-->
महाआघाडीची व्यूहरचना

महाआघाडीची व्यूहरचना

सोमवार दि. 25 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
महाआघाडीची व्यूहरचना
भाजपा व शिवसेना युतीचे केंद्रातील सरकार खेचण्यासाठी काँग्रेस, राष्ट्वादी, शेकाप व समविचारी असलेल्या 56 संघटना व लहान, मोठ्या पक्षांच्या महाआघाडीने आपली व्यूहरचना पूर्ण केली आहे. महाआघाडीने केलेल्या जागावाटपाच्या सूञानुसार, काँग्रेस 24, राष्ट्वादी 20, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 व बहुजन विकास आघाडी तसेच युवा स्वाभिमानी संघटना प्रत्येकी एक असे ठरले आहे. शेतकरी कामगार पक्षाने 1952 सालानंतर प्रथमच मतांचे विभाजन टाळण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये केंद्रातील व पुढील टप्प्यात राज्यातील सरकार देशाचे संविधान व लोकशाही टिकविण्यासाठी खाली खेचण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी विविध 56 पक्ष व संघटना तथाकथीत 56 इंचाची छाती भेदण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांची सध्याची व्यूहरचना पाहता त्यात ते निश्‍चितच यशस्वी होतील, व सरकार खाली खेचले जाईल, कारण ही जनतेची इच्छा आहे. समविचारी पक्षांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून सत्ताधार्‍यांच्या छातीत धडकी भरविणारा आहे. त्यासाठीच भाजपाने विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी फोडाफोडी सुरु केली आहे. परंतु त्याचा फारसा उपयोग त्यांना होणार नाही, याची त्यांनी दखल घ्यावी. आज भाजपा-शिवसेनेच्या डोळ्यावरती सत्तेचा माज आलेला आहे तो जनतेच्या नजरेत भरु लागला आहे. हा माज यावेळच्या मतपेटीच्या माध्यमातून उतरवावा लागेल. त्यामुळे हा खोटे बोलणारा चौकीदार नको ही जनतेची भावना आहे. या भावना लक्षात घेऊनच शरद पवारांनी या पुढाकार घेऊन राज्यातील महाआघाडी साकारली आहे. खरे तर राज्यातील सर्व निधर्मी व समविचारी पक्ष एकञ येतील अशी अपेक्षा होती. परंतु ते स्वप्न भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी धुळीस मिळवले. खरे तर आंबेडकर आपल्या  पक्षाच्या ताकदीपेक्षा अवास्तव जागांच्या मागणीवर अडून बसले होते त्याचवेळी त्यांच्या मनात महाआघाडीत जायचे नव्हते  हे स्पष्ट होते. शेवटी तेच खरे ठरले. आंबेडकरांनी ओवेसींना सोबत घेत आपल्या वंचित आघाडीची वेगळी चूल बांधली. परंतु त्यांच्या या वागण्यामुळे त्यांनी जातियवादी शक्तींची ताकद वाढविण्यास हातभार लावला आहे हे निकालानंतर स्ष्ट दिसेलच. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे गप्पा पुरोगामित्वाच्या मारत असले तरी त्यांची कृती ही जातीयवादी शक्तींना पोसण्याचीच असते. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांतून हे स्पष्ट दिसले आहे. राज्यातील जनता मोदी सरकारच्या मनमानी कारभारला कंटाळली आहे. मोदींच्या सरकारने कामे कमी व जाहिरातबाजीच जास्त असे केले आहे. परंतु जनता एकदा फसू शकते दरवेळी खोटे बोलून जनतेला फसविता येत नाही. हे सरकार जेवढे जातीयवादी आहे तेवढेच अकार्यक्षम देखील आहे. काळा पैसा बाहेर काढण्यात हे सरकार सफशेल अपयशी ठरले. गेल्यावेळी मोदींनी आपल्या प्रचार सभेत काळ्या पैशावरुन रान उठविले होते. सत्तेत आल्यावर काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी केली. परंतु यातून एकही रुपया पांढरा झाला नाही. उलट या निर्णयामुळे शेकडो लोकांचे जीव गेले, रोजगार गेला. अर्थव्यवस्था मागे ढकलली गेली. यासंबंधी मोदी  व त्यांचे भक्त मूग गिळून आहेत. रोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. नोटाबंदीमुळे जसे लाखो लोकांचे रोजगार बुडाले तसेच नवीन प्रकल्प न आल्याने नवीन रोजगार निर्मिती झाली नाही. दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे सरकारचे आश्‍वासन केव्हांच हवेत विरले आहे. तसेच हे सरकार वेळोवेळी इतिहासाची मोडतोड करीत राष्टीय स्वयंसेवक संघाला अपेक्षीत असलेला इतिहास लोकांच्या मनावर बिंबवत आहे. यातून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक न करता त्यांचे लक्ष तिसर्‍याच म्हणजे गोहत्येकडे वळवून समाजात धर्मांधता पसरविण्यांचे काम सरकारच करीत आहे. यातील आरोपींना पाठीशी घालण्याचे कृत्या सरकारच करीत आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली असताना सरकार माञ वाढीचे खोटे आकडे पसरवीत आहे. या खोट्या आकड्यांसंबंधी सरकारला यापूर्वी अनेकांनी उघडे पाडले आहे. अशा प्रकारे सरकारनेच खोटे बोलणे व त्यासाठी सर्व शासकीय यंञणा राबविणारे हे स्वातंञ्यानंतरचे पहिलेच सरकार ठरले आहे. शेतकर्याना या सरकारने मोठी आश्‍वासने दिली होती. प्रामुख्याने शेतीमालाचे दर वाढविणे, आत्महत्या संपविणे. परंतु शेतकर्यांचे प्रश्‍न सोडविण्यात हे सरकार पुर्णपणे फेल गेले आहे. उलट या सरकारच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत. या सरकारने जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत, उलट जनतेला संकटाच्या खाईत लोटले आहे. गेल्या वेळी निवडून येण्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्‍वासने दिली होती. यावेळी जनता त्या आश्‍वासनांचा हिशेब मागते आहे. परदेशातून काळा पैसा आणण्याच्या घोषणा करणारे मोदींच्या राज्यात करोडो रुपये घेऊन विजय मल्ल्या, निरव मोदी पसार झाले. हा कसला चौकीदार? या चौकीदाराच्याच राज्यात राफेलचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो. जनतेशी खोटे बोलणारा व लोकांच्या भावनेशी खेळून मते मागणारा हा चौकीदार पुन्हा नको हा भारताच्या कानाकोपर्यातला आवाज आहे. या चौकीदाराला त्याच्या जागेवरुन हुसकावून लावण्यासाठीच महाआघाडीत 56 पक्ष व संघटना येऊन व्यूहरचना आखली आहे.
---------------------------------------

0 Response to "महाआघाडीची व्यूहरचना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel