-->
थापा मानखाते

थापा मानखाते

रविवार दि. १९ जून २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
थापा मानखाते
-------------------------------------------
एन्ट्रो- आपल्याकडे हवामान खात्याची स्थापना १८७५ साली ब्रिटीशांनी केली. त्यानंतर आपल्याकडे हवामान खात्याने कात कधी टाकलीच नाही. पारंपारिक ठोकताळ्याचा वापर करुन आजही अंदाज व्यक्त केला जातो. त्याउलट अनेक देशांनी यातील नवीन तंत्रज्ञान विकसीत केले. त्यात संशोधन केले आणि पावसाचा वा तेथील हवामान बदलण्याचा अंदाज कसा खरा ठरेल हे पाहिले. आपल्याकडे नेमका याचच अभाव आहे. आपण मंगळावर स्वारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र हवामानखाते हे आपल्याकडे मागासलेलेच राहिले. येथे आधुनिकीकरण म्हणजे संगणकीककरण नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान आणण्याची आवश्यकता आहे. जिल्हा पातळीवर नव्हे तर तालुका पातळीवर हवामानाचे अंदाज व्यक्त केले गेले पाहिजेत. सध्याच्या काळात तसे करणे शक्य आहे. निदान विदेशात जर केले जाते तर आपल्याला करायला काय हरकत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील शतकात देशाला नेण्याच्या गप्पा करीत असतात, मग त्यांनी हवामानखाते अत्याधुनिक करण्यासाठी पावले उचलावायास नकोत का?
---------------------------------------------
देशातील हवामान खात्याचे नाव बदलून आता थापा मानखाते असे ठेवण्याची आता वेळ आली आहे. कारण हवामान खात्याने व स्कायमेट या खासगी संस्थेनेही दिलेले पावसाचे अंदाज पूर्णपणे चुकले आहेत. शेतकरी मात्र हवामान खात्याच्या भूलथापांना फसून यंदाही दुष्टचक्रात पार अडकला आहे. यंदा सात जूनला नक्की पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व स्कायमेटने व्यक्त केला होता. गेले दोन वर्षे प्रभाव असलेल्या अल् निओचा प्रभाव यंदा जूनमध्ये कमी होत चालला आहे त्यामुळे चांगला पाऊस अपेक्षित असल्याचा हा अंदाज आता खोटा ठरला आहे. हवामानखात्याने जूनमधील हे भविष्य वर्तवित असताना जुलै व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडणार आसल्याचे भविष्य वर्तविले आहे. गेले तीन-चार वर्षाचा पावसाचा सरासरी अभ्यास करता एक बाब प्रकर्षाने जाणवेल की, या काळात जूनमध्ये पाऊस पडतच नाही. किरकोळ पाऊस पडतो आणि खरा पाऊस हा जुलै व ऑगस्ट महिन्यातच पडतो. मात्र यंदा जूनमध्ये पाऊस पडणार व एकूणच सरासरीपेक्षा पाऊस जास्त असले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर कसा विश्‍वास ठेवायचा असा सवाल आहे. आपल्याकडे जूनमहिन्यात जो करळपासून पाऊस सुरु झाला आहे तो खरा मान्सून नाही तर मान्सूनपूर्व आहे. ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे हा पाऊस मान्सून सुरु होण्याच्या अगोदर पडतो. परंतु हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसालाच मान्सून असे संबोधून शेतकर्‍यांच्या मनात शंका निर्माण केली व त्याची एक प्रकारे फसवणूकच केली. विदेशात आपण पाहिल्यास हवामाना खात्याचा अंदाज नेमका बरोबर ठरतो. अनेकदा तेथे अमूक वाजता पाऊस पडणार असा व्यक्त केलेला अंदाज खराच ठरतो. असे का होते? तर त्यांच्याकडे पावसाचा अचूक वेध घेणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. आपल्याकडे नेमका त्याचा अभाव आहे. आपल्याकडे हवामान खात्याची स्थापना १८७५ साली ब्रिटीशांनी केली. त्यानंतर आपल्याकडे हवामान खात्याने कात कधी टाकलीच नाही. पारंपारिक ठोकताळ्याचा वापर करुन आजही अंदाज व्यक्त केला जातो. त्याउलट अनेक देशांनी यातील नवीन तंत्रज्ञान विकसीत केले. त्यात संशोधन केले आणि पावसाचा वा तेथील बर्फ पडण्याचा अंदाज कसा खरा ठरेल हे पाहिले. आपल्याकडे नेमका याचच अभाव आहे. आपण मंगळावर स्वारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे, त्यात काही प्रमाणात यशस्वीही झालो. मात्र हवामानखाते हे आपल्याकडे मागासलेलेच राहिले. येथे आधुनिकीकरण म्हणजे संगणकीककरण नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान आणण्याची आवश्यकता आहे. जिल्हा पातळीवर नव्हे तर तालुका पातळीवर हवामानाचे अंदाज व्यक्त केले गेले पाहिजेत. सध्याच्या काळात तसे करणे शक्य आहे. निदान विदेशात जर केले जाते तर आपल्याला करायला काय हरकत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील शतकात देशाला नेण्याच्या गप्पा करीत असतात, मग त्यांनी हवामानखाते अत्याधुनिक करण्यासाठी पावले उचलावायास नकोत का? दरवर्षी आपल्याकडे जूनमध्ये पाऊस चांगला पडणार असा विश्‍वास व्यक्त केला जातो. मात्र जूनमध्ये कधीच चांगला पाऊस पडत नाही. त्यामुळे यामागे काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने शेअर बाजारात यंदा चांगला पाऊस पडणार अशी अफवा मे महिन्याच्या अखेरीस पेरला जाते. त्यामुळे अनेकदा एक छोटीशी तेजी येते व त्यात अनेक जण हात धुवून घेतात. तसेच सत्ताधारी राजकारण्यांचे. दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला चांगल्या पावसाचे आश्‍वासन दिले की जनता त्या बातमीनेच सुखावते. त्यात मान्सूनपूर्व पावसाने थोडासा दिलासा मिळतोही. त्यातच शेतकरी हवामान खात्याचा अंदाज घेऊन आपल्या बियाणांची खरेदी करतो. ही खरेदी जूनमध्येच होते, जर या शेतकर्‍याला पाऊस जुलै मध्ये पडणार असे खरे सांगितले तर तो जुलैमध्ये बियाणांची खरेदी करेल व त्यात बियाणे कंपनीचे एका महिन्यात नुकसान होऊ शकते. बियाणे कंपन्यांना आपला माल लवकर विकून शेतकर्‍यांच्या गळ्यात मारायचा असतो. त्यामुळे या कंपन्या व सत्ताधारी यांची युती या कामी कारणी लागत असावी, अशी शंका घेण्यास जागा आहे. आपला देश हा शेतीप्रधान असल्याचे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. परंतु शेतीच्या विकासाठी व शेती जगविण्यासाठी ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे त्याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकरी जर जगला पाहिजे तर त्याला पीकासंबंधीच्या पायाभूत सुविधा पुरविणे हे सरकारचे काम आहे. ज्याप्रमाणे सरकार उद्योगांना वीज, पाणी, रस्ते पुरविते त्यानुसार, शेतीसाठी किमान आवश्यक बाबी पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात शेतकर्‍यांना हवामानाविषयी आगावू संदेश देणे हे सरकारचे कर्त्यव्य आहे. कारण शेतकर्‍यांची पेरणी व त्यानंतरचे बहुतांशी काम हे शेतीवरच अवलंबून असल्याने पावसाळ्याचा अचूक अंदाज मिळणे आवश्यक ठरते. अगदी अतिवृष्टी व अवकाळी पाऊस येतो त्यावेळी आगावू सूचना दिल्यास शेतीचे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. परंतु गेली कित्येक वर्षे सरकार ही जबाबदारी टाळीत आहे. यातून शेतकर्‍यांच्या जीवाशीच सरकार खेळत आहे. यंदा आता विदर्भातील कापूस शेतकर्‍यांनी पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पडणार या हवामानखात्याच्या भविष्यवाणीवर विश्‍वास ठेऊन पेरणी केली आहे. आता त्यांच्या होणार्‍या नुकसानीचे काय? त्यातच भविष्यात या भागातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढण्याचा धोका त्यातून निर्माण झाला आहे. हे दुष्टचक्र जर टाळायचे असेल हवामानखातेे हे जागतिक दर्ज्याचे केले पाहिजे.
----------------------------------------------------------  

0 Response to "थापा मानखाते"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel