-->
संपादकीय पान गुरुवार दि. १६ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पराभवातला गेम
माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे मुंबईतील वांद्रे मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांचा १९ हजाराहून जास्त मतांनी पराभव झाला आहे. बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. अखेरीस यात बाळा सावंत यांच्या पत्नी व शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला. त्यामुळे सलग तीन वेळा शिवसेनेला मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात विजय प्राप्त झाला आहे. खरे तर एकेकाळी हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र बाळा सावंत यांनी घराघरात वैेयक्तिक पातळीवर कामे करुन कॉँग्रेसकडून हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकीत  शिवसेनेकडे खेचून आणला होता. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा हा करिष्मा कायम आहे. त्यामुळेच कोणताही जनसंपर्क नसताना केवळ बाळा सावंत यांच्या पत्नी या शिक्यामुळे तृप्ती सावंत विजयी झाल्या. गेल्या वेळी म्हणजे केवळ पाच महिन्यांपूर्वी या मतदारसंघातून एम.आय.एम.ला २३ हजार मते पडली होती. त्यामुळे यावेळी या मतदारसंघावर एम.आय.एम.ची छाप पडलेली असेल व त्यांची मते ही निर्णायक ठरतील असा एक अंदाज होता. मात्र एम.आय.एम.ला यावेळी १५ हजारांवर समाधान मानावे लागल्याने त्यांचा या मतदारसंघातील प्रभाव आता कमी झाला आहे, हे नक्की. नारायणरावांना मिळालेली मते व एम.आय.एम.च्या मतांची बेरीज केली तरीही राणेंना शिवसेनेची मते पार करता आली नसती, त्यामुळे एम.आय.एम.च्या उमेदवारामुळे फारसा कुणालाच फायदा व तोटा झालेला नाही. तसेच या मतदारसंघात कॉँग्रेस पक्ष गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. आता त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते पटकाविली आहेत. त्यामुळे सत्ता गेलेल्या कॉँग्रेसला यामुळे आपली मरगळ झटकता येईल. अर्थात कॉँग्रेसने ही दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविली आहे त्यात सिंहाचा वाटा पक्षापेक्षा नारायण राणेंचाच जास्त आहे. कारण नारायण राणेंना राष्ट्रवादीसह काही धर्मनिरपेक्ष पक्षांनी पाठिंबा दिला असला तरीही राणेंची स्वत:ची एक यंत्रणा होती. तशी ती प्रत्येक निवडणुकीत राणेंकडे असते. मात्र ती यंत्रणा देखील तोकडी पडली आहे. राणेंच्या ऐवजी जर अन्य कुणी कॉँग्रेसचा उमेदवार येथून उभा असता तर त्याला एवढी मते पडली असती का, हा प्रश्‍न आहेच. खरे तर कॉँग्रेसचा येथून पराभव होणार हे स्पष्ट असतानाही नारायण राणेंनी येथून निवडणूक का लढविली असा प्रश्‍न उपस्थित होतो. अर्थात राणेंची लढावू प्रवृत्ती पाहता त्यांनी येथून निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य उचलले. त्यांनाही विधानसभेत जायचेच होते व कॉँग्रेस पक्षालाही इथे राणेंसारखा मजबूत उमेदवार शोधून सापडला नसता. त्यामुळे पक्षाचा आदेश व स्वत: निवडणूक लढविण्याची खूमखूमी यासाठी राणे या रणांगणात उतरले. राणेेंना पक्षाने येथून निवडणूक लढविण्याची संधी दिली असली तरीही राणे विजयी व्हावेत असे कॉँग्रेसमधील राज्यातील नेत्यांना काही वाटत नव्हते. कारण राणे जर निवडून आले तर तर ते विरोधी पक्ष नेतेपदावर क्लेम करणार होते. त्यातून अनेक नेते दुखावले जाणार होते. त्यामुळे राणेंना वांद्—यातच रोखावे, विधानसभेत पाठवू नये, असे वाटत होते. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली खरी परंतु राणेंनी ही निवडणूक लढवून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या पक्षात आपले वजन वाढविले आहे हे नक्की. या निवडणुकीच्या निमित्ताने एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मोदी लाटेमुळे जे हादरे बसले होते त्याची तीव्रता आता कमी झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच सर्वच मुस्लिम समाज एम.आय.एम.कडे चालला आहे हा समाजही चुकीचा ठरला. अजूनही कॉँग्रेसची ही व्होट बँक त्यांच्याकडे परतली आहे  असे ठामपणे म्हणता येणार नाही. मात्र घरवापसी, हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार गेल्या नऊ महिन्यात केंद्रातील भाजपाच्या सरकारच्या आशिर्वादाने एवढा प्रभावीपणे केला गेला आहे की, देशातील मुस्लिम समाज पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी मोदींना व नंतर राज्यात विकासाच्या मुद्यावर भाजपाला मते दिली. त्यांनी भाजपाचा हिदुत्ववादी चेहरा नको आहे. कॉँग्रेकडून निराशा झाल्याने ते विकासाच्या प्रश्‍नाबाबत भाजपाकडे व मोदींकडे वळले होते. परंतु त्यांची आता घोर निराशा होत आहे. याचे पडसाद या निवडणुकीत उमटलेले दिसतात. नारायण राणेंना देखील त्यांच्याकडे असलेल्या फाजिल आत्मविश्‍वासाचा गेल्या निवडणुकीत फटका सहन करावा लागला. आता देखील राणे प्रचाराच्या काळात आपणच विजयी होऊ असे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरले होते. मात्र हा देखील फाजिल आत्मविश्‍वासच होता. परंतु राणेंनी ही निवडणूक लढविली हे बरेच झाले. कारण त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली. राजकारणात जय-पराजय हा महत्वाचा नसतो. तुम्ही रणांगणात असणे महत्वाचे असते. राणेंनी या रणांगणात उतरल्याने मालवणचा पराभव झाल्यावर आपण हार मानलेली नाही, आपण यापुढेही लढणारच हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर त्यांना आता तळ कोकणात गमावलेली ताकद पुन्हा कमवावी लागणार आहे. भाजपा-शिवसेनेचा सध्या ज्या प्रकारे कारभार सुरु आहे ते पाहता लोकांचा त्यांच्याविषयी भ्रमनिरास होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजपाच्या सरकारच्या अपयशातून राणेंची कोकणातील ताकद वाढणार आहे. वांद्रेची निवडणूक राणे हरले असले असले तरी त्यांना यातून राजकीय बळ मिळणार आहे, भविष्याची पायाभरणी यातून होईल. राणेंचा राजकीय गेम यातून होणार नाही, तर राणेंचा राजकीय गेम खरा आता सुरु होणार आहे, हे त्यांच्या विरोधकांनी लक्षात घ्यावे.
------------------------------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel