हे निघत असलेले धिंडवडे केवळ जनताच या नेत्यांना मतपेटीतून धडा शिकवून थांबवू शकते. पैसा तर आपल्याकडील निवडणुकीत वारेमाप खर्च केला जात आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची घालून दिलेली मर्यादा बहुदा अर्ज भरावयास वाजतगाजत भव्य मोर्च्याने येतानाच संपत असावी, एवढा पाण्यासारखा खर्च केला जात आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना आता उमेदवारांचा खर्च जर लाखोंच्या घरात जाऊ लागला तर लोकसभेचा खर्च किती असेल, याचा अंदाज यावरुन येऊ शकतो. जात आणि धर्माच्या राजकारणाने तर उच्छाद मांडला आहे. एखाद्या उमेदवाराची लायकी ही तो कोणत्या धर्माचा किंवा कोणत्या जातीचा आहे यावरुन ठरविली जाऊ लागली आहे. यापूर्वीही हे निकष पाहिले जायचे परंतु केवळ तोच अंतिम निकष नसे. आता तर सर्वच यासंबंधिचे चित्र पालटले आहे. आपण आजही भंडारी समाजाचा नेता, मराठा मोर्चा नेता, ब्राम्हणवादी कार्यकर्ता असा जाती-धर्मावर प्रचार करत आहोत हेच आपले दुर्दैव. औद्योगिकीरकरणानंतर जातीव्यवस्था संपुष्टात येईल असे म्हटले जायचे. परंतु हे स्वप्नरंजनच ठरले आणि जात,धर्म प्रत्येक ठिकाणी प्रभावी ठरु लागला आहे. संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरल्यावर त्यांची जात माळी आहे हे सांगून मतदारांना इशारा केला जातो. सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या नविनचंद्र बांदिवडेकर यांना तिकिट मिळाल्यावर एक मोठे वादळ उठले आहे. अर्थात मूळ भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या व समानतनी विचारांचे समर्थन करणार्‍या बांदिवडेकरांना कॉँग्रेसचे तिकिट मिळाल्यावर अनेकांच्या भूवया उंचावल्या जाणे स्वाभाविक होते. या महाशयांनी सनातन संस्थेशी संबंधीत असलेल्या वैभव राऊतला बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाल्यावर तो कसा निराधार आहे यासाठी सभा आयोजित केली होती. बांदिवडेकर हे कधीच कॉँग्रेसचे नव्हते. सुरुवातीपासूनच ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे प्रभादेवीला एक हॉटेल आहे, हा त्यांचा व्यवसाय. त्यांनी मागच्या विधानसभेला राजापूरातून भाजपाचे तिकिट मागितले होते. कॉँग्रेसचे तिकिट मागेपर्यंत ते पक्षाचे साधे सदस्यही नव्हते. अशा या माणसाला कॉँग्रसने केवळ जातीच्या आधारावर तिकिट दिले आहे. त्यांनी वैभव राऊतच्या संदर्भात यापूर्वी केलेली विधाने पोटात घातली जात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज कॉँग्रेसकडे नेतृत्व नाही, अशी स्थिती आहे. मात्र येथे कॉँग्रेसची सुमारे लाखाच्या घरात कमिटेड मते आहेत. ही मते कॉँग्रेसच्याच उमेदवारांना पडतात अन्य कोणालाही पडत नाहीत. त्यातच बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे असल्यामुळे तसेच भंडारी समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे या समाजाची सुमारे लाखभर मते या मतदारसंघात आहेत. त्या मतांवर डोळा ठेऊन कॉँग्रेसने त्यांना तिकिट दिले आहे. बांदिवडेकरांना येथून विजयाची खात्री नसली तरीही आपल्या समाजात आपले यानिमित्ताने चांगले वजन निर्माण करता येते. त्यांना भाजपा तिकिट देऊ शकत नाही, त्यामुळे बांदिवडेकरांना निवडणूक लढविण्यासाठी कॉँग्रेसही चालते. बरे खर्च करण्याची त्यांची कुवत आहे. यावेळची कॉँग्रेसची लढाई ही सामान्य नाही तर ती सेक्युलर विचार विरोधी हिंदुत्ववादी अशी लढाई असताना व पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी याविषयी वारंवार हा विचार मांडत असतानाही राज्यातील कॉँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांच्या विचारालाच सुरुंग लावून बांदिवडेकरांचे नाव केंद्रीय समितीकडे पाठविले. बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे पदाधिकारी आहेत, हे मान्य. परंतु त्यांनी भंडारी समाजाचा नेता देशविघातक कृत्य करतो व त्याचे केवळ आपल्या समाजाचा आहे म्हणून त्याचे समर्थन करणे हे चुकीचेच आहे. राजकीय व्यक्तीने आपली जात, धर्म राजकारणात आणता कामा नये, हे मान्य. परंतु तशी आदर्श स्थिती आपल्या देशात सध्या नाही. परंतु एकीकडे हिंदुत्ववादी विरोधी लढाईची भाषा करायची आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी विचारांच्या माणसांना तिकिटे देणे हे कॉँग्रेसचे दुटप्पी धोरण झाले. कॉँग्रेसकडे जर या मतदारसंघात लढवायला कुणीच तयार नसेल तर त्यांनी एकवेळ जागा सोडून द्यावी, परंतु अशा विघातक शक्तींचे समर्थन करणार्‍या व्यक्तीस तिकिट दिल्यास त्याचा चुकीचा संदेश जाणार आहेे. भाजपा नको, या मुद्यावर आज अनेक जण कॉँग्रेसला समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. यात अनेक पुरोगामी विचारसारणीचे लोकही आहेत. निवडणूक लढविताना अनेक घटक राजकारणात विचारात घ्यावे लागतात हे मान्य आहे, परंतु आपल्या विचारसारणीला हरताळ फासणार्‍या लोकांना तिकिट दिल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, हे कॉँग्रेसने लक्षात घेणे गरजेच आहे. 
------------------------------------------------------------

0 Response to "धर्म, जात आणि राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel