-->
समाजवादी पक्षातील यादवी

समाजवादी पक्षातील यादवी

संपादकीय पान मंगळवार दि. 03 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
समाजवादी पक्षातील यादवी
उत्तरप्रदेशात आता निवडणूक तोंडावर आली असताना समाजवादी पक्षातील सुरु झालेली यादव घराण्यातील यादवी संपण्याची काही चिन्हे तर दिसतच नाहीत उलट दररोज त्यात भर पडत चालली आहे. पक्षात ज्यावेळी एकाच घराण्याचे वर्चस्व स्थापन होते व त्या घराण्यातील परस्परातील स्पर्धा विकोपाला पोहोचल्यवर परिस्थिती कोणत्या टोकाला जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून सध्याच्या समाजवादी पक्षाकडे पहावे लागेल. सुरुवातीला काका-पुतण्या असलेला हा वाद आता वडिल व मुलगा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. यादव घरातील प्रत्येकाला पक्षाचा ताबा हवा आहे व आगामी काळात येणार्‍या निवडणुका जिंकून आपल्याला सत्ता उपभोगायची हौस आहे. मात्र सध्याची ही यादवी पाहता समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेत येईल असे काही दिसत नाही. समाजवादी पक्षाला गृहकलहाने घेरले आहे. या गृहकलहात कोण-कोणाचा नाही अशी स्थीती आहे. प्रत्येकाला नेता व्हायचे आहे. पक्षातून एकमेकांना काढून टाकण्याची जणू काही अहंमहिका लागली आहे. रविवारी तर मुख्यमंत्री अखिलेश यादव समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन घडवून पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. यामुळे या यादवीत आणखीनच रंग भरले गेले. सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांना पक्षात मार्गदर्शक म्हणून स्थान देताना शिवपाल यादव यांची मात्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्याशिवाय मुलायम सिंग यांचे निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या अमरसिंग यांचीही पक्षातून गच्छंती करण्यात आली आहे. ही सर्व भांडणे होण्यामागे कळीचा नारद अमरसिंह हेच असल्याचे बोलले जाते. मात्र हे अधिवेशनच बेकायदा असल्याचा दावा नेताजी मुलायमसिंग यादव यांनी केला आहे. त्यामुळे पक्षात नेमके काय चालले आहे, हे समजण्यास मार्ग नाही. मात्र अखिलेश यादव यांच्यामागे पक्षातील बहुतांशी नेते व आमदार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण ज्यावेळी पक्षनेते मुलायमसिंग यादव यांनी आमदारांची बैठक बोलाविली होती त्यावेळी केवळ 29 आमदार उपस्थित होते. मात्र अखिलेश यादव यांच्या आमंत्रणावरुन तब्बल 200 आमदार उपस्थित झाले होते. त्यावरुन पत्रात अखिलेश यादव यांचा वरचश्मा असल्याचे सिध्द झाले. वडील मुलायमसिंग यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर अखिलेश समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुलायम सिंग यांचे बंधू शिवपाल यादव यांना हटवल्याने यादवांतील वादाला नवे तोंड फुटले आहे. रविवारी झालेल्या समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांच्या पाच हजार समर्थकांनी एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली खरी, मात्र मुलायम सिंह यांनी जुनी उमेदवार यादी कायम ठेवण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर अखिलेश यांनी स्वत:च्या उमेदवारांना समाजवादी पार्टीचे निवडणूक चिन्ह सायकल मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अखिलेश समर्थकांकडून निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात अर्ज करण्यात येणार आहे. एकूणच समाजवादी पक्षात उभी फूट पडली असून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर सहमती झाल्यास आगामी निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र याचे नकारात्मकही परिणाम होऊ शकतात. आगामी निवडणुकीपूर्वी हे चित्र स्पष्ट होई शकते. मात्र समाजवादी पक्षाला याचा फटका बसणार हे नक्की.

0 Response to "समाजवादी पक्षातील यादवी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel