
मूनलाइटिंगच्या निमित्ताने...
दि. 25 सप्टेंबरच्या मोहोरसाठी चिंतन
मूनलाइटिंगच्या निमित्ताने...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोने एकाच दिवशी आपल्या तबब्ल ३०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. यामागचे कारण होते, मूनलाइटिंग. आता मूनलाइटिंगचा डिक्शनरी अर्थ काढल्यास चंद्रप्रकाश असा होतो, परंतु आय.टी. उद्योगाच्या क्षेत्रात मूनलाइटिंग म्हणजे, एखाद्या कर्मचारी नोकरी असताना त्याने परवानगी न घेता दुसरी नोकरी करणे. म्हणजेच रात्रीच्या चंद्रप्रकाशात केलेले गैरव्यवहार असेही त्याला म्हणता येईल. कर्मचाऱ्याने हे काम विद्यमान नोकरीच्या आठ तासाच्या काळात केलेले असो किंवा कामाच्या आठ तास वेळे व्यतिरिक्त केलेले काम असो, अशा प्रकारच्या मूनलाइटिंगला आय.टी. उद्योगात सध्या जबरदस्त विरोध सुरु आहे. इन्फोसिस या आय.टी. उद्योगातील एका दिग्गज कंपनीने भारतात मूनलाइटिंगचे प्रकार वाढत चालले आहेत व त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे गेल्याच महिन्यात म्हटले होते. त्यानंतर विप्रोने देखील मूनलाइटिंगबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता मात्र त्यांनी हे प्रकरण वाढू लागल्याने आपल्या ३०० कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगच्या निमित्ताने घरी बसविले आहे. मात्र देशातील आय.टी. उद्योगातील आघाडीची कंपनी टी.सी.एस.ने अद्यापी या प्रकरणावर मौन बाळगले आहे. सध्या देशातील आय.टी. उद्योग एका नव्या वळणावर आला आहे. कोरोनानंतर आय.टी. उद्योगाची वाढ झपाट्याने होत आहे. आपल्याला आय.टी. उद्योगाची कास धरल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही हे सर्वच उद्योगांनी ओळखले आहे. त्यातून आय.टी. उद्योगांकडे सॉफ्टवअर विकसीत करण्याची कामे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे आय.टी. उद्योगातील कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याताच करोनाच्या काळात संगणकावर काम करण्याच्या पध्दतीमुळे अनेकांना आपल्या कंपनीला या जागतिक महामारीच्या संकटापासून वाचविता आले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही घरुन कामे करण्याची संधी उपलब्ध झाली. घरुन कामे करुनही कंपनीचे काही बिघडत नाही, मात्र त्यात आर्थिक बचतच होते हे अनेक कंपन्यांनी ओळखले. तसेच कर्मचाऱ्यांनाही घरुन काम करण्याच्या पर्यायाला पसंती लाभली. कारण मुंबई, पुणे, बंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांचा नोकरीला जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ वाचू लागला. अनेक कर्मचाऱ्यांना यातून दिवसातील दोन-तीन तास सहज वाचविता येऊ लागले. आता हा शिल्लक वेळ कसा खर्ची घालायचा हा कर्मचाऱ्यांपुढील एक प्रश्न होता. यातून हळूहळू कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या कंपन्यांची कामे घेण्यास सुरुवात केली. आपल्याकडे आठ तासाची नोकरी हे जरी खरे असले तरीही अनेक कंपन्या प्रामुख्याने आय.टी.तील कंपन्या कर्मचाऱ्यांना भरपूर पगार देऊनही वेळेचा विचार न करता त्यांची पिळवणूक करुन घेत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठ तासापेक्षा जास्त काम करणे हे काही नवीन नव्हते. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सध्या दुष्काळ असल्याने या कर्चाऱ्यांना सहज कामे मिळत गेली. जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी कर्मचारी हे करीत गेले. मग आपण नोकरी करीत असलेल्या कंपनीची मार्गदर्शक तत्वे पाळत नाही, याचेही त्यांना भानही राहिले नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी तर आपल्या कंपनीशी स्पर्धा करीत असलेल्या कंपन्यांचीच कामे घेण्यास सुरुवात केली. अर्थातच मोठ्या कंपन्या हे सहन करणे शक्य नव्हते. त्यातूनच अशा कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेर फेकण्याचा प्रकार झाला आहे. यात कंपन्यांचीही काही चूक नाही. त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची कर्मचाऱ्यांनी उघडउघड पायमल्ली केली आहे, हे दिसतेच आहे. आपल्याकडे कामगारांनी संघर्ष करुन आठ तास कामाचे तास करुन घेतले होते, हा इतिहास सर्वच जण विसरले आहेत. ९१ नंतर खासगीकरणाचे युग सुरु झाल्यापासून बँकिंग व्यवसायात कर्मचाऱ्यांना जास्त पगार देण्याचे आमिष दाखवून दहा-बारा तास राबविण्याचे धोरण सुरु झाले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. कामाचे आठ तास असावेत यासाठी रक्त सांडणारे कामगार कुठे तर आता केवळ पैसा मिळते म्हणून आठ तासापेक्षा जास्त काम करणारे सध्याचे आय.टी. तील कर्मचारी असा विरोधाभास सध्या पहायला मिळतो आहे. आपल्या देशात असे घडू शकते. विकसीत देशात प्रामुख्याने युरोपात आठ तासाच्या पलिकडे कोणीही काम करण्यास तयार नसतो. आता तर तिकडे चार दिवसांचा आठवडा करण्याचा विचार सुरु आहे. तिकडे आठ तासांच्या पलिकडे कर्मचारीही कामास तयार नसतात व मालकही कायद्याचा भंग होतो म्हणून कुणास काम देण्यास तयार होत नाहीत. परंतु आपल्याकडे असे नाही. त्यातूनच कर्मचाऱ्यांच्या जादा पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी मूनलाइटिंग जन्माला आले आहे. स्व. राजीव गांधींच्या काळात संगणकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याला सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. यामागचे कारण होते, संगणकीकरणामुळे देशात बेकारी येईल. परंतु संगणकीकरणामुळे बेकारी नव्हे तर रोजगार निर्मीती झाली आहे. आता तर या क्षेत्रात तंत्रज्ञान जाणणाऱ्या कर्मचाऱयांची टंचाई भासू लागली आहे. म्हणजे इकडे रोजगार आहेत परंतु कर्मचारी नाहीत अशी स्थिती आहे. गेल्या तीन-चार दशकात तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात, रोजगार निर्मीतीत किती झपाट्याने बदल झाला हे दिसते. केवळ पैसा मिळतो म्हणून कामाचे तास वाढविण्याच्या या प्रवृत्तीला आळा घातलाच गेला पाहिजे. यातून आपण समाज घडविणार नाही तर समाज बिघडविणार आहोत. यातून भविष्यात सामाजिक, आरोग्य व आर्थिक समस् निर्माण करणार आहोत. आयुष्यात केवळ पैसा कमविणे हेच ध्येय असलेल्या आपल्या समाजापुढे मूनलाइटिंगसारख्या अनेक समस्या आता भविष्यात उभ्या ठाकणार आहेत.
0 Response to "मूनलाइटिंगच्या निमित्ताने..."
टिप्पणी पोस्ट करा