-->
संपादकीय पान गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मोदी व भाजपाला झटका
-----------------------------
लोकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या ३३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षाला आणि ज्याच्या जीवावर केंद्रातील सत्ता आली च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का देणारे तर आहेतच; पण त्याहीपेक्षा भारतीय जनतेला नेमके काय हवे आहे याचे स्पष्ट चित्र मांडणारे आहेत. मोदींना वाढदिवसाच्या दिवशी जनतेने दिलेला एक मोठा झटका आहे. यापुढे लोकांना गृहीत धरुन कोणत्याही पक्षाला आपली कृती करता येणार नाही, प्रामुख्याने सत्तेत असणार्‍या पक्षाने तर बरीच खबरदारी घ्यावयाची असते. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिलेले नव्हते तर नरेंद्र मोदी नावाच्या गुजरातमधील विकासपुरुषाला निवडून दिले होते हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मोदी खरोखर विकासपुरुष आहेत की नाहीत, हा वादाचा मुद्दा असेलही, परंतु मोदींनी आपली प्रतिमा तशी निदान तयार तरी केली होती. त्याच जोडीला कॉँग्रेसच्या भ्रष्ट व महागाई ला आळा घालण्यात अयशस्वी ठरलेल्या सरकारला जनतेला धडा शिकवायचा होता. मोदींनी लोकांच्या या मनातील बाब हेरुन त्याच दिशेने नेमका प्रचार केला होता. यातून लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकून निवडून दिले होते. गेल्या तीन दशकातील स्थिर सरकार आपल्या देशाला लाभले. मात्र केवळ शंभर दिवसाच्या अंतराने झालेल्या
विधानसभांच्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपच्या नेत्यांना मात्र लोकांची मानसिकता कळलेलीच नाही. गुजरात दंगलीमुळे तयार झालेली मोदी यांची आणि पर्यायाने भाजपची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमाच लोकसभेत यश देऊन गेली, याच भ्रमात अजूनही हे नेते वावरत आहेत. तोच धर्मवाद आणखी तीक्ष्ण केला तर यशही अधिक धारदार होईल, या विचारातून धर्मवादाच्या निखार्‍यांना फुंकर घालण्याचे काम ठरवून केले गेले. त्यासाठी योगी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांच्यासारख्यांच्या वाचाळ वृत्तीचा खुबीने वापर केला गेला. लव्ह जिहादचे भूत त्यांच्या माध्यमातून उभे केले गेले. त्यामुळे पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण होईल आणि गठ्याने मते भाजपच्या पारड्यात पडतील, अशी खात्रीच भाजपच्या नेत्यांना होती. मात्र मतदारांची मानसिकता वेगळी होती. त्यांनी लोकसभेसाठी विकासाचा दृष्टिकोन असलेल्या मोदींना मतदान केले होते. शंभर दिवसांच्या मोदींच्या काळात महागाईला आळा घालण्यात भाजपा पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. भाजपच्या नेत्यांना उत्तर प्रदेशात झालेल्या दंगलीमुळे तिथे ८० पैकी ७२ उमेदवार भाजपचे निवडून आले, असा भ्रम झाला होता. विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पुन्हा दंगल करता येत नव्हती म्हणून लव्ह जिहादचे भूत ठरवून उभे केले गेले. लोकसभेत त्या संदर्भात मुद्दा उपस्थित होऊनही मोदी त्यावर काही बोलले नाहीत, हादेखील वादाचा मुद्दा बनला होता. भाजपला मदत व्हावी म्हणूनच मोदी बोलले नाहीत, असा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र, असले मुद्दे उपस्थित करून यश मिळत नाही हे भाजपच्याच काही नेत्यांना दाखवून देण्यासाठीच मोदी संसदेत गप्प राहिले असावेत, असे म्हणायला हवे. त्यासाठीच ते या निवडणुकीत कुठेही प्रचारालादेखील आले नाहीत. जे काही यश मिळते ते भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणामुळे नाही तर मोदींमुळेच ते मिळू शकते, हे दाखवून देण्याचीच ही मोदी नीती आहे. भाजपमधल्या मोदी महिमा नाकारणार्‍या नेत्यांनाही त्यातून धडा देण्याची ही  राजकीय खेळी ते खेळले आहेत. त्यामुळे पक्षातल्या उरल्यासुरल्या मोदी विरोधकांनाही त्यातून जी काही शिकवण मिळायची ती मिळाली आहे.  ज्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून खुद्द मोदी विजयी झाले आहेत, त्याच लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभेच्या एका मतदारसंघात आता भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे ना मोदींचा करिश्मा चालतो आहे ना भाजपचा, हे दाखवून देणे शिवसेनेला आता सोपे होणार आहे. त्या बळावरच शिवसेनेचा युतीतला आवाज पुन्हा वाढला तर आश्चर्य वाटायला नको. तसे घडावे, असेच युतीच्या विरोधकांना, अर्थात दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे. युतीतली भांडणेच आपल्याला तारणार आहेत याची त्यांना खात्री आहे. त्यासाठी दोघांमधल्या आगीत तेल ओतण्याचे काम खुद्द शरद पवार यांनीच चालवले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालांनी तर त्यांच्या हाती तेलाचा मोठे पिंपच दिले आहे. ते त्यांचे काम करत राहतील आणि युतीचे नेते आपापल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठीची धडपड करत राहतील. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांचे नेते आपली पाठ स्वत:च थोपटून घेण्यात काही दिवस मश्गूल राहतील. या गदारोळात मतदारांनी दिलेला विकासवादाचा संदेश मात्र दुर्लक्षित राहण्याचीच शक्यता अधिक आहे. हे लागलेले निकाल भाजपासाठी एक मोठा धडा ठरणार आहे. लोकांनी भावनेच्या भरात गेल्या लोकसभेला मतदान केले आणि मोदींनी निवडून दिले. आता मात्र भावनेच्या भरात लोक पुन्हा मतदान करणार नाहीत तर भाजपाचे किंवा अन्य पक्षांचे काम पाहूनच मतदान करतील. यातून आपल्या देशातील राजकारमाची दिशा आता बदलणार आहे. भाजपा निवडणूक जिंकल्यावर जमिनीवर चालण्याऐवजी जमीनीपेक्षा चार हात वर चालत होते. आता त्यांना जनतेने या मतदानाव्दारे जागा दाखवून दिली आहे. यातून ते धडा घेणार किंवा नाहीत त्यानुसार त्यांचे भवितव्य ठरेल. केंद्रातील सरकार  हे पाच वर्षे स्थिर सरकार देईल कारण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र आगामी काळात येणार्‍या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सध्याच्या निकालावरुन जनतेच्या मनात केंद्रातील सरकारबद्दल नाराजी आहे हे स्पष्ट झाले आहे. विरोधात असताना मोठ्या गप्पा करणार्‍या भाजपाला व मोदींना हा एक जनतेने दिलेला झटका आहे.
----------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel