एक महाकाय विलिनीकरण
17 एप्रिल 2022च्या मोहोरसाठी चिंतन
एक महाकाय विलिनीकरण
गृहवित्तिय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एच.डी.एफ.सी. लि. चे विलिनीकरण त्यांच्यात समूहातील एच.डी.एफ.सी. बँकेत करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली. देशातील खाजगी उद्योगातील बँकिंग व्यवस्थेतील हे सर्वात मोठे विलिनीकरण ठरले आहे. हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील २००७ सालानंतरचा बँकिंग उद्योगातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. या विलिनीकरणानंतर एच.डी.एफ.सी. बँकेची ताकद निश्चितच वाढणार असून ४० अब्ज डॉलरचा व्यवहार करणारा हा सौदा असेल. खरे तर या विनिनीकरणाची चर्चा गेली पाच वर्षे सुरु होती. मात्र प्रत्यक्षात याची बातमी गेल्या आठवड्यात आली. सुरुवातीला शेअर बाजाराने या घटनेचे स्वागत केले खरे परंतु नंतर जागतिक पातळीवरील घडामोडी पाहता शेअर बाजाराची घसरण सुरु आहे. मात्र या विनिनीकरणाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. एच.डी.एफ.सी. बँक ही देशातील खासगी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची बँक आहे व गेल्या तीन दशकात त्यांनी आपला बँकिंग उद्योगावर ठसा उमटविला आहे. १९९१ साली ज्यावेळी उदारीकरणाचे युग सुरु झाले त्यावेळी ज्या पहिल्या खासगी बँकांना परवानग्या दिल्या त्यातील ही बँक होती. बँकेने आपले कामकाज ९४ साली सुरु केले व त्यावेळी यु.के.च्या नॅटवेस्ट बँकेने यातील २० टक्के भांडवल खरेदी केले होते. गेल्या तीन दशकात सार्वजनिक क्षेत्रातील मजबूत पाया असलेल्या बँकांना देखील एच.डी.एफ.सी. ने टक्कर देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या वाटचालीत त्यांनी काही छोट्या बँका ताब्यात जरुर घेतल्या परंतु त्यांची बहुतांशी वाढ ही स्वबळावर बँकेच्या शाखा वाढवत नेत व उत्कृष्ट सेवा देत होत गेली आहे. एच.डी.एफ.सी. बँकेची मूळ पालक कंपनी एच.डी.एफ.सी. लि. ही एच.टी. पारेख यांनी १९७७ साली गृहवित्त क्षेत्रात कर्जे देण्यासाठी स्थापन केली. एच.डी.एफ.सी. लि.ने आजवर एक कोटींच्या घरात लोकांना कर्जे देऊन आपला कारभार केला आहे. एच.डी.एफ.सी. ची स्थापन झाली त्यावेळी आपल्याकडे मध्यमवर्गीयांना गृह कर्जे देणारी अशी संस्था देशात अस्तित्वातच नव्हती. एच.डी.एफ.सी.चे संस्थापक एच.टी. पारेख यांनी काळाची ही गरज बरोबर ओळखून ही कंपनी स्थापन केली आणि त्याची फळे मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात मिळाली. यातूनच एच.डी.एफ.सी. म्हणजे गृहकर्ज असे एक समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झाले. एच.डी.एफ.सी.चे हे यश बघून नंतर अनेक सरकारी व खासगी बँका, वित्तसंस्था या क्षेत्रात उतरल्या. परंतु यातील आघाडीचे स्थान एच.डी.एफ.सी. ने कायमच ठेवले. दीपक पारेख यांनी एच.डी.एफ.सी. बँक स्थापन केली व त्यांचे काका एच.टी पारेख यांनी एच.डी.एफ.सी. लि. ही कंपनी स्थापन केली. अशा प्रकारे या दोन वित्तीय संस्थांनी देशाच्या वित्तीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. व्यवहारातील पारदर्शीपणा, चांगली सेवा या जोरावर पारेख काका-पुतण्यांनी हे वित्तीय साम्राज्य उभारले. हे दोघेही वित्तीय क्षेत्रातील जाणकार असूनही त्यांनी मात्र त्यांनी याचे व्यवस्थापन व्यावसायिक कसे राहिल याकडे नेहमीच लक्ष पुरविले. यातूनच आज एच.डी.एफ.सी. बँकेसारखी एक मोठी बँक उभी राहिली. एच.डी.एफ.सी. बँकेचे आजचे एकूण आकारमान १८ लाख कोटी रुपयांचे झाले आहे. आता हळूहळू देशातील वित्तिय क्षेत्र झपाट्याने वाढत जाणार आहे आणि त्यात सध्या जरी सार्वजनिक क्षेत्रातील वाटा जास्त असला तरी भविष्यात खासगी क्षेत्राचा वाटा वाढून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा कमी होणार आहे. ही काळजीची बाब असली तरीही ज्या खासगी बँका देशात कार्यरत आहेत त्यांचा कारभार हा व्यावसायिकदृष्ट्या तज्ज्ञांनी पाहाणे हे गरजेचे आहे. कारण मुळातच बँकिंग हा व्यवहार धोकादायक समजला जातो व त्यात कुशल व्यवस्थापनाची आवश्यकता असते. अन्यथा यस बँकेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे याचा अभाव असल्याने त्यांचे एन.पी.ए. सातत्याने वाढत असतात. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे सरकारी बँकांमध्ये होणारा सततचा सरकारी हस्तक्षेप. देशातील कर्जाच्या वाट्यात खासगी बँकांचा वाटा ३८ टक्के आहे, पाच वर्षापूर्वी हा २८ टक्के होता. हा वाटा आता वाढतच जाणार आहे. बँकिंग व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो आणि हा कणा मजबूत राहाण्यासाठी सरकारी बँकांकड़ील एकूण व्यवहारातील वाटा बहुतांशी असण्याची आवश्यकता आहे. परंतु कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यांना सरकारी बँकांचे प्रभूत्व असण्याची गरज वाटत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. उलट सरकारचा कल बँकांमधील भांडवल कमी करुन त्यांचे खासगीकरण करण्याकडे आहे. यातून काही काळाने स्टेट बँक व अन्य काही मोजक्या बँका बगळता सरकारी बँका शिल्लकच राहाणार नाहीत. भविष्यात खासगी बँकांच देशात वर्चस्व वाढणार असून भविष्यात खासगी बँकांत विलिनीकरणाची मोठी लाट येऊ शकते. एच.डी.एफ.सी. बँक स्थापन झाली त्यावेळी ज्या बँका नवीन पिढीच्या खासगी बँका म्हणून जन्माला आल्या त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच बँका आज शिल्लक आहेत. अन्य बँकांना दुसऱ्या बँकेत विलीन करण्याची किंवा मोठ्या बँकेच्या ताब्यात जाण्याची पाळी आली. भविष्यात सरकारी बँकांचे खसागीकरण करण्याच्या नादात मोठ्या उद्योगसमूहांनाही त्या विकत घेतल्या जाण्याची किंवा मोठ्या उद्योगसूहांना या उद्योगात प्रवेश करण्यास परवानगीही दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास देशातील बँकिंग व्यवस्था धोकादायक वळणावर येऊ शकते. सध्या तुर्तास एच.डी.एफ.सी. बँकेच्या महाकाय विलिनीकरणाचे स्वागत.


0 Response to "एक महाकाय विलिनीकरण"
टिप्पणी पोस्ट करा