-->
जनतेच्या प्रश्‍नांचे काय?

जनतेच्या प्रश्‍नांचे काय?

रविवार दि. 24 मार्च 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
जनतेच्या प्रश्‍नांचे काय?
------------------------------
लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. अजून एका आठवड्याने यात आणखी रंगत सुरु होईल. निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत आयाराम-गयारामचे वातावरण जोर धरेल. ही राजकीय धुळवड संपुष्टात आल्यावर खर्‍या अर्थाने निवडणूक प्रचार सुरु होईल. आपल्याकडे आयाराम वाढले म्हणजे आपला विजय नक्की, असे भाजपा वाटत आहे. कारण निवडणूक ही केवळ औपचरिकता आहे, असे चंद्रकांतदादा पाटील जाहीर बोलतात याचा अर्थ त्यांच्यात असलेला फुकाचा आत्मविश्‍वास स्पष्ट होतो. परंतु जनतेच्या प्रश्‍नांचे काय? गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक तर झालेली नाही, उलट जनतेचे प्रश्‍न अधिकच तीव्र झाले आहेत. फुलवामा घटनेनंतर नरेंद्र मोदींची प्रतिमा बदलण्यास काही प्रमाणात भाजपाला यश आले असले तरी निवडणूक ही भावनीक मुद्यावर लढविली जाणे हे लोकशाहीचे अपयश म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात नोटाबंदी, जीएसटी, राफेल लढाऊ विमानातील घोटाळा, प्रचंड वाढलेली बेरोजगारी, शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतकर्‍यांच्या वाढणार्‍या आत्महत्या, उद्योगपतीना दिलेली साडेतीन लाख कोटीची कर्जमाफी, विजय मल्ल्यापासून नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदींनी बॅकांना हजारो कोटींना चुना लावून विदेशात केलेले पलायन व त्याहून महत्वाचे म्हणजे पक्ष संघटनेपेक्षा तो एक ब्रॅन्ड म्हणून चालवला जात असलेल्या भाजपने मतदारांची घोर निराशा केली त्यामुळे भाजपची लोकप्रियता ढासळतच गेली. पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी नावाचा झांझावात देशात निर्माण झाला होता. त्या झंझावाताने लोकांच्या आशाआकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढवल्या. लोकांना मोदी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी काही तरी करतील अशी भोळी भाबडी आशा होती. कॉग्रेसच्या भ्रष्ट व ढिल्या कारभाराचा लोकांना वीट आला होता. त्यामुळे मतदारानी मोठ्या विश्‍वासाने व सकारात्मक बदलाच्या अपेक्षेनेे भाजपकडे सत्ता सुपूर्द केली. परंतु जनतेचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला. यातूनच लोकांचे जनमत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात संघटीत झाले. यातूनच भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान,व छत्तीसगड या राज्यात सत्ता गमवावी लागली. तेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. मोदी-शहांचे होम पिच असलेल्या गुजरातमध्ये सत्ता भाजपाने कशीबशी टिकविली. केंद्रात सत्ता आल्यावर लगेचच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपचा धुव्वा उडाला होता. बिहारमध्ये 2017 मध्ये भाजपला चौथ्या  क्रमांकाची मते मिळाली व बिहारमध्येही भाजपा सत्तेत आली नाही. पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन झाले व कॉँग्रेस सत्तेत आली. कर्नाटकमध्येही भाजपाला पराभव पत्करावा लागला. कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यातील विजयामुळे कॉग्रेसमुक्त भारत देश हे भाजपचे स्वप्न साकार होऊ शकत नाही हा संदेश दिला गेला. पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या हवाई दलाने एअर स्ट्राईक करुन शत्रूच्या घरात घुसून अतिरेकी मारले. त्यांच्या या कार्यास सलाम. परंतु यात मोदींचे शौर्य ते काय? मात्र यात मोदींना लोहपुरुष म्हणून दाखवित भाजपाने जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे कसे दुर्लक्ष होईल हे जनतेवर बिंबविले. अनेक वाहिन्या आपल्या खिशात टाकून असलेल्या भाजपाने पुन्हा एकदा सोशल मिडियावरही आक्रमक प्रचार सुरु केला. जनतेला त्यांना भेडसावित असलेल्या मुद्यांकडून लांब नेले व तिसर्‍याच प्रश्‍नावर लक्ष केंद्रीत करावयास लावले. परंतु विरोधी पक्षांनी जनतेला आता त्यांच्या प्रश्‍नांची जाणीव करुन देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.  मोदींची प्रतिमा व अमित शहा यांचे संघटन कौशल्य ही भाजपची पुनश्‍च या निवडणूकीत जमेची बाजू राहणार आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याच्या घटनेमुळे   भाजपला मारक ठरणारे अनेक विषय आता मागे पडल्यासारखे दिसत आहेत. पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद केवळ मोदींमध्ये आहे व मोदींच्या हातीच देश सुरक्षित आहे हेच भाजपच्या प्रचाराचे सूत्र बनले आहे. स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इडिया,शेतकर्‍यांना पीक विमा, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आदी योजनांचा गेले महिनाभर सरकारी जाहिरातीतून पाऊस पाडला जात आहे. तरीही दुसरीकडे पाकिस्तानवर केलेला हवाई  हल्ला हाच प्रचाराचा प्रमुख भाजपने बनवला आहे. भाजपाला यातून विजय सहज दिसत असला तरीही त्यांना वाटते तेवढे सोपे नाही. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा अनेक नकारात्मक बाजू त्यांच्या बाजूने आहेत. उत्तर प्रदेश मध्ये सपा, बसपा,आघाडीने व कॉग्रेसच्या आक्रमक प्रचाराने भाजपला गेल्या वेळेसारख्या 73 जागा मिळणे कठीण आहे. काँग्रेसच्या नव्याने नियुक्त झालेल्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मिळत असलेला जोरदार प्रतिसाद नजरेआड करुन चालणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या पश्‍चिम बंगालमध्ये, नवीन पटनाईक यांच्या ओरिसात, मध्यप्रदेशात नव्याने स्थापन जालेल्या कमलनाथ यांच्या सरकारमुळे, राजस्थानाच अशोक गेहलोट यांच्या सरकारमुळे, कॅप्टन अमिरिंदर सिंग यांच्या पंजाबमधील सरकारमुळे, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यामुळे, चंद्राबाबू नायडू यांच्या आध्रंप्रदेशात, चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणात भाजपला खूप कसरत करावी लागणार आहे. बिगर कॉग्रेस, बिगर भाजप अशी पण कॉग्रेसच्या पाठिंब्यावरील प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडीही निवडणूक रिंगणात आहे. त्यामध्ये ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश सिंग, वायएसआर असे मातब्बर प्रादेशिक खेळाडू त्यात आहेत. तिसरी आघाडी भाजपाला मदतकारक ठरेल की मारक ठरेल हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र अनेक ठिकाणी त्यांचा भाजपाला तोटाही होऊ शकतो. 2014 सालच्या निवडणुकीत भाजपाला 31 टक्के मते पडून 282 जागा मिळाल्या होत्या. तर त्या अगोदरच्या 09 साली भाजपाला केवळ 19 टक्के मते पडली होती. 2014 साली त्यावेळी सत्तेत असलेल्या कॉँग्रेसला कधी नव्हे एवढ्या कमी जागा म्हणजे 44 मिळाल्या होत्या. मोदी लाटेत कॉँग्रेसचे सर्वात मोठे नुकसान झाले होते. यावेळी भाजपाची लाट निश्‍चितच नाही. मात्र संपूर्ण देशात भाजपाच्या विरोधात एकास एक विरोधी उमेदवारही देता आलेला नाही. बहुतांशी भागात तिरंगी लढत होणार आहे. याचा पायदा कोणाला होईल हे काळ ठरविलच. मात्र यंदाच्या निवडणुकीत जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेतली जावी, केवळ भावनिक मुद्यावर ही निवडणूक लढली जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
--------------------------------------------------------------------------- 

0 Response to "जनतेच्या प्रश्‍नांचे काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel