-->
अडवानी पर्व संपविले!

अडवानी पर्व संपविले!

मंगळवार दि. 26 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अडवानी पर्व संपविले!
एकेकाळी भाजपाचे लोहपुरुष म्हणून ओळखले गेलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची राजकीय कारकिर्द संपल्यात जमा आहे. भाजपाच्या तिकिटांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने व पुढील यादीतही त्यांचे नाव येण्याची शक्यता नसल्याने अडवानी पर्वाची त्यांच्या वयाच्या 91 व्यावर्षी अखेर झाली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या ज्या शिष्याला राजकीय जीवदान दिले त्यानेच त्यांची कारकिर्द संपवावी हे फारच त्यांना क्लेषदायक ठरणारे असेल. वयाच्या 75 नंतर सल्लागाराच्या भूमिकेत राजकीय व्यक्ती असावेत अशी भूमिका यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी जाहीर केली होती. खरे तर त्याच वेळी ही सूचना अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासाठीच आहे हे त्यांनी समजायला पाहिजे होते. तसे पाहता अडवानी यांची प्रकृती आजही ठणठणीत असून या वयातही ते कोणतीही जबाबदारी सक्रियरित्या पार पाडू शकतात एवढे उत्तम आहेत. त्यादृष्टीने पाहता त्यांच्या इच्छेच्या विरोधात ही निवृत्ती लादण्यात आली आहे. अर्थात निवृत्ती ही प्रत्येकाला अटळ असते, प्रामुख्याने राजकीय पुढार्‍यांना आपली निवृत्ती लांबावी असे नेहमीच वाटत असते. परंतु निवृत्ती घेणे हा निसर्गाचा नियमच आहे, तो कुणी टाळू शकत नाही. ज्यावेळी पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी विराजमान झाले त्यावेळी लालकृष्ण अडवानी यांची प्रतिमा ही अत्यंत जहाल नेते अशी होती. खरे तर ही प्रतिमा त्यांनी बाबरी मशिद तोडताना तसेच त्या दशकात स्वत:ला जोडून घेतली होती. त्यांच्या याच प्रतिमेमुळे पंतप्रधानपद हुकले होते. मात्र त्याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. मात्र मनात त्यांच्या ही सल कायम होती. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीत पाकिस्तानातून भळभळत्या जखमा घेऊन अडवाणी भारतात आले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. त्यांचा अभ्यास, वाचन चांगले होते. त्यामुळे सुरुवातीला संघाचे प्रचारक व नंतर जनसंघाचे काम करु लागले. जनसंघ ते भाजपाच्या स्थापनेपासून ते सत्ता मिळवेपर्यंत असे विविध टप्पे त्यांनी पाहिले आहेत. रामजन्मभूमीचा वाद, त्यानंतर निघालेली रथयात्रा, बाबरी मशीद उध्वस्त करणे, त्यानंतर केंद्रात वाजयेपींच्या नेतृत्वाखाली आलेली सत्ता असे अशा अनेक महत्वाच्या टप्प्याचा ते भाग होते. आता सुध्दा मोदी पंतप्रधान झाल्यावर आपल्याला केंद्रात चांगले पद मिळेल असे त्यांना वाटत होते. ते त्यांना काही मिळाले नाही. त्यानंतर राष्ट्रपदीपदी आपली वर्णी लागेल अशीही भोळी आशा त्यांना वाटत होती. परंतु मोदींनी या सर्वच ज्येष्ठांना डालवण्याचे व त्यांना घरी बसविण्याचे ठरविले होते. तरीही अडवानी आशावादी होते. त्यांची ज्यावेळी मोदींची भेट होई, त्यावेळी त्यांची अगतिकता चेहर्‍यावर दिसत असे. गेल्या पाच वर्षात मोदींनी त्यांना सत्तेपासून व स्वत:पासून चार हात दूरच ठेवले होते. अडवाणींनी एक काळ गाजविला होता. 2009 साली अडवानीच्या हातात सर्व सुत्रे होती. त्यांंना प्रमुखपदी ठेवून निवडणुकांची आखणी केली गेली. त्या वेळी अपेक्षित यश न मिळाल्याने 2014 च्या निवडणुका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाला. तसे पाहता अडवानी मोदींचे एकेकाळचे तारणहार ठरले होते. गुजरात दंगलींनंतर वाजपेयींनी मुख्यमंत्री मोदींना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी मोदींचा बचाव अडवानींनीच केला. पुढे शिष्य गुरूपेक्षा सवाई झाला. बाळासाहेब ठाकरे, करुणानिधी या ज्येष्ठांनीही अखेरपर्यंत पक्षाची सूत्रे हाती ठेवली होती, अडवानींच्या नशिबी ते भाग्य नव्हते. हवाला डायरीत नाव आल्यावर त्यांनी 1996 ची निवडणूक लढवली नव्हती. एकेकाळी त्यांना भगव्या आक्रमकतेचे प्रतीक मानत जात होते. वाजपेयींचा मवाळ चेहरा व तेवढेच आक्रमक अडवाणी अशा या जोडीने पाच वर्षे सत्ता केली. अडवानींनी गांधीनगरचे तब्बल सहावेळा प्रतिनिधित्व केले. स्युडो सेक्युलॅरिझम हा शब्द त्यांचीच कॉईन केला. गेले काही दिवस आपल्याला पक्षात डावलले जात आहे, हे माहित असताना त्यांनी खरे स्वत:हून 2019 ची निवडणूक लढणार नाही, हा निर्णय जाहीर केला असता तर त्यांची शान राहिली असती. अडवानी यांनी 1991पासून सहा वेळा जिंकलेल्या गुजरातेतील गांधीनगर मतदारसंघातून पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचा मतदारसंघ दुसर्‍याच्या घशात गेला हे स्पष्ट झाले. मोदी यांनी त्यांना उमेदवारी नाकारणे, हा राजकीय इतिहासातील एक दुर्दैवी योग म्हणावा लागेल. सुषमा स्वराज, उमा भारती यांच्याप्रमाणे कलराज मिश्र यांनीही निवडणूक न लढवण्याचे पूर्वीच जाहीर केले होते. सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्यामागे प्रकृतीचे कारण असले, तरी मोदी हेच स्वत: परराष्ट्रमंत्री असल्याप्रमाणे वागत असल्यामुळे मंत्रिपद असूनही सुषमा याही अडगळीतच जाऊन पडल्या होत्या. मोदी- शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने यावेळच्या निवडणुकीत भाकरी फक्त ज्येष्ठांच्या बाबतीतच फिरविली. अन्य बहुतांशी उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अडवानी यांचे पर्व संपले नसून संपविले गेले आहे.
----------------------------------------------

0 Response to "अडवानी पर्व संपविले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel