राजकराणाचा भोंगा
10 एप्रिल 2022च्या मोहोरसाठी चिंतन
राजकराणाचा भोंगा
कोरोनाचे रौद्र रुप आता संपुष्टात येऊन तो आता अन्य साथीच्या रोगांप्रमाणे राहिल असे चिन्ह दिसत असताना आता सर्वात पहिली गरज आहे ती गेल्या दोन वर्षात झालेल्या देशाची व वैयक्तिकरित्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची. अर्थात देशाची अर्थव्यवस्था कोरोनापूर्वीच घसरणीला लागली होती, परंतु कोरोनामुळे तिच्या घसरणीला आणखीनच वेग आला व त्यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांना एक चांगले कारणच सापडले. वैयक्तिकदृष्ट्या विचार करता अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तर अनेकांना वेतनकपात स्वीकारावी लागली. आता कोरोना संपला तरी अनेकांचे वेतन कोरोनाच्या पूर्वीच्यापदावर काही आलेले नाही. ज्यांच्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना पुन्हा मिळालेल्या नाहीत. नोटाबंदीनंतर तर अनेक लहान व मध्यम उद्योगांना फटका बसला व त्यातून ते सावरत असताना कोरोनाने झडप घातली. यातून आपण मोठा रोजगार गमावला आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी देशाची स्थिती पूर्वपदावर कशी येईल हे पहाणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक वादग्रस्त मुद्दे सध्या बसनात गुंडाळून ठेवण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडीला नामोहरण करण्यासाठी केंद्रातील भाजपाचे सरकार फारच उत्सुक आहे. त्यासाठी ईडीचे हत्यार त्यांनी उपसले आहे. महाविकास आघाडीच्य़ा नेत्यांना प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. जणू काही देशातले सर्व भाजपा नेते हे धुतल्या तांदळाचेच आहेत. आज भाजपाकडील भ्रष्ट नेत्यांची यादी काही छोटी नाही, परंतु त्यांच्या नेत्यांच्या विरोधात ईडी लावल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला हैराण करण्यासाठीच ही पावले उचलली जात आहेत हे स्पष्ट आहे. एकीकडे हे सर्व चालले असताना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी आंदोलन करण्याची हाक दिली आहे. हे भोंगे न काढल्यास आता मनसे भोंग्यावरुन हनुमान चालिसाचे पाठण करणार आहे. यानिमित्ताने राज यांनी आपली भविष्याची वाटचाल आता भाजपाच्या मदतीने म्हणजे हिंदुत्वाच्या दिशेने चालणार आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी आपला राजकीय भोंगा वाजविला आहे. त्यांना देखील ईडीची नोटीस गेली होती. परंतु त्याविरोधात लढण्याएवजी राज यांनी भाजपाला लोटांगण घालण्याचे ठरविलेले दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोदी विरोधातली भाषणे गाजली होती. प्रामुख्याने लावा रे तो व्हिडियो ही त्यांची भाजपाची व मोदींची पोलखोल करणारी भाषणे फारच आक्रमक होती. परंतु त्यांनी जेवढ्या आक्रमकतेने भाजपाविरोधी भूमिका घेतली होती, त्याहून जास्त वेगाने ईडीची नोटीस हातात पडल्यावर भाजपाला पोषक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज यांनी कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मोदी किंवा भाजपा समर्थनाची भूमिका घेताना त्यांना त्यांच्या यापूर्वीच्या भाषणांच्या भूमिकांविषयी स्पष्टीकरण करावे लागेल. धार्मिक प्रश्नांवरुन सध्या कोणालाही भडकाविता येते, त्या प्रश्नांवर लोकांच्या मनाला हात घालणे सोपे असते. गेल्या काही वर्षात आपल्याकडे धार्मिक धृवीकरण वेगाने झाले आहे. त्यातच आता राज यांनी उडी मारुन सध्याच्या अस्वस्थ वातावरणात आणखी भर घालण्याचे ठरविलेले दिसते. मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न हा एक नेहमीच संवेदनाक्षम विषय ठरला आहे. अनेकांना हा प्रश्न म्हणजे मुस्लिमांचे तुष्टीकरण वाटते. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आजपर्यंत भाजपाची देशात व राज्यात सत्ता असतानाही आजच्या क्षणापर्यंत एकाही राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवले गेलेले नाहीत. हिंदुत्वाची कार्यशाळा म्हणून जिच्याकडे बघितले जाते त्या गुजरातमध्येही मशिदीवर भोंगे आहेतच. एवढेच कशाला उत्तरप्रदेशात योगी सरकारनेही मशिदीवरील भोंगे कायम राखले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येण्याच्या अगोदर भाजपा-शिवसेनेची सत्ता होती, त्यांच्याही पाच वर्षाच्या काळात मशिदीवरील भोंगे काही उतरविण्यात आले नाहीत. जर त्यांना हे खरोखरीच करावयाचे असते तर त्यांना ते करणे शक्य होते. परंतु त्यांनी तसे केले नाही व ते का केले नाही हे राज ठाकरे भाजपाला का विचारत नाहीत असा सवाल आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी एकदिलाने पाठिंबा दिला आहे. खरे तर त्यांनी देखील आपली सत्ता गेली पाच वर्षे होती त्यावेळी मशिदींवरील भोंग्याच्या बाबतीत डळमळीत भूमिका घेतली होती, याचे स्पष्टीकरण त्यांनी करण्याची गरज आहे. केंद्र सरकार देखील हिंदुत्वाचे पाईक असलेले सरकार आहे त्यांनी तरी या बाबतीत स्पष्ट भूमिका घेऊन मशिंदींवरील भोंगे का उतरविले नाहीत, हे स्पष्ट करावे किंवा आता तरी भोंगे उतरविण्याचा कायदाच करावा. आता त्यांच्याकडे दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत आहेच. त्यामुळे त्यांना असा कायदा करण्यासाठी कोणतीच अडचण नाही. एकूणच पाहता मशिंदीवरील भोंगे उतरविण्याचा हा प्रश्न कोणालाच सोडवाचा नाही. त्यांना फक्त याचा राजकीय भोंगा वाजवायचा आहे व आपली सत्तेची पोळी भाजून घ्यावयाची आहे. राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाच्या प्रवाहात सामिल होण्याचे ठरविले आहे. अर्थात त्यांना भाजपाच्या सोबतीने जाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. ज्यातून फूटून बाहेर पडल्या त्या शिवसेनेबरोबर जाऊ शकत नाहीत. मग अशा स्थितीत भाजपाची व हिंदुत्वाची कास धरुन घसरणारी मतसंख्या वाढते का ते पहावे लागणार आहे. गेल्या सतरा वर्षात मनसेची ताकद कमी कमी होत गेली आहे. जनता ही राज यांच्या नकला बघायला व मती गुंग करणारे भाषण ऐकायला येते असा आजवरचा अनुभव आहे, त्यामुळेच मनसेच्या मतांमध्ये सतत घटच होत आहे. त्यांच्या या नव्या राजकीय भोंग्यांचा उपयोग होतो किंवा नाही हे आत्ता सांगणे कठीण आहे मात्र ईडीचा जाचातून तर निश्चित सुटका होईल.


0 Response to "राजकराणाचा भोंगा"
टिप्पणी पोस्ट करा