
बुडत्या कॉँग्रेसला पी.के.चा आधार...
24 एप्रिल 2022च्या मोहोरसाठी चिंतन
बुडत्या कॉँग्रेसला पी.के.चा आधार...
गेल्या आठ वर्षात म्हणजे २०१४ सालच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉँग्रेस पक्षाला जी उतरण लागली आहे ती काही थांबायला तयार नाही. काही फुटकळ विजय पाहिल्यास बहुतांशी निवडणुकीत पराभवच पहावा लागला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेशात सरकार निवडून आले होते परंतु ते काही टिकविता आले नाही. किंबहुना भाजपा ही सरकारे पाडण्यात यशस्वी ठरले. अलिकडेच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीतील पराभव तर अतिशय निरासाजनकच होता. परंतु पराभवातून पुन्हा जोमाने उभे राहाण्याची ताकद खरोखरीच आता कॉँग्रेसमध्ये राहिलेली नाही का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांतील दोषांवर बोट ठेवीत आपल्या बाजूने जनमत तयार करणे गरजेचे असते. परंतु तसे कॉँग्रेसकडून काही होताना दिसत नाही. उलट सत्ताधारी पक्ष अनेक पातळ्यांवर फेल जात असताना त्याविरोधात जनमत उभे करण्यात कॉँग्रेस सफशेल अयशस्वी ठरत आहे. भाजपाने कॉँग्रेसचा जवळजवळ सर्वच जनाधार गिळंकृत केला आहे. पूर्वी भाजपाला शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून हिणवले जात होते. आता तशी स्थिती राहिलेली नाही. कॉँग्रेसची पक्ष संघटना गेल्या काही वर्षात पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, त्यातून पक्ष नवी झेप कशी घेणार हा प्रश्नच आहे. गेल्या तीन वर्षात पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधींकडे आजही पक्षाचे नेतृत्व आहे, परंतु प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांच्यावर अनेक मर्यादा येत आहेत. माजी अध्यक्ष राहूल गांधी हे पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नाहीत, मात्र पाठच्या दरवाजाने पक्षातील घडामोडी ते घडवित असतात. असे आहे तर त्यांनी थेट पुढे येऊन पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकरण्याची तयारी दाखविण्याची गरज आहे किंवा गांधी घराण्याखेरीज जर कोणी तरुण नेतृत्व पुढे येत असेल तर त्यांना जागा मोकळी करुन दिली पाहिजे. परंतु तसे काहीच होत नाही परिणामी पक्ष एक मोठ्या संकटात सापडल्यासारखा आहे. कॉँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यापासूनची परंपरा आहे हे जरी खरे असले तरीही सत्ता आणि पक्षसंघटना हे एकत्रित प्रदीर्घ काळ नांदत असल्यानेच सत्ता गेल्यावर पक्ष दुबळा झाला आहे. पक्ष संघटना ही केवळ सत्तेच्या मांडवाखालीच शाबूत होती, हे आता सिद्द झाले आहे. आता जे काही लोक सत्ता नसतानाही पक्षात आहेत ते खरे सच्चे कॉँग्रेसचेच आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कॉँग्रेस पक्षाची ही मरगळ वरुन खालपर्यंत आहे. राहूल गांधी व प्रियांका गांधी यांनी निवडणुकांच्या तोंडावर कितीही मेहनत घेतली तरीही त्यांना काही ठोस हातात गवसत नाही. तसेच शेवटच्या टप्प्यात म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यासाठी मोदी-शहा प्रमाणे २४ तास राजकारण केले पाहिजे, हे अजूनही कॉँग्रेसच्या नेतृत्वाच्या लक्षात येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात नामवंत रणनितीकार म्हणून ओळखले गेलेले प्रशांत किशोर (पी.के.) हे आता बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे कॉँग्रेस पक्षाच्या मदतीला धाऊन आले आहेत. आजवर प्रशांत किशोर यांना रणनितीकार म्हणून बहुतांशी चांगले यश मिळाले आहे. प्रशांत किशोर हे व्यवसायिक रणनितीकार आहेत, त्यासाठी ते रग्गड पैसे मोजतात. महत्वाचे म्हणजे त्यांना वैयक्तीक कोणतीही राजकीय भूमिका नाही व वैचारिक बांधिलकीही नाही. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीस सल्लागार सेवा द्यावी तसे ते राजकीय पक्षांना रणनिती आखून देतात. त्यांना कोणत्याही पक्षाची बांधिलकी नसल्याने त्यांनी आजवर विविध पक्षांच्या अगदी भिन्न विचारसारणीच्या पक्षांनाही रणनिती आखून देण्याचे काम केले आहे. म्हणूनच ते भाजपापासून जवळजवळ सर्वच पक्षांचे सल्लागार राहिले आहेत. त्यात त्यांना यश मिळाले याचे महत्वाचे कारण म्हणजे, भाजपापासून अन्य पक्षांकडे चांगले संघटन होते. आता कॉँग्रेसचे संघटन पूर्णत खिळखिले झाले आहे. प्रशांत किशोर यांच्यामुळे गेल्या वेळी पंजाबमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला होता, परंतु तिथे काँग्रेसचेही त्यावेळी चांगले संघटन होते. रणनीतीकार संघटनेत चैतन्य आणू शकतो, संघटनेला दिशा दाखवू शकतो. मात्र संघटन नसेल, तर त्याची कितीही फौज कामाला लावली, तरी तिचा उपयोग होत नसतो. उत्तर प्रदेशात यापूर्वी अखिलेश यादव यांना प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला काहीच उपयोगात आला नव्हता. संयुक्त जनता दलाला प्रशांत किशोर यांचा काही प्रमाणात फायदा झाला, परंतु पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्यात व संघटनेत दरी निर्माण झाली. शेवटी नितीशकुमार यांच्यावर प्रशांत किशोर यांना पक्षातून काढून टाकण्याची वेळ आली. पश्चिम बंगालमध्येही प्रशांत किशोर यांच्यामुळे संघनटेत दरी निर्माण झाली. परिणामी काहींनी तृणमूल काँग्रेस सोडली. ज्या पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसला यश मिळवून देतात, त्याच प्रशांत किशोर यांना गोव्यात मात्र तृणमूल काँग्रेसच्या यशासाठी एवढे झटूनही काहीच मिळवून देता आले नाही. त्यामुळे व्यूहनीती जेवढी महत्वाची असते, तेवढेच महत्व संघटनेला आणि पक्षाच्या यंत्रणेलाही असते. राजकीय रणनीतीकारालाही मर्यादा असतात, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जबाबदारीचे पद घेणे आणि या पक्षाची रणनीती ठरवणे हे नितीशकुमार यांच्यापुढे किती कठीण आव्हान आहे, हे आपण समजू शकतो. गेल्या एक वर्षापासून प्रशांत किशोर यांची काँग्रेसशी जवळीक वाढली होती. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, याची चर्चा सुरू होती. परंतु कॉँग्रसेने नेहमीप्रमाणे निर्णय घेण्यात विलंब केला. काँग्रेसकडे आता पूर्वीसारखे व्यूहनीती आखणारे नेते फारसे राहिलेले नाहीत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य होते. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसला त्यांच्या तोडीचा चाणक्य काँग्रेसकडे राहिला नाही. काँग्रेसला आता व्यूहनीती आखणाऱ्या नेतृत्वाची गरज होती. ती प्रशांत किशोर यांच्या रुपाने पूर्ण होऊ शकते. आता सगळीकडून पराभवाच्या छायेत आल्यावर प्रशांत किशोर म्हणजेच पी.के. यांचा सल्ला मानायला कॉँग्रेस तयार झाली आहे. खरे तर विचार करता कॉँग्रेसकडे आता हाच शेवटचा उपाय शिल्लक राहिला आहे, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आता कॉँग्रेसकडे विविध प्रयोग करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. यातील हा प्रयोग यशस्वी होतो का ते पहावे लागेल.
0 Response to "बुडत्या कॉँग्रेसला पी.के.चा आधार..."
टिप्पणी पोस्ट करा