-->
पुन्हा लॉकडाऊन नको…

पुन्हा लॉकडाऊन नको…

9 जानेवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन नवीन वर्षाच्या प्रारंभी जगातील प्रमुख शहरात कोरोनाच्या ओमायक्रॉनने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अर्थातच भारत त्याला काही अपवाद नाही. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक महानगरात कोरोनाने पुन्हा एकदा जबरदस्त उसळी अनपेक्षीतरित्या घेतली आहे. यंदाच्या नवीन वर्षात कोरोनाच्या सावटाखालून मुक्त होऊ अशी आशा व्यक्त होत असताना अचानकपणे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सक्रिय झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा फैलाव यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाच दहा पटीने होत आहे, मात्र त्यात एक समाधानाची बाब म्हणजे, याची बाधा अतिशय सौम्य होत आहे. त्यामुळे त्याचा प्रसार जेवढया झपाट्याने होत आहे तेवढ्याच वेगाने रुग्ण बरेही होत आहेत. असे असले तरी जेष्ठ नागरिक व विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे ठरले आहे. मुंबईसारख्या महानगरात घराघरात सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण आढळत आहेत. तसेच यातील प्रत्येकाची चाचणी केल्यास अंदाजे ६० टक्के लोकांना कोरोना आढळेल अशी परिस्थिती आहे. असे असले तरीही फारच कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते आहे. अन्य रुग्ण घरीच क्वॉरंटाईन होऊन बरे होत आहेत किंवा बरेच जणांना कोरोना होऊन गेल्याची लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईत कोरोनासाठी असलेल्या खाटांपैकी २० टक्के खाटांवर रुग्ण आहेत, अन्य खाटा रिकाम्या आहेत. हे वास्तव मान्य केले तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्याचे काम सुरु केले आहे. येत्या काही दिवसात रुग्ण वाढल्यास आणखी काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. अर्थातच त्याची गरज आहे. कारण अनावश्यक ठिकाणी, कामाशिवाय गर्दी करण्याचे सध्या दिवस नाहीत. मुंबईचा लोकल प्रवास हा गर्दीचा आहे, मात्र तेथील गर्दी टाळता येणार नाही. त्यामुळे तेथे खबरदारीचे उपाय योजले गेले पाहिजेत. सध्यातरी सरकारचा लॉकडाऊनचा विचार दिसत नाही, मात्र तसे करण्याचा सरकारने विचार करु नये. कारण लॉकडाऊनने फार काही साध्य होत नाही, उलट नुकसानच जास्त होते. सर्वच अर्थकारण ठप्प होते व ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना उपाशी मरण्याशिवाय काहीच पर्याय राहात नाही. आपल्याकडे अशी लोकसंख्याही फार मोठी आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन कोणालाच नको आहे. सरकारला व जनतेलाही नको आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन शिवाय काही पर्याय राहात नाही. असे असले तरी अमेरिका, युरोपातील देशांची लॉकडाऊन कधीच लादले नाही, मात्र निर्बंध जबरदस्त कडक केले होते. त्याधर्तीवर आता आपण विचार केला पाहिजे. त्यांच्याकडे लॉकडाऊन असे उल्लेख केला असला तरी गर्दी रोखण्यासाठी केलेले उपाय असाच होता. त्यामुळे या विकसीत देशांनी आपले अर्थकारण थांबणार नाही याची कोरोना काळातही दखल घेतली. त्याविरुध्द आपल्याकडे लॉकडाऊन म्हणजे सर्व व्यवहार शंभर टक्के बंद असा पर्याय स्वीकारला. याचा परिणाम आपल्याकडील अर्थव्यवस्था ठप्प होण्यात झाली. याचा फटका सर्वच थरातील जनतेला बसला. सरकारलाही त्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठा फटका बसला. त्यातून अर्थव्यवस्थेची गाडी आता कुठे रुळावर येत आहे, अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन लागल्यास कठीण पाळी जनतेवर व देशावर येईल यात काही शंका नाही. सध्याच्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हरियंटमध्ये आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते हा व्हेरियंट एखाद्या साध्या तापासारखा ठरण्याची शक्यता जास्त आहे. आजवर या रुग्णांची पाहाणी करुन जे अभ्यास प्रसिध्द झाले आहेत, त्यानुसार, हा व्हेरियंटव्दारे जे आजारी पडत आहेत, त्यांच्या जीवाला फरासा धोका नाही. पुढे चालून काही तज्ज्ञांच्या मते, हा आजार झपाट्याने सर्वांमध्ये पसरुन त्याव्दारे प्रतिकारशक्ती वाढेल व एकूणच या रोगाचा समारोप होईल. अगदी शंभर टक्के समारोप झाला नाही तरी त्याचा प्रभाव कमी होईल व अन्य संसर्गजन्य रोगांप्रमाणे त्याचे स्वरुप भविष्यात राहिल. अर्थात हे सर्व अंदाज आहेत, त्यामुळे खरे होतीलच अस ठामपणाने सांगता येत नाहीत. भविष्यात आपल्याला कोरोनाशी लढा देण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे, आपल्याकडे लवकरात लवकर शंभर टक्के लसीकरण कशा प्रकारे होईल त्याची आखणी केली पाहिजे. त्याचबरोबर मुलांचे सुरु झालेल्या लसीकरणानेही वेग पकडला पाहिजे. तसेच बुस्टर डोस देण्यासंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे. केवळ ६० वर्षावरील नव्हे तर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्या सर्वांनाच बुस्टर डोस दिला गेला पाहिजे. येत्या वर्षात सर्वांना बुस्टर डोस देण्याचे उष्दिष्ट बाळगले पाहिजे. ही उपाययोजना करीत असताना सध्या ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच तपासणी करण्याकडे सरकारने लक्ष्य पुरविले पाहिजे. कारण ज्यांना लक्षणे नाहीत अशांची चाचणी करण्यापेक्षा ज्यांना लक्षणे आहेत त्यांना तपासून सरकारने जास्त फोकस राहिले पाहिजे. लॉकडाऊन न लादता जे उपाय योजले पाहिजेत त्याची आखणी राज्य सरकारने आता केली पाहिजे. जनतेनेही आता आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. मास्क वापरणे, अनावश्यक गर्दीची ठिकाणे टाळणे हे जनतेच्या हाती आहे. त्याची कडक अंमलबजावणी करणे हे जनतेच्याच हाती आहे. कोरोना अजून किती वर्षे चालेल हे आता काही सांगता येत नाही, त्यामुळे जे आपल्या हाती आहे, त्यानुसार कोरोना पसरु नये यासाठीची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. २०२२ साली कोरोना संपेल असा अनेकांचा अंदाज होता, परंतु कोरोना अजून काही वर्षे सुरु राहिल असा अंदाज आहे. एवढ्या प्रदीर्घ काळ आपण अर्थकारण ठप्प ठेऊ शकत नाही. त्यामुळे काम करता करता, कोरोनाशी लढा दिला पाहिजे.

Related Posts

0 Response to "पुन्हा लॉकडाऊन नको…"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel