-->
बदललेले पावसाचे चक्र

बदललेले पावसाचे चक्र

गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
बदललेले पावसाचे चक्र
यंदा पावसाने आपला मुक्काम तब्बल पाच महिने ठेऊन सर्वांनाच चकवा दिला आहे. यंदा खरे तर सगळेच अंदाज चुकवत केरळात आठ दिवस विलंबाने पाऊस दाखल झाला होता. मात्र त्यानंतर त्याला काही वेग येत नव्हता, त्याचे रेंगाळणेच वाढले होते. त्यातच अरबी समुद्रात वायू वादळ आले. हे वादळही समुद्रात दक्षिणेकडून वायव्येकडे प्रवास करत राहिले. त्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली. यंदा पावसाळा फारसा पडणार नाही. अल् निओमुळे पावसाचा प्रभाव कमी होणार असे अंदाज वर्तविले गेले. यातच जून महिना पावसाशिवाय किंवा अल्प पावसात गेला. परंतु या पावसाने मात्र जुलै महिन्यात वेग धरला. मजल दरमजल करत मान्सूनने जुलैअखेर संपूर्ण देश व्यापला आणि मग मात्र हळूहळू वेग धरला. असे असले तरीही महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा येथे दुष्काळाचीच स्थिती होती. त्यामुळे राज्यात काही भागात ओल दुष्काळ तर काही भागात दुष्काळ अशी स्थिती होती. मात्र लवकरच संपूर्ण राज्य पावसाने व्यापल्यावर विदर्भ व मराठवाड्यालाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. देशव्यापी विचार करता यंदा महाराष्ट्र, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात महापुरांनी थैमान घातले. कुठे अतिवृष्टी, तर कुठे टिपूसही नाही असा नेहमीचा पॅटर्नही काही काळ दिसला. महाराष्ट्राला तर यंदा पावसाच्या रुद्र अवताराने बरेच काही शिकवले. सांगली, कोल्हापुरातील महापूर, मुंबईची दैना, मराठवाड्यातील ओढ, विदर्भाला मिळालेला दिलासा, कोकणातील अतिवृष्टी बरेच काही शिकवून गेली. नेहमीप्रमाणेच या वर्षीही पावसाळ्याचा नेमका अंदाज फारसा कोणाला येऊ शकला नाही. हवामान खात्याने यंदा 96 टक्के, तर स्कायमेटने 93 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहील, या आणि अशा अंदाजांना चुकवत जून ते सप्टेंबर या काळात देशात 110 टक्के पाऊस झाला. आपल्याकडील हवामान खात्याची नेहमीप्रमाणे यंदाही थट्टाच झाली. त्यामुळे आता हवामान खात्यात आमुलाग्र बदल करावे लागणार आहेत. त्यांना जसे आत्याधुनिक करावे लागेल तसेच जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान त्यांना आत्मसात करावे लागणार आहे. त्यासाठी सरकारने तातडीने हालचाली करणे आवश्यक झाले आहे. कोल्हापूर- सांगली तीन दिवस पाण्यात होते, मुंबईत चार ते पाच वेळा पाणी तुंबले, उत्तर महाराष्ट्रात पावसाने केळी व इतर पिकांचे नुकसान केले, नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा पावसाने सडला, मराठवाड्यात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली, विदर्भात कापसाचे नुकसान केले. त्यातच मान्सूनचा मुक्कामही वाढत गेला. राज्यातील ही झपाट्याने गेल्या दोन दशकात वाढलेल्या या शहरातील नागरीकांची दैना उडाली. शहराचे नियोजन करताना ज्या अनेक चुका झाल्या त्याचे परिणाम नागरिकांना भओगावे लागले आहेत. मुंबईत 2005 साली आलेल्या पुरातून धडा राज्यकर्त्यांनी काही घेतला नाही. त्यामुळे मुंबई पुन्हा पुराखाली आली. त्यावर आता तरी उपाययोजना केल्या जाणार आहेत किंवा नाही हा सवाल आहे. दरवर्षी एक सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करणार्‍या पावसाने यंदा जवळपास 40 दिवस उशिराने काढता पाय घेतला. देशातून मान्सून 16 ऑक्टोबरला माघार घेतल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले खरे, मात्र त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावत पुन्हा एकदा चकवा दिला. या पावसाने मराठवाड्याला दिलासा मिळाला असला, तरी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान त्यामुळे झाले आहे. गतवर्षी कोरड्या सप्टेंबरने, तर यंदा ओल्या ऑक्टोबरने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळवला आहे. पूररेषेतील अतिक्रमणे, नाल्यांवरील अवैध बांधकामे ही शहरांतील पुरासाठी कारणीभूत ठरणारी कारणे दूर करणे आपल्याच हाती आहे. हवामान बदल आणि मान्सूनचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नसली, तरी त्यापासून होणारी हानी टाळण्यासाठी वेळीच उपायही करायला हवे. योग्य नियोजन केले नाही तर आगामी काळात मान्सूनच्या या बदलत्या पॅटर्नमुळे शेती आणि शहरे वाचवणे, हे मोठे आव्हान असेल. गेल्या वर्षी 115 वर्षांतील सर्वांत कोरडा सप्टेंबर अनुभवणार्‍या महाराष्ट्रात यंदाचा ऑक्टोबर सर्वांत ओला ठरला आहे. मागच्या वर्षी कसाबसा तीन महिन्यांचा पावसाळा अनुभवल्यानंतर यंदा पाच महिन्यांचा पावसाळा आपल्या वाट्याला आला आहे. या मान्सूनच्या बदलत्या चक्रापासून धडा घेण्याची वेळ आता आली आहे. ज्यावेळी आपल्याकडे पाऊस पडतो त्यावेळी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन त्याची साठवण करुन ठेवण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास कितीही पाऊस पडला तरी दुष्काळ आपल्या पाचवीला पुजलेलाच आहे असे समजावे. आता यंदा देखील पाण्याच्या नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे एवढा पाऊस पडूनही दुष्काळ काही बागात पडलेला दिसेलच. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडूनही ते सर्व पाणी समुद्राला वाहून गेल्याने त्या पाण्याचा काहीच उपयोग होणार नाही. भविष्यात जसे हवामान खाते अत्याधुनिक करावे लागणार आहे तसेच पडणार्‍या प्रत्येक पावसाचा थेंबन थेंब कसा साठवून ठेवता येईल त्याचे नियोजन झाले पाहिजे.
-------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "बदललेले पावसाचे चक्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel